‘टु किल अ मॉकिंगबर्ड’ या १९६० साली प्रकाशित झालेल्या कादंबरीचा पुढला भाग तब्बल ५५ वर्षांनी प्रकाशित होणार ही गेल्या आठवडय़ात इंग्रजी ग्रंथविश्वातली सर्वात मोठी बातमी ठरली. एवढं काय आहे त्या कादंबरीत? याचं एक उत्तर म्हणजे हा लेख..
हार्पर ली.. १९६० सालची.. आणि आत्ताची. आणि ‘टु किल अ मॉकिंगबर्ड’च्या  पहिल्या आवृत्तीचे मुखपृष्ठ
या गोष्टीला निरागसतेच्या अंताची गोष्ट म्हणा, निरागसतेच्या अंतिम विजयाची गोष्ट म्हणा की माणुसकीच्या अटळ अभिव्यक्तीची गोष्ट म्हणा; ती एक गोष्ट आहे..

‘टु किल अ मॉकिंगबर्ड’ या कादंबरीइतकं वाचनसुख मला फार कमी ललित साहित्यकृतींनी दिलं आहे. अशा कादंबऱ्यांमध्ये मग मी राहायला जातो. तिच्यातली पात्रं मला दिसायला, भेटायला लागतात. कादंबरीतल्या तपशिलांमध्ये नसलेल्या सर्वसामान्य घडामोडींमधला त्यांचा वावर मला कळू लागतो. अ‍ॅटिकसशी माझी बातचीत फार झालेली नाही; पण जेम आणि स्काउट यांच्याशी, विशेषत: स्काउटशी माझी चांगली मत्री आहे.
आणि आता मोठी होऊन मेकाँबला परतलेली स्काउट भेटणार आहे! या नुसत्या कल्पनेने माझ्या वयातली कित्येक र्वष गळून पडत आहेत. तिला भेटायचं तर तिच्या संवेदनशीलतेला भेटायचं, नाही का?  ‘.. मॉकिंगबर्ड’ दर वेळी वाचताना विचाराने नाही, तरी संवेदनेने सात वर्षांचा झालोच होतो की!
स्काउटची ओळख करून द्यायला हवी. तिचं नाव मेरी लाउज िफच. तिचा भाऊ जेम जेरेमी अ‍ॅटिकस िफच. त्यांना आई नाही. थोरल्या जेमला कधी तरी आईची आठवण येते आणि तो उदास होतो. अशा वेळी स्काउट त्याला एकटा राहू देते. त्यांचा बाप अ‍ॅटिकस मेकाँब काऊंटीत वकिली करतो. एकदम सरळ माणूस. गांधीवादी म्हणावा इतका! कामामुळे त्याला मुलांकडे लक्ष द्यायला बिलकुल वेळ नाही. दोघे नुसते हुंदडतात. सुट्टय़ा लागल्या की डिल हॅरिस मेकाँबला येतो. आईबाप दोन्ही नसलेल्या डिलची कल्पनाशक्ती भलतीच तेज. त्यांना सांभाळताना काल्पुíनयाची त्रेधा उडते. अ‍ॅटिकस तिला ‘कॅल’ म्हणतो आणि ही मुलंही तिला ‘कॅल’च म्हणतात. काल्पुíनया काळी. ती अ‍ॅटिकसकडे घरकाम करते, त्याच्या पूर्ण विश्वासातली आहे पण ती त्यांच्याकडे रहात नाही. ‘त्यां’ची वस्ती वेगळी, गावकुसाबाहेर.
कोणाची आहे ही गोष्ट? कादंबरीच्या पहिल्याच वाक्यात स्काउट आपल्याला सांगून टाकते की, तिचा भाऊ जेम बारा वर्षांचा असताना त्याचा हात मोडला, पण त्यामुळे हात कोपरात थोडा वाकडा झाला तरी त्याला फुटबॉल खेळण्यात अडचण आली नाही. एका परीने जेमचा हात मोडण्याची ही गोष्ट आहे. दुसरीकडून या संपूर्ण गोष्टीवर बू रॅडलीची सावली पसरलेली आहे. बूचं नाव आर्थर. लहान असताना एकदा त्याने कागद कापता कापता शेजारून चाललेल्याच्या पायावर कात्री चालवली. तमाशा झाला. रॅडली कुटुंब एकदम कर्मठ. तेव्हापासून बू जो घरात बंद झाला, तो त्याचं नखही कोणी पाहिलेलं नाही. आता तो मोठा असेल. तारुण्याच्या पारही झाला असेल. आता त्या परिसरात बू हा बागुलबुवा झाला आहे. त्याचं नावच ‘बू’! आपल्याकडे लहान मुलांना ‘भॉक!’ करून घाबरवण्याची प्रथा होती; तिथे ‘बू’ असा आवाज काढून. तर रॅडली लोक हे िफच कुटुंबाचे शेजारी. त्यामुळे शेजारची ती बाजू खेळात वज्र्य. खेळात चेंडू रॅडलींच्या अंगणात गेला तर तो तिथून आणणे ही शौर्याची पावती. पण एकदा टायरमध्ये बसून गडगडत थेट रॅडलींच्या आवारात जाऊन आदळलेली असताना स्काउटला आतून कोणाला तरी प्रचंड हसू आलेलं ऐकू आलेलं आहे..
