चौथ्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेताना मोदींनी केलेले शक्तिप्रदर्शन राष्ट्रीय वाहिन्यांनी जणू काही मोदी पंतप्रधानपदाची शपथ घेतली अशा थाटात दाखवले. मात्र त्यामागचे बेरजेचे गणित प्रत्येक जण विसरू पाहतो असे  दिसते. मी राजकीय विश्लेषक नाही (पण गेले दीड वर्ष अहमदाबाद शहरात राहून गुजरातच्या विविध गावांत कामानिमित्त फिरून तेथील परिस्थिती पाहिली आहे). मोदींना पंतप्रधानपदी विराजमान झालेले पाहणाऱ्यांनी जरूर लक्षात ठेवले पाहिजे की गुजरात म्हणजे भारत नाही.
सुहास कुलकर्णी (२६ डिसेंबर, मोदींच्या विजयामागील सत्यासत्य) यांच्या विश्लेषणावर श्रीनिवास जोशी आणि शुभा परांजपे यांनी त्यांच्या सांख्यिकी विश्लेषणावर जरूर टीका केली. आपल्या लोकशाहीत निवडणूक जिंकण्यासाठी संख्याबळाचा विचार जरी केला जात असला तरी त्याला मतपेटीतून होणारा विरोधदेखील दृष्टिआड करून चालणार नाही. मी आधीही लिहिले होते (‘अन्यथा’विषयी लिहिलेले पत्र, लोकमानस, २४ डिसेंबर) की,  मोदी हे गुजराती अस्मितेचे जनक आहेत. आजही तुम्ही गुजरातमधील कोणत्याही शहरात िहदीमध्ये संवाद साधला तर तुम्हाला गुजरातीमध्येच उत्तर मिळेल. हीच अस्मिता महाराष्ट्रात कुठेही दिसत नाही. याच अस्मितेच्या प्रेमात मोदींचे प्रशंसक पडतात. (या प्रशंसकांत तामिळनाडू, पंजाब आणि महाराष्ट्रातील जे नेते होते, त्यांच्या पक्षांचा त्या-त्या राज्यातील अस्मितावादाला विरोध नाही.)
गुजरातचा विकास हा सध्या उद्योगांनी झालेला आहे, पण त्यामागे कोण किती नागवला गेला आहे याचा कुणी विचार केला आहे? एका रात्रीत उद्योगांसाठी जागा खाली कशा होतात याचा विचार कुणी केला आहे? विकासाच्या मागे होणारा जनक्षोभ कुणी पहिला आहे? तो दाबला जातोय तोपर्यंत प्रत्येक जण मोदींना विकासपुरुष मानेल. मोदींनी विकसित केलेल्या त्यांच्या मणिनगर मतदारसंघाची तुलना फार तर कल्याण-डोंबिवलीशी करता येईल. अहमदाबादची स्थिती ठाण्यापासून वेगळी अशी नाही. मोदींनी सध्या ज्या सुविधा निर्माण केल्या आहेत त्या केवळ येथील लोकसंख्या कमी आहे म्हणून सुस्थितीत चालल्या आहेत,  पण एकदा का लोकसंख्येचा ताण त्यावर पडला की त्याची पण मुंबई लोकल होण्यास वेळ लागणार नाही. त्याची सुरुवात आतापासूनच झाली आहे. येथील पददलित, अल्पसंख्यांक  अजूनही रिक्षाचालक वा तत्सम गॅरेजमध्ये काम करताना दिसतात. शिक्षणाचा अभाव त्यांच्यामध्ये अजूनही दिसतो आणि तथाकथित विकासाच्या वाहत्या गंगेपासून हा समाज कोसो दूर आहे आणि त्यांच्या उन्नतीसाठी फारसे प्रयत्न होताना दिसत नाहीत.
सर्वसमावेशक विकासाचे स्वप्न आपण जेव्हा पाहतो तेव्हा हा समाज त्यामध्ये येत नाही का?
खरे तर मोदींच्या राष्ट्रीय राजकारणाच्या प्रवेशाने येथील उद्योजक धास्तावले आहेत. मोदी  जर राष्ट्रीय राजकारणात गेले तर आपले काय होईल याची चिंता त्यांना सतावत आहे, कारण येथील स्थानिकांमध्ये आजही याबाबत सुप्त विरोध आहे. तो फक्त २४ तास दिसणाऱ्या वाहिन्यांसमोर नाही म्हणून आपल्याला तो माहीत नाही, आणि विकासाच्या बाबतीत म्हणाल तर गुजरातपेक्षा जास्त प्रगती बिहारने नितीशकुमार यांच्या कारकिर्दीत केली. ती पण लोकभावनेचा आदर ठेवून! फार तर त्यांनी उद्योग नाही आणले बिहारमध्ये, पण सामान्य माणसाच्या विकासाला प्राधान्य दिले आणि हाच विकासाचा खरा अभिप्रेत अर्थ आहे. समाजातला प्रत्येक जण जेव्हा स्वत:ला सुरक्षित मानतो, ताठ मानेने जगू शकतो तोच खरा विकास!
