‘अन्यथा..’ या गिरीश कुबेर यांच्या सदरातील ‘..देवाला आव्हान!’ हा लेख (२२ मार्च) वाचला आणि पेलेच्या लोकप्रियतेचे  वर्णन  वाचून आपल्या देशातील ‘तथाकथित’ क्रिकेटचा देवच समोर आला. सचिन तेंडुलकर जगातील सर्वोत्तम फलंदाज आहे, यात तिळमात्रही शंका नाही. पण त्याला लगेच देवाचा दर्जा बहाल करणे हे खरोखरच बौद्धिक दिवाळखोरीचे लक्षण आहे.
सचिनचा उदय आणि आíथक उदारीकरण या जवळ-जवळ समकालीन घटना आहेत. एकीकडे सचिन गोलंदाजांचा समाचार घेत होता तर दुसरीकडे अनेक परदेशी कंपन्या आपापली दुकाने भारतीय बाजारपेठेत मांडत होत्या. विसावे शतक संपेपर्यंत सचिनला चाहत्यांनी मंदिरात नेऊन बसवले आणि इकडे अनेक स्वदेशी-परदेशी कंपन्या स्थिरस्थावर झाल्या.  प्रचंड प्रेक्षकवर्ग मिळाल्यामुळे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाची चांदी झाली आणि आपल्या आíथक ताकदीच्या जोरावर हे मंडळ इतर देशांच्या मंडळांना आपल्या इशाऱ्यावर नाचवू लागले. आपल्याकडे कधी भविष्यात ब्राझीलसारखी परिस्थिती निर्माण झाल्यास सचिन जनतेच्याच बाजूने उभा राहील अशी अपेक्षा करू या आणि समजा अपेक्षाभंग झालाच तर  त्याचे  सध्याचे भक्तही त्याला आव्हान द्यायला कमी करणार नाहीत अशी अजून एक अपेक्षा करू या.

मूर्तिपूजेच्या पलीकडेही ‘धर्म’ आहे..
‘सत्य हाच निरीश्वरवादाचा कणा’ या लेखात (लोकसत्ता, रविवार विशेष, २३ मार्च) माधव गवाणकर यांनी मोकळेपणे आणि स्पष्टपणे मांडलेले विचार पटले. माणुसकी हा धर्म पाळण्यासाठी तुम्ही आस्तिक आहात की नास्तिक याचा काहीच संबंध नाही. ज्याप्रमाणे आस्तिक म्हणजे ‘देव आहे’ असे मानणे ही व्यक्तिसापेक्ष श्रद्धा आहे, त्याचप्रमाणे नास्तिक म्हणजे ‘देव नाही’ हीसुद्धा व्यक्तिसापेक्ष श्रद्धाच आहे. मुद्दा असा की, ज्याने त्याने आपल्या बुद्धीला व तर्काला पटेल व माणुसकीला धरून असेल तसे आस्तिक अथवा नास्तिक असावे किंवा दोन्ही नसावे. शेवटी तुमच्या आयुष्यात कठीण प्रसंगातून तुम्हाला तारून नेते ती तुमच्या मनातील श्रद्धाच. लहान मुलांना वाढवताना मोठी माणसे त्यांच्या विचारांप्रमाणे वाढवणार, हे तर उघडच आहे. पण मुलांनासुद्धा लहानपणापासून डोळे उघडे ठेवून विचार करून समोरच्याचे विचार स्वीकारण्याची व स्वत:ची मते स्वत: विचारपूर्वक तयार करण्याची सवय लावणे शक्य असते; जेणेकरून ती स्वत:चे निर्णय स्वत: घेऊ शकतील. ते स्वातंत्र्य त्यांना देता येणे सहजशक्य आहे व दिले जावे. मुळात देवाची निर्मिती झाली ती ज्यांना निर्गुण चतन्याची आराधना करणे झेपत नाही त्यांच्यासाठी. म्हणून सगुण व ज्याच्या त्याच्या आवडीप्रमाणे मूर्तीची निर्मिती व मूर्तिपूजा सुरू झाली. पण कुणावरच कुठलेच विचार स्वीकारण्याची सक्ती नसावी.
कित्येक आस्तिक माणसे आज नास्तिकांप्रमाणेच प्रखर चिकित्सक व बुद्धिप्रामाण्यवादी आढळून येतात. तत्त्वनिष्ठ व सत्यवादी असतात. समाजकार्यात झोकून देणारी असतात. कठोर तरी रसिकही असतात. तेही स्वत:चे अनुभव तपासत असतात. शेवटपर्यंत तब्येतीने ठणठणीत असतात. गुप्त दान करतात केवळ माणुसकी म्हणून, पुण्यसंचय म्हणून नाही. कर्मकांड करत नाहीत. उपास करत नाहीत. त्यांच्याही घरी देव व देवघर असत नाही. इतकेच काय, देवघर व देव असून रोजची पूजासुद्धा होतेच असे नाही. म्हणून काही ती लगेच वाईट ठरत नाहीत. तसेच देवाच्या नावाखाली चालणारा बाजार, पंडय़ेगिरी इ. गोष्टींना  बुद्धिप्रामाण्यवादी आस्तिकांचाही विरोधच असतो. मुख्यत: ती देवाचा ‘कोप होईल’ या भीतीने आस्तिक नसतात, तर मनापासून भावते म्हणून आस्तिक असतात.
माझा (गवाणकर यांच्या लेखाच्या व्याप्तीबाहेरचा) मुद्दा असा की आस्तिक व नास्तिक हे  ‘योग्य’ की ‘अयोग्य’ म्हणणे हेच मुळात गरलागू, निर्थक आहे . ज्याने त्याने आपल्या अनुभव, तर्क, बुद्धिप्रामाण्य इ.वरून काय असायचे ते ठरवावे व स्वत:शी प्रामाणिक राहावे. स्थळ, काळ व वर्तमानाप्रमाणे माणसे बदलतात, मने बदलतात, मते बदलतात हे समजून घ्यावे व स्वीकारावे.
शेवटी मानवता धर्म हाच महत्त्वाचा. कारण माणसासाठी धर्म आहे, धर्मासाठी माणूस नाही. धर्म याचा मूळ अर्थ ‘धारण करणे’ म्हणजे ‘रोजच्या जगण्यात वागवणे / वापरणे’ असा आहे. थोडक्यात, धर्म म्हणजे रोजचे जगणे सर्वासाठी (यात फक्त घर व घरातील माणसे नसून घरातील व घराबाहेरील माणसे, प्राणी, पक्षी, कीटक, वेली, झाडेझुडपे इ. सर्वाचा अंतर्भाव आहे) सुखकर व्हावे म्हणून नसíगक न्यायाने आपोआप आचरणात आणले गेलेले अलिखित नियम. म्हणजे ‘माणसाने माणसाशी माणसाप्रमाणे वागावे’ हे घासून गुळगुळीत झालेले वाक्य अमलात आणण्याचे नियम. अगदी प्राचीन वेदकालापासून हेच नियम चालत आलेले आहेत व देवभक्त संतांनीसुद्धा माणुसकीचीच शिकवण दिलेली आढळून येते. वेदकाली मूर्तिपूजा नव्हती याची नोंद घ्यावी.
माधुरी भागवत, डोंबिवली

