तो नायक ठरू शकत नाही, हे उघड आहे. अखेर तो एक सामान्य सैनिक. अमेरिकी विमानातून जपानच्या हिरोशिमा शहरावर अणूबॉम्ब फेकणाऱ्या पथकातील अखेरचा जिवंत हवाई सैनिक, हीच त्याची अखेपर्यंतची ओळख. तीही एकप्रकारे योगायोगानेच घडलेली, कारण त्याला इतरांच्या तुलनेत लाभलेले दीर्घायुष्य, हे काही त्याचे एकटय़ाचे कर्तृत्व नव्हे. या बॉम्बफेकीचे काम करणाऱ्या विमानाचे नाव ‘एनोला गे’ आणि याकामी एकंदर ११ जणांची नियुक्ती झाली होती. या पथकाचे नेतृत्व करणाऱ्या तिघांची नावे कर्नल पॉल टिब्बेट्स, कॅप्टन रॉबर्ट ल्युइस यांच्या नंतरचा आणि कॅप्टन थिओडोर व्हान (किंवा ‘फान’) किर्क.
हे थिओडोर व्हान किर्क, वयाच्या ९३ व्या वर्षी नैसर्गिकरीत्या मरण पावले. मुलाबाळांचे संसार पाहिलेला हा अमेरिकी निवृत्त सैनिक, मुले-नातवंडे समोर असताना ३० रोजी गेला. आणखी एक योगायोग म्हणजे त्यांचा अंत्यविधी ५ ऑगस्ट रोजी ठरला आहे.. हिरोशिमा शहर ६ ऑगस्ट १९४५ रोजी अणूबॉम्बने बेचिराख केले होते.
या जपानी शहरात तब्बल एक लाख ४० हजार बळी काही क्षणांत आणि नंतरच्या काही महिन्यांत अणूबॉम्बने घेतले. हा संहार तेथे घडवणाऱ्या पथकातील हा अखेरचा सदस्य मात्र, ‘मी केवळ पंधरा सेकंदांचा उशीर केला होता. विमान प्रत्यक्ष चालवण्याचे काम माझ्याकडे होते आणि मी वेळ पाळली’ यातच समाधान मानत होता. असोसिएटेड प्रेस या वृत्तसेवेने २००५ साली घेतलेली त्यांची मुलाखत, हा त्यांचा अगदी विरळा माध्यम-संवाद. तेव्हा ऐंशीपार असलेले किर्क आठवणींमध्येच अधिक रमले. आणखी कोण कोण या पथकात होते, त्यांचे आपले काय बोलणे झाले, वगैरे.
याच मुलाखतीत एका क्षणी ते म्हणाले, बॉम्ब प्रत्यक्ष फेकला गेला, त्या क्षणी आम्हा सर्वच्या सर्व जणांना भीती वाटली होती.. आपण तरी आता कसे वाचणार, हीच.
पण या भीतीतून बाहेर पडण्याचा एकच मार्ग होता.. आपले काम नीट करणे, हा. ते काम त्यांनी केले. इतके निष्ठेने की, आपण केले ते योग्यच, असा त्यांचा समज शेवटपर्यंत राहिला.
त्यांनी तसे बोलूनही दाखवले होते, याच मुलाखतीत.. म्हणे, जपानमधली दोन शहरे बेचिराख झाली हे चुकीचेच तसे; पण आम्ही जे केले त्यामुळेच महायुद्ध थांबले आणि पुढली मनुष्यहानी टळली, हे महत्त्वाचेच की नाही?
.. हे असे, इतका भयावहरीत्या सरळ विचार असणारा हा माणूस. त्याचे सामान्य असणे, निवृत्तीनंतर सामान्य माणसासारखे जगणे, हेच विशेष होते.