आजही अहमदाबादमध्ये राहण्यासाठी घर शोधताना िहदू की मुस्लीम, असा प्रश्न विचारला जातो. ही सुप्त भीतीची भावना ज्या समाजाला अजूनही पोखरते आहे तो समाज कसला विकास साधणार? माणूस जोपर्यंत स्वत:ला सुरक्षित मानत नाही, स्वत:च्या कुटुंबाला सुरक्षित मानत नाही, तोपर्यंत समाज कसा सुरक्षित होणार? मोदी राष्ट्रीय राजकारणात जावोत अगर गुजरातमध्ये राहोत, त्या समाजघटकाला काहीच फरक पडणार नाही. दीड वीत पोटाची खळगी भरताना डोक्यावरचे छप्पर हिरावून घेतले जाणार नाही या मन:स्थितीत हा समाज जगतो आहे, त्यांना खरं तर तुम्ही मोदींचा विकास विचारा आणि जे लोक मोदींच्या ‘सुप्रशासना’बद्दल किंवा ‘कायदा व सुव्यवस्थे’बद्दल गोडवे गातात त्यांच्या माहितीसाठी, गुजरातमध्ये दारूबंदी आहे, पण येथील लोक म्हणतात की सर्वात जास्त दारू येथेच विकली जाते, यावरून जे समजायचं ते समजून घ्या.
एखाद्याचा उदो उदो करणे ठीक आहे, पण तुम्ही जेव्हा त्याला विकासपुरुष बनवता तेव्हा फक्त दुरून डोंगर साजरे करू नका. समाजाच्या विकासाला महत्त्व द्या. आजही येथील दुर्बल नागवला जातोय. तो अजूनही दबून आहे. त्यांचा आवाज तुमच्यापर्यंत जोपर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत प्रत्येकाला असेच वाटत राहील की गुजरातमध्ये सारे काही आलबेल आहे.
आणि मोदींना पंतप्रधान म्हणून ज्यांना पाहायची इच्छा आहे त्यांच्या मनात हा गोड गरसमज जरूर राहो, ही सदिच्छा!
– सुयोग गावंड
अहमदाबाद, गुजरात

आधी सहिष्णुता, मग संधी; नंतरच विश्लेषण व्हावे
मोदींनी शपथग्रहणाच्या निमित्ताने सोडवलेले गणित अग्रलेखातून (२८ डिसेंबर) फारच चांगल्या प्रकारे व विस्ताराने सादर झाले आहे. नरेंद्र मोदींचा विजयही आपण मोकळ्या मनाने मान्य केला हे उचित झाले. मोदींच्या शपथविधीसाठी जी धुरंधर मंडळी उपस्थित राहिली त्यांचा प्रत्येकाचा हिशोब निराळा आहे. तीन अनुपस्थित धुरंधरांचा उल्लेख आपण बरोबर केला आहे, पण आणखी एक महत्त्वाचे नाव आपल्याकडून राहून गेले आहे ते म्हणजे सुशीलकुमार मोदी- बिहारचे उपमुख्यमंत्री. हे मोदी भाजपचे असूनही अनुपस्थित का राहिले? त्याचे उत्तर म्हणजे नितीशकुमारांना खूश करण्यासाठी. नितीशकुमार नाराज झाले तर काही खरे नाही, असा विचार दुसऱ्या मोदींनी केला असण्याची शक्यता नाकारता येत नाही.
आपण अटलजींचा उल्लेख करून सध्याच्या प्रचलित राजकारणात अटलबिहारी वाजपेयींसारखे नेतृत्वच टिकेल, असे सूचित केले आहे; पण जर मोदी पंतप्रधान झाले तर ते कशा प्रकारे परिस्थिती हाताळतात ते बघावे लागेल. अनेक पद्धतीने काम करणारे पंतप्रधान येतील आणि जातील. म्हणून मोदींनाही संधी मिळायला हवी.. नव्हे ती कधी मिळेल हे सर्वानी बघायला हवे व त्यानंतरच विश्लेषण व्हावे. सध्या एवढीच आशा करावी की हातचा घेण्यासाठी अटलजींसारखी सहिष्णुता मोदींमध्ये निर्माण व्हावी.
    – श्रीनिवास जोशी, डोंबिवली (पूर्व)

बाजू घेण्याच्या वृत्तीमुळेच असले प्रकार घडतात..
‘त्याचीही काही बाजू असेल’ हे एम. आर. सबनीस यांचे पत्र (लोकमानस, २९ डिसें.) वाचून धक्का बसला. प्रेमात कोणीही दोषी असेल वा नसेल तरीही बनकर याला कुणाचाही खून करण्याचा अधिकार नव्हता. त्याची बाजू घेण्याचा प्रयत्न चुकीचा आहे. अशाच वृत्तीमुळे असे भयंकर प्रकार घडतात. फुकटची सहिष्णुता दाखवून आपण मृत मुलीवर अन्याय करत नाही का?
 – अशोक व. कर्णिक