माहितीचा महामार्ग म्हणून इंटरनेटची ओळख आहे. त्या महामार्गावरही अप्रत्यक्षपणे इंटरनेट सेवा पुरवठादार कंपन्यांनी प्रत्येक संकेतस्थळासाठी किंवा विशिष्ट कंपनीसाठी वेगाने सेवा देण्यासाठी अप्रत्यक्षपणे जादा वसुली सुरू केलीच होती, त्यानंतर इंटरनेट समानतेचा प्रश्न ऐरणीवर आला. इंटरनेट म्हणजे वर्ल्ड वाइड वेबचा जन्मदाता टीम बर्नर्स ली याने ही व्यवस्था लार्ज हैड्रॉन कोलायडर या हिग्ज बोसॉनच्या संशोधनातील माहितीवर वेगाने संस्करण करता यावे यासाठी निर्माण केली, त्याचाच अर्थ जे काम एक व्यक्ती करू शकत नाही ते जगातील लोक एकत्र येऊन करतील असा हेतू होता. माहिती ही सर्वाची असते, त्यावर कुणाची एकाची मक्तेदारी असत नाही, त्यामुळे इंटरनेट समानता असली पाहिजे, अशी संकल्पना टीम बर्नर्स ली यांच्याही आधी अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठाच्या लॉ स्कूलचे प्राध्यापक टिमोथी वू यांनी मांडली. प्रा. स्कॉट हेमफिल व प्रा. क्लॅरिसा लाँग यांनी ती उचलून धरली.   
२००३ मध्ये ‘नेटवर्क न्यूट्रॅलिटी, ब्रॉडबँड डिस्क्रीमिनेशन’ या संशोधन निबंधात त्यांनी असे म्हटले होते, की माहिती व सेवेची समानता इंटरनेटमध्ये असली पाहिजे व त्यासाठी कायदा करावा. २००६ मध्ये वू यांनी ‘द वर्ल्ड ट्रेड लॉ ऑफ इंटरनेट फिल्टरिंग’ हे पुस्तक लिहिले. त्यात त्यांनी जागतिक व्यापाराचाही इंटरनेट समानतेशी संबंध असतो असे सांगितले. वू यांचा जन्म वॉशिंग्टनमध्ये झाला. त्यांचे वडील तैवानचे तर आई ब्रिटिश-कॅनेडियन आहे. खरे तर त्यांनी टोरांटो विद्यापीठात असताना प्रतिकारशक्ती शास्त्राचा अभ्यास केला, पण नंतर त्यांना संगणक, जैवभौतिकी या विषयात रस वाटला. मॅकगील विद्यापीठातून त्यांनी विज्ञानाची, तर हार्वर्ड लॉ स्कूलमधून कायद्याची पदवी घेतली. २०१४ मध्ये त्यांनी न्यूयॉर्कमध्ये डेमोक्रॅटिक पक्षाच्या वतीने गव्हर्नरपदाची निवडणूक लढवली, पण अपयशी ठरले. नॅशनल लॉ जर्नलने त्यांना अमेरिकेतील १०० प्रभावी वकिलांमध्ये स्थान दिले होते. हार्वर्डच्या १०० नामवंत विद्यार्थ्यांत त्यांची गणना होते. ‘द मास्टर स्वीच- द राइज अँड फॉल ऑफ इनफॉर्मेशन एम्पायर्स’ या त्यांच्या पुस्तकात त्यांनी माहितीच्या खुल्या व्यवस्थेचे समर्थन केले आहे. त्यांच्या मते अ‍ॅपल ही कंपनी सुरुवातीला अधिक खुलेपणा दाखवत होती, पण नंतर स्टीव्ह जॉब्ज यांच्या नेतृत्वाखाली तिच्या सेवा अधिक बंदिस्त झाल्या व याचीच पुनरावृत्ती माहितीसम्राट कंपन्यांमध्ये घडेल असे भाकीत वू यांनी त्याच वेळी केले होते, आता आपल्याला तेच घडताना दिसते आहे.