विज्ञान समजले म्हणजे तंत्र सुचेल असे काही नाही. तंत्र निवडण्यासाठी वा सुचण्यासाठी, आपल्याला मूल्यवान काय आहे व काय गमावून चालेल? याचे प्राधान्यक्रम ठरवावे लागतात आणि इष्टतम (ऑप्टिमम) तडजोड कोणती हे शोधावे लागते. हे सारे मूल्यात्मक आणि विज्ञानबाहय़ असते. पेचात टाकणारे असते. नवे मार्ग सुचणे ही गोष्ट केवळ प्रतिभेवर अवलंबून असते व त्यात सर्वाना उपयोगी पडेल अशी कोणतीच रीत नसते, असे मानणे ही एक मोठीच गफलत आहे.
एडिसनविषयी एक दंतकथा आहे. त्याला ‘बल्ब कसा बनवावा’, यावर दोन तास भाषण करण्याचे निमंत्रण आले. तो म्हणाला, ‘जमणार नाही. पण जर तुम्ही बल्ब कसा बनवू नये असा विषय ठेवलात, तर कितीही वेळ बोलेन.’ एडिसनच्या बल्बचा सर्वात महत्त्वाचा भाग कोणता? उत्तर आहे निर्वात पोकळी! तो जोवर न जळणारे फिलॅमेंट शोधत होता तोवर अडखळला होता. फिलॅमेंट या जळणाऱ्या घटकावरून त्याची नजर दुसऱ्या जाळणाऱ्या घटकाकडे म्हणजे ऑक्सिजनकडे वळली आणि उत्तर हात जोडून समोर उभे होते. एखादी गोष्ट प्रकाश देण्याइतकी तापते तेव्हा ती जळण्याइतकीसुद्धा तापणार! तापली पाहिजे. पण जळली तर नाही पाहिजे, हे परस्परविरोधी आहे. समस्येत अंतर्वरिोध नेमका कोणता आहे हे जेव्हा पकडता येते, तेव्हा नवमार्ग (इन्होवेशन्स) सापडतात. तसेच कोंडी झालेली असताना आपण प्रश्न जसा मांडला आहे, त्यापेक्षा तोच प्रश्न वेगळ्या तऱ्हेने कसा मांडता येईल याचा विचार करायचा असतो. याला प्रश्नाचा रोख बदलणे वा मोहरा वळवणे असे म्हणता येईल.
बहुतेक शोध हे लागल्यानंतर फारच सोपे आणि ठळठळीत (ऑब्व्हियस) वाटतात. ‘एवढी साधी गोष्ट या आधीच कशी कळली नाही?’ असा प्रश्न पडतो. इतकेच काय पण आज जे न सुटणारे पेच वाटतायत तेही सुटल्यावर किरकोळ वाटणार आहेत. म्हणूनच आशेला जागा आहे. काही योगायोग अजून व्हायचे असतील. काही ‘चुकून बरोबर नेम’ लागायचे असतील. पण प्रश्न असा आहे की अंधारात चाचपडताना हात ‘लाडवावर’ पडणे (सेरेंडिपिटी) किंवा काहीतरी करून पाहायचे, चुकले की पुन्हा वेगळे काही करून पाहायचे (ट्रायल अँड एरर), एवढय़ाच गोष्टी आपल्या हाती आहेत? की आतापर्यंत लागलेल्या शोधांमागील विचार-प्रक्रिया अभ्यासून काही सामान्य सूत्रे सापडतात?
संसाधने ‘असत’ नाहीत, ती तशी ठरतात
रिसोर्स हा मानवी शब्द आहे. निसर्गात रिसोस्रेस म्हणून काही असत नाही. मानवाची (वक्र?) दृष्टी पडल्याने ते रिसोर्स म्हणून (क्वा रिसोर्स) अस्तित्वात येतात. निर्वात पोकळीसुद्धा रिसोर्स बनू शकते हे बल्बमध्ये आपण पाहिलेच. आता एक नसलेली पोकळीसुद्धा नवे संसाधन कशी बनते ते पाहू. क्रेनने उचलून नेण्याच्या कचराकुंडय़ा उंच असाव्या लागतात. कारण रस्त्याची जागा कमीत कमी अडवून जास्तीत जास्त कचरा मावला पाहिजे. या उंचीमुळे होते असे की माणूस कचरा आतच पडावा याचासुद्धा आळस करतो. कुंडीचा भोवताल अगोदरच कलंकित असला की पुढील टाकणाऱ्यांना कमी कमी अपराधी वाटते. कचराकुंडी कमरेइतकीच उंच असली तर कचरा आत टाकणे सुकर होईल. म्हणजे ती उंचही हवी आणि बुटकीही (अंतर्वरिोध). खरे तर जास्त कचरा मावण्यासाठी ‘उंची’ हा मुद्दा नसून ‘खोली’ हा आहे हे उमगले की मार्ग सापडतो. यासाठी असे करतात की, कुंडी जमिनीवर ठेवण्याऐवजी तिचा खालचा भाग फिट्ट बसेल अशा खड्डय़ात ठेवतात.
