राज्यातील सगळ्या शाळांमधील विद्यार्थ्यांची एकाच वेळी हजेरी घेण्याच्या निर्णयामुळे अनेक शिक्षण संस्थाचालकांची हबेलहंडी उडणे स्वाभाविक होते. २०११मध्ये जेव्हा अशी पटपडताळणी पहिल्यांदा करण्यात आली, तेव्हा राज्यात सुमारे २४ लाख विद्यार्थी बोगस असल्याचे आढळून आले होते. त्यानंतर गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्येही अशीच तपासणी करण्यात आली. या दोन्ही तपासण्यांनंतर शासनाने आता राज्यातील १४०४ शाळांची मान्यता रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. फारशी गुंतवणूक न करता, सरकारी अनुदानावर डल्ला मारून आपली पोटे भरण्याचे जे उद्योग अनेक संस्थाचालकांनी सुखेनैव सुरू ठेवले होते, त्याला आळा बसवण्यासाठीच तर पटपडताळणीचा उपद्व्याप करण्यात आला. ५० विद्यार्थ्यांमागे एक शिक्षक या प्रमाणात शिक्षकांच्या नेमणुकीस परवानगी देऊन त्यांचा पगार शासन देत असल्याने या सगळ्या संस्थांनी शाळेच्या हजेरीपत्रकावर म्हणजे पटावर विद्यार्थ्यांच्या खोटय़ा नोंदी करून घेतल्या. जो विद्यार्थी दुसऱ्या शाळेत शिकत आहे, त्याचे नाव पंचक्रोशीतल्या अनेक शाळांच्या पटावर नोंदवले जाऊ लागले. असे करून शिक्षकांची वाढीव संख्या मंजूर करून घेण्यात आली. त्या शिक्षकांचा सगळा पगार संस्थाचालक आपल्याच खिशात घालू लागले. अनेक शिक्षकांना त्यांच्या पगारापेक्षा कितीतरी कमी रक्कम देऊन बोळवण केली जाऊ लागली. पटपडताळणीमुळे खरी विद्यार्थी संख्या लक्षात आली. २५९२ शिक्षकांची अतिरिक्त भरती झाल्यामुळे त्यांच्या नोकरीवर गदा आली. आपण केलेले पाप झाकण्यासाठी मग या शिक्षकांची ढाल पुढे करण्यात आली. एवढे झाल्यानंतर तरी संस्थाचालक शहाणे होतील असे वाटत होते, परंतु वर्षांनंतर झालेल्या पटपडताळणीत पुन्हा बोगस विद्यार्थी दाखवण्याचे उद्योग स्पष्ट झाले. त्यामुळे आता या शाळांची मान्यता रद्द करण्याचे शासनाने ठरवले आहे. शाळा बंद झाल्याने परिसरातील विद्यार्थ्यांचेच नुकसान होणार आहे. प्राथमिक शिक्षणावर होणाऱ्या सुमारे सोळा हजार कोटी रुपयांच्या निधीत असा उघड भ्रष्टाचार होत असताना त्याकडे दुर्लक्ष करण्यात येत होते, हे या तपासणीमुळे लक्षात आले. आता ज्या अडीच हजार शिक्षकांच्या नोकऱ्याच जाण्याची वेळ आली आहे, त्यांना अन्यत्र सामावण्याचे प्रयत्न सुरू असले तरी, राज्यात डी.एड्. अभ्यासक्रमाच्या प्रवेश परीक्षेची वाट पाहणाऱ्या हजारोंची नोकरी मिळण्याची शक्यताही त्यामुळे विझत चालली आहे. शासनाच्या अनुदानाच्या पद्धतीचा गैरवापर करून संस्थाचालकांनी खोटी विद्यार्थी संख्या दाखवून शिक्षकांची भरमसाट भरती केल्यानेच डी.एड्.च्या अभ्यासक्रमाकडे लोकांचा ओढा वाढला.  डी.एड्. ही जणू एक दुभती गायच झाली. खोटे विद्यार्थी दाखवून अनुदान लाटणारे संस्थाचालक किती निर्ढावलेले आहेत, हे गेल्या वर्षीच्या पटपडताळणीने पुन्हा सिद्ध केले. ‘पुढच्यास ठेच मागचा शहाणा’ ही म्हण संस्थाचालकांनी खोटी पाडली . खरे तर असे करणाऱ्या संस्थाचालकांनी निर्माण केलेल्या इमारती आणि अन्य सुविधा जप्त करून त्या त्याच गावातील अन्य संस्थेकडे सुपूर्द करायला हव्यात. असे झाले, तरच पुढील वर्षीच्या पटपडताळणीत खोटय़ा विद्यार्थ्यांची संख्या अत्यल्प दिसेल.