तशी ही गोष्ट अ‍ॅटिकसचीसुद्धा आहे. एकदम अिहसक माणूस. बॉब इवेल त्याच्या तोंडावर थुंकतो तर अ‍ॅटिकस खिशातून रुमाल काढून तोंड पुसतो, प्रत्युत्तर देत नाही. बॉब खिजवत विचारतो, ‘फाटू झालास का?’ अ‍ॅटिकस उत्तरतो, ‘नाही; म्हातारा झालो.’ स्काउटला कधी कधी वाटतं, आपल्या बापात काही ग्लॅमरच नाही. पण हाच अ‍ॅटिकस एके काळी त्याने पंधरा गोळ्या झाडून चौदाच उडते बगळे मेले, तर ‘काय ही नासाडी!’ अशी कुरकुर करायचा! ‘आपल्याला अचूक नेम साधता येणे, हा प्राणीजातीवर घोर अन्याय आहे’, हे जाणवल्यावर त्याने जी बंदूक टाकली ती टाकलीच..
मेकाँब एकदम इरसाल गाव. रेल्वे लाइन टाकताना सव्‍‌र्हेअरला दारूत बुडवून नकाशात फेरफार केल्याचा इतिहास. या लबाडीमुळे मेकाँब राहिलं. आता देशव्यापी मंदीच्या काळात सगळ्यांची होते तशीच मेकाँबकरांचीदेखील ससेहोलपटच होते आहे. अ‍ॅटिकसला त्याच्या कामाचा मोबदला बऱ्याचदा पशात मिळत नाही. कोणी भाजी आणून देतं, कुणी अंडी. स्काउटच्या वर्गातल्या रॉजर किनगहॅमकडे तर डबाच नसतो. पण किनगहॅम मानी लोक. तो हडकुळा मुलगा उपाशी राहील, पण मागणार नाही. त्याच्यामुळे एकदा स्काउटला शिक्षा होते म्हणून ती त्याला मधल्या सुट्टीत चोप देते तर तो मार खातो, पण अपमान करून घेत नाही. त्याच्या वडिलांना अ‍ॅटिकसने कायद्याच्या कसल्याशा कामात मदत केलेली असते तेव्हा त्यांच्याकडे पसे नसतात. पण त्यानंतर अ‍ॅटिकसच्या मागच्या दरवाजाशी अधूनमधून इतकी ताजी भाजी येत जाते की देणं पुरं होऊन जातं.
पण जेव्हा गोऱ्या तरुण मुलीवर बलात्कार केल्याच्या आरोपाखाली अटकेत असलेल्या काळ्या टॉमला खटला न होताच कोठडीत जीव गमवावा लागू नये, म्हणून स्वत: अ‍ॅटिकस कोठडीबाहेर रात्र काढत असतो; तेव्हा अ‍ॅटिकसला न जुमानता टॉमला खतम करण्यासाठी आलेल्या टोळीचं नेतृत्व किनगहॅमकडेच असतं. काय घडतं तिथे? स्काउटचा कोणता सहभाग असतो त्या प्रकरणात?
ही गोष्ट टॉमची आहे का? ‘जज्ज टेलरने टॉमचा बचाव करण्याचं काम अ‍ॅटिकसवर सोपवलं आहे.’  ‘पण अ‍ॅटिकस खरोखरच त्याचा बचाव करणार म्हणतो आहे!’ हा संवाद ऐकून गोंधळात पडलेल्या स्काउटला शेवटी शहाणपण येतं का? गावभर जेव्हा हा एकच विषय चघळला जात असतो तेव्हा आपोआपच लहान मुलांच्याही कानावर काही बाही पडतं आणि स्काउट अ‍ॅटिकसला विचारते, ‘अ‍ॅटिकस, रेप म्हणजे काय?’ (हो, स्काउट आणि जेम बापाला नावाने हाक मारतात. त्यांच्यावर ‘चांगल्या मॅनर्स’चे संस्कारच नसतात!) तो एक क्षणभरही न चाचरता म्हणतो, ‘कार्नल नॉलेज विदाउट कन्सेन्ट!’ ळ ‘ल्ल६ह्ण याचा बायबलप्रणीत अर्थ मला माहीत होता; पण त्याचा इतका चपखल उपयोग सुचला नव्हता.