भरलेली नेतानाच रिकामी ठेवायची असल्याने खड्डा हा ‘कठडय़ाविना’ राहत नाही. येथे ‘जमिनीखालचा अवकाश’ हा नवा रिसोर्स बनला आहे. ‘उंची’कडून ‘खोली’कडे मोहरा वळवला आहे.
रात्रीच्या अंधारात वाहनांना, त्यांना ‘जेथे आपटू नये’ ते सर्व अडथळे दिसले पाहिजेत. मग अख्खा हायवे रात्रभर उजळून टाकावा काय? वाहन अडथळ्याच्या जवळ आले की ड्रायव्हरला तो दिसला पाहिजे, पण एरवी तो प्रकाशित असण्याची गरज नाही. म्हणजे तो ‘दिवा’ नेमक्या वेळी लागलेलाही हवा आणि एरवी विझलेलाही हवा. हा अंतर्वरिोध कोणत्या रिसोर्सने सोडवायचा? वाहन हे प्रकाशाचा स्रोतसुद्धा असते हे लक्षात घेतले की लाल चमकणारे रिफ्लेक्टर ही कल्पना सुचते. याच कल्पनेचे आणखी सामान्य-रूप केले की ‘ग्राहकाचीच संसाधने वापरता आली तर पाहा’ हे सूत्र सापडते, जसे सेल्फ-सíव्हस-रेस्तराँ. याचे आपल्याला परिचित उदाहरण म्हणजे स्कूटर स्टॅण्डवर चढवायला जास्त कष्ट पडत असत. आता स्टॅण्डला एक छोटी लिव्हर आणि तिला पेडल दिलेले असते. या पेडलवर स्वत:चे वजन दिले की ते बल उलटय़ा दिशेने लागून स्कूटर सहजगत्या उचलता येते. म्हणजे ग्राहकाचे वजन हा आता ‘स्रोत’ बनला आहे. नवमार्ग सापडणे हे तांत्रिक बाबीतच नव्हे तर आíथक व्यवहारातही घडू शकते. एक वृद्ध व्यक्ती आहे. तिला पुरेसे पेन्शन वा व्याज मिळत नाहीये. ती व्यक्ती ज्या घरात राहते ते विकल्यास भरपूर भांडवल मिळेल, पण मग राहण्याचा प्रश्न निर्माण होईल. म्हणजे घर विकायचे आहेही आणि नाहीही हा अंतर्वरिोध आहे. ते घर मृत्यूनंतर कोणाला द्यायचे नाहीये. अशा वेळी विमासदृश कंपनीशी एक अभिनव करार करता येतो. कंपनीने वृद्ध व्यक्तीला पेन्शन द्यायला सुरुवात आताच करायची आणि त्या बदल्यात मृत्यूनंतर त्या घराची मालकी कंपनीची होईल. म्हणजेच ‘नसलेल्या भवितव्याच्या’ बदल्यात वर्तमानकाळात मोबदला घेणे ही सोय झाली. यालाच रिव्हर्स मॉग्रेज म्हणतात.
प्रतिकूल घटकाला अनुकूल कार्यात जुंपणे
धूर सोडणारी उंच चिमणी हे दुधारी मूव्हचे (चेसमध्ये एका मूव्हने दोन मोहरी धरली जातात तसे) उत्तम उदाहरण आहे. धूर हा जितका उंचावर सोडावा तितके प्रदूषण कमी होते. म्हणजेच उंच चिमणी बांधणे ही एक खर्चीक जबाबदारी आली. पण हा खर्चच जमेच्या बाजूला वळवला जातो. चिमणी हा एक गरम वायूचा स्तंभ असतो.  तिच्यातील दाब बाहेरील दाबापेक्षा कमी असतो. भट्टीत आत येणारी हवा जास्त दाबाची ठरून जोरात खेचली जाते (ड्राफ्ट) जे भट्टीला आवश्यकच असते. कारण ड्राफ्टमुळे तीव्र ज्वलन व इंधन-कार्यक्षमता साध्य होते. चिमणीत घातलेल्या भांडवलाची, स्वार्थ आणि अन्यार्थ या दोन्हीत वसुली होते.