मुसोलिनी-मुंजे भेटीआधीच संघाची स्थापना
‘हिटलर, मुसोलिनी, जेटली..’ हे पत्र (लोकमानस, २४ मार्च) वाचले. पत्रलेखक श्रीधर शुक्ल यांनी ऐतिहासिक सत्य म्हणून डॉ. मुंजे आणि रा. स्व. संघ यांच्याबद्दल खोडसाळ माहिती दिली आहे. डॉ. बाळकृष्ण शिवराम मुंजे हे कधीच रा.स्व.संघाच्या संस्थापकांपकी नव्हते. त्यांनी नागपुरात िहदू महासभेची स्थापना १९२३ मध्ये केली. १९३१ मध्ये इंग्लंडमध्ये भरलेल्या गोलमेज परिषदेहून परतताना ते फ्रान्स, जर्मनी, इटली व ऑस्ट्रिया या देशातील लष्करी शिक्षणाची पाहणी करण्यासाठी गेले होते. त्यावेळी मुसोलिनीची आणि त्यांची भेट झाली. (संदर्भ- धर्मवीर डॉ. बा. शि. मुंजे यांचे चरित्र, वीणा हरदास, पृ.२५६ ,लाखे प्रकाशन-नागपूर,२०१३).
 परंतु रा.स्व.संघाची स्थापना १९२५ मध्ये झाली. त्यावेळी मुसोलिनीची आणि मुंजेंची भेटच झाली नव्हती. मग ब्लॅक शर्ट्सचा उल्लेख करून त्याऐवजी संघाची ब्लॅक कॅप आली असे म्हणणे हा खोडसाळपणा नव्हे तर काय आहे?
डॉ.सच्चिदानंद शेवडे, डोंबिवली

समृद्धी येईल, पण कोणासाठी?
..देवाला आव्हान! हा गिरीश कुबेर यांचा लेख वाचला. ब्राझीलमध्ये पेलेविरोधात निदर्शकांकडील फलकावरचा प्रश्न आपल्या देशातील समकालीन परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पुरेसा आहे. काही काळात आपल्याकडे निवडणुकीचा सण मोठय़ा दिमाखात साजरा होईल. सोबतच कर्तबगार पक्षाचे जाहीरनामे लोकांना भुरळ घालण्यास कोठेही मागे पडणार नाहीत, आश्वासनांच्या खैरातीचा तर प्रश्नच नाही. प्रश्न हा की, शेतकऱ्यांसाठी केलेली मदत असो की सेबीच्या दोन प्रामाणिक आधिकाऱ्यांवरील कारवाई असो किंवा उमेदवार म्हणून उभे केलेले भांडवलदार असोत.. समृद्धी येईल, पण कोणासाठी? हा प्रश्न देशातील प्रत्येक नागरिकाने व्यवस्थेला विचारणे स्वाभाविकच आहे.    
सुशील डोंगरे, सर्कसपूर (वर्धा)