बापाशी हवं ते बोलणाऱ्या, तो पेपर वाचत असताना तिला मांडीवर बसवत असल्यामुळे आपोआप वाचायला शिकलेल्या, मुलीला शोभेसे कपडे न घालणाऱ्या आगाऊ स्काउटची गोष्ट आहे का ही?
माझी अभिरुची मला सांगते की जेव्हा आशय हाच विषय बनतो आणि कथा-कादंबरीतली पात्रं आशयाची चर्चा करत तो वाचकापर्यंत पोहोचवू लागतात, तेव्हा कथेचा, कादंबरीचा निबंध बनतो. नाटकाचं प्रबोधनपर व्याख्यान बनतं. आशय हा दोन ओळींच्या मधल्या मोकळ्या जागेतच असायला पाहिजे. चविष्ट खाता खाता पौष्टिक पचलं पाहिजे आणि पौष्टिक पचण्यासाठी पदार्थ चविष्ट असायला पाहिजे!
उपमा बाजूला ठेवून बोलायचं, तर कादंबरीला सशक्त प्लॉट पाहिजे. कथानक पाहिजे. ‘गोष्ट’ पाहिजे. या कादंबरीवर निघालेल्या चित्रपटाच्या नायकाच्या, म्हणजे अ‍ॅटिकसच्या भूमिकेत ग्रेगरी पेक होता. तो म्हणाला, ‘ही कादंबरी वाचून मला माझं गाव आठवलं; प्रत्येकालाच बहुधा असा अनुभव येत असेल.’ ग्रेगरी पेकची ही कॉमेंट कादंबरीच्या आशयाबद्दल नाही. तो म्हणतो आहे की ही गोष्ट मला जिवंत वाटते. हा पदार्थ त्याला चविष्ट वाटला. प्रत्येकाला तसा वाटेल, हा विश्वास त्याला वाटला. असं जेव्हा होतं तेव्हा कलाकृतीची संस्कार करण्याची क्षमता कोणत्याही प्रवचनापेक्षा, निबंधापेक्षा जास्त ठरते. युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका या देशाच्या अलाबामासारख्या दक्षिणेकडच्या राज्यात वर्णद्वेष किती कडवा होता (आणि आहे) आणि त्याचे परिणाम कोणाला कसे भोगावे लागतात, हे आपल्याला स्काउट तिच्या सात वष्रे वयाच्या निरागस मानसिकतेतून सांगत नाही. हे अ‍ॅटिकस सांगत नाही की काल्पुíनया. हे वर्णद्वेषी वास्तव कादंबरीच्या मागे कॅनव्हाससारखं पसरलेलं असतं. तंबोऱ्यासारखं अखंड, अविरत ऐकू येत राहातं. त्यापुढच्या गोष्टीला निरागसतेच्या अंताची गोष्ट म्हणा, निरागसतेच्या अंतिम विजयाची गोष्ट म्हणा की माणुसकीच्या अटळ अभिव्यक्तीची गोष्ट म्हणा; ती एक गोष्ट आहे, अत्यंत वाचनीय गोष्ट आहे, लहान मुलीच्या नजरेतून (कादंबरी स्काउटच्या निवेदनातून साकारते, हे मी सांगितलं का?) सांगितल्यामुळे किती तरी पूर्वग्रह आपोआप बाजूला सारले जातात (आणि काही दृष्टिकोन गळी उतरवले जातात!) आणि एक प्रकारे कॅरिकेचरिस्ट व्यक्तिरेखांद्वारे सांगितलेल्या महाकाव्याचा सूर त्यातून ऐकू येतो हे मात्र निश्चित खरं.
एक तरुण मुलगी आपल्या गावी परतून स्वत:च्या संस्कारांचा शोध घेते, अशी एक कादंबरी हार्पर लीने लिहिली. ती प्रकाशकांना दाखवल्यावर प्रकाशक म्हणाला, ते संस्कार होतानाची गोष्ट का लिहीत नाहीस? हार्पर ली नवोदित लेखिका होती. तिने प्रकाशकाचं ऐकलं आणि..
‘टु किल अ मॉकिंगबर्ड’ लिहिली! बापरे.. चार कोटी प्रती खपल्यात तिच्या! मग मूळ कादंबरी छापायची राहूनच गेली. ती आत्ता, पन्नास वर्षांनी सापडली. आता तिला सीक्वेल तरी कसं म्हणायचं? असो. मला स्काउट केव्हा भेटते, असं झालं आहे.

-हेमंत कर्णिक