एन.सी.सी. त रायफल चालवून पाहिली असेल तर उलटा दणका (रिकॉइल) किती जबरी असतो ते माहीत असेल. रिकॉइलची ऊर्जा ही दणका म्हणून पाहता प्रतिकूल आहे. पण तीच ऊर्जा नवे काडतूस भरण्याकरिता (चाìजग) वापरता येते. नव्या प्रकारच्या पिस्तुलांत वरचा चौकोनी स्लायडर रिकॉइलने मागे सरकतो आणि नवे काडतूस नळीत घेतो. रिकॉइलने हात हलणे, नेम चुकणे हेही टळते आणि पुढची गोळी तयार असते. हीच ऊर्जा वापरून मशीनगन कार्बाइन वगरे चालविली जातात. लिफ्टचे प्रवाशांसह वजन ही प्रतिकूल गोष्ट आहे. वर जाताना तेवढे काम पडते म्हणून आणि खाली येताना संथ गती राखायची म्हणूनही. हे वजन कमी करायच्या भानगडीत न पडता ते चक्क दुप्पट करतात! पण हे जादाचे समान वजन कप्पीवरून येणाऱ्या केबलला उलटय़ा दिशेने जोडलेले असते. आपण काऊंटरवेट खाली-वर जाताना नेहमी बघतो. यामुळे होते असे की, मोटरला दोन्ही वेळेला समान आणि फक्त घर्षणावर मात करण्याइतकेच काम पडते. या नजरेतून काऊंटरवेटकडे पाहायला कुठेच शिकवले जात नाही. कोणत्याही घटकाचे कार्य जाणायचे तर तो नसता तर काय झाले असते याची कल्पना करून पाहावी. एक्झॉस्ट हा ध्वनी आणि वायू प्रदूषण करणारा असतो, पण त्याच्यातही ऊर्जा असते. ही ऊर्जा ऊब आणण्यासाठी वळवता येते. गवत कापणाऱ्या मशीनचा एक्झॉस्ट हा गवताकडे वळवला तर गवत वाळून ओल्या गवताने मशीन जाम होण्याचेही थांबते. त्याच वेळी आवाजही गवतात शोषला जातो. दुहेरी फायदा! गुजरातमध्ये कालव्यांवर सोलर-इलेक्ट्रिक पॅनेल बसविताना, बाष्पीभवनाने होणारा पाण्याचा व्यय थांबेल आणि पॅनेल जितके थंड राहील तितकी त्यांची ऊर्जा-रूपांतरणाची कार्यक्षमता सुधारेल, असे दोन पक्षी मारलेले दिसतात.
नवमार्गशोधन (इन्होवेशन) हा माणसाचा आदिम गुणधर्म आहे. हल्ली ‘इनोव्हेशन करा’ असा सतत उद्घोष चालू असतो. ते योग्यच आहे. पण नवमार्गशोधन या गोष्टीमागील सामान्य सिद्धान्त कोणते हे कोणीच सांगत नाही
‘नवमार्गशोधनाचे सामान्य सिद्धान्तन’ याचे रशियन भाषेत जे काय भाषांतर होते त्याची आद्याक्षरे ळफके अशी येतात. याच नावाच्या वेबसाइटवर जाऊन पाहा. तेथे तुम्हाला अनुकूल वा प्रतिकूल ठरू शकणाऱ्या घटकांच्या पेचदायक जुळण्यांचे एक मोठ्ठे मॅट्रिक्स मिळेल. ४० प्रकारच्या स्ट्रॅटेजींची यादी मिळेल आणि कोणत्या पेचांना कोणत्या स्ट्रॅटेजीज् उपयोगी पडतात याचे आणखी मोठ्ठे मॅट्रिक्स मिळेल. चाकाचा शोध पुन:पुन्हा कशाला लावा? याच न्यायाने, नवमार्गशोधनावर अगोदर झालेले अभ्यास शिदोरी म्हणून घ्यायला नकोत काय? अशा अभ्यासाच्या अनेक परंपरा आहेत. फक्त ळफके नव्हे.  
या साऱ्याचा अर्थ, सर्व मानवी प्रश्नांवर उपाय फक्त ‘तांत्रिक’च करावेत, असा मात्र अजिबातच नाही.
* लेखक हे कामगार संघटनांचे उत्पादकता सल्लागार, तसेच तत्त्वज्ञान व सामाजिक शास्त्रांचे आंतरविद्याशाखीय अभ्यासक आहेत.

forever particles marathi news, forever particles latest marathi news
विश्लेषण : जगभर पिण्याच्या पाण्यात आढळतात घातक `फॉरएव्हर पार्टिकल्सʼ… त्यांचे उच्चाटन अवघड का असते?
Saving
बचत फक्त मोठ्यांनी नाही, लहानांनीही करावी! मुलांना अर्थसाक्षर बनवण्यासाठी ‘या’ गोष्टी ठरतील फायदेशीर
How To Identify Mangoes Without Adulteration Five Signs
गोड, रसाळ आंबा निवडताना ‘या’ खुणांकडे असू द्या नजर; तज्ज्ञांनी सांगितली भेसळ ओळखण्याची योग्य पद्धत
wife
पत्नीने तक्रार दाखल करणे क्रुरता नाही…