देशाला जगज्जेतेपद मिळवून देण्याचं स्वप्न अनेक खेळाडू पाहतात; परंतु फार थोडय़ा खेळाडूंचे हे स्वप्न सत्यात अवतरते. १९९८ मध्ये थिएरी हेन्रीने फ्रान्सला विश्वविजेतेपद मिळवून दिले. पण फुटबॉलच्या इतिहासात त्याचे नाव मानाने घेतले जाते त्याने अर्सेनेलसाठी आणि प्रीमियर लीगमध्ये केलेल्या अविस्मरणीय कामगिरीसाठी. त्यामुळे मंगळवारी आपल्या २० वर्षांच्या अखंड सेवेनंतर त्याने फुटबॉलक्षेत्राचा निरोप घेतला, तेव्हा फ्रान्सप्रमाणेच इंग्लंडनेही त्याला सलाम केला.
वस्तुत: हेन्री (फ्रेंच उच्चार, ऑन्री) हा फ्रान्सकडून सर्वाधिक गोल झळकावणारा आक्रमणपटू. मात्र ‘द गनर्स’ या टोपणनावाने ओळखल्या जाणाऱ्या अर्सेनेलसाठी आठ वर्षांत नोंदवलेल्या १७४ गोलमुळे तो इंग्लिश फुटबॉलप्रेमींच्या गळ्यातला ताईत झाला. २००८मध्ये घेण्यात चाहत्यांची एक मतचाचणी घेण्यात आली होती. त्यात अर्सेनेलचा सर्वकालीन महान खेळाडू म्हणून हेन्रीलाच पसंती देण्यात आली. लंडनमधील अर्सेनेल स्टेडियमच्या बाहेर गुडघ्यावर बसून गोल साकारल्याचा आनंद साजरा करणारा हेन्रीचा पुतळा त्याच्या लोकप्रियतेचीच साक्ष देत असतो. वयाच्या सहाव्या वर्षांपासून थिएरीनं फुटबॉल खेळावर जिवापाड प्रेम केलं. त्याच्या वडिलांनी त्याच्या खेळासाठी विशेष मेहनत घेतली. त्याला खेळाची निसर्गदत्त देणही होतीच. त्या जोरावर तो फ्रेंच राष्ट्रीय सॉकर अकादमीमध्ये दिवसेंदिवस प्रगती करू लागला. १९९४मध्ये त्याने १७व्या वर्षी आपल्या कारकीर्दीतील पहिला करार मोनॅकोशी केला. तिथे अर्सेनेलचा भावी प्रशिक्षक अर्सेनी वेंगर याचे मार्गदर्शन त्याला लाभले. त्याने ३६ सामन्यांत ९ गोल नोंदवले आणि राष्ट्रीय संघात स्थान मिळवले. १९९८मध्ये विश्वचषकाच्या सलामीच्या सामन्यात हेन्रीने आपले गोल खाते उघडले. त्यानंतर २०१०पर्यंतच्या सर्व विश्वचषकांमध्ये त्याने फ्रान्सचे प्रतिनिधित्व केले. हेन्रीने फिफा विश्वचषकाप्रमाणेच फ्रान्सला २०००मध्ये युरो, २००३मध्ये फिफा कॉन्फेडरेशन चषक जिंकून दिला. २००७मध्ये त्याने सर्वाधिक गोलचा प्लाटिनीचा विक्रम मागे टाकला. पण या विश्वचषकात अंतर्गत दुफळीमुळे फ्रान्स संघाचे नुकसान झाले आणि हेन्रीने आंतरराष्ट्रीय कारकीर्दीला अलविदा केला. निवृत्तीप्रसंगी १२३ सामन्यांत ५१ गोल त्याच्या खात्यावर जमा होते. त्यानंतर अर्सेनेल क्लबशी करारबद्ध होण्यापूर्वी हेन्री ज्युवेंट्स क्लबकडून खेळला. २००७मध्ये तो अर्सेनेलकडून बार्सिलोना संघात खेळायला गेला. त्या संघासाठीसुद्धा तो यशदाताच ठरला. २०१०मध्ये तो न्यूयॉर्क रेड बुल्स संघात सामील झाला. मग २०१२मध्ये पुन्हा दोन महिन्यांसाठी तो अर्सेनेलमध्ये परतला. निवृत्तीनंतर आता टीव्ही चॅनेलवर फुटबॉलतज्ज्ञ म्हणून नवा डाव तो सुरू करणार आहे.