बिनविचारकण्याचे पदवीधर ही आपल्या गुरुजनांची निर्मिती असेल, तर गुरुपौर्णिमेसारखा सण साजरा करणे आणि नरोटीची उपासना करणे यात काही फरक नसणारच. ते तसे झालेच आहे..
पिग्मींचिया देशी। सारेच ऐसे।
मुक्रीही भासे। अमिताभ
आपल्या  गुरुवर्याचे संप मिटून सगळे निकाल त्या त्या वेळेवर लागलेले आहेत. शाळा-महाविद्यालयांच्या प्रवेश प्रक्रिया सुरळीत पार पडलेल्या आहेत. त्यामुळे मंत्रालयातील शालेय व उच्च व तंत्रशिक्षण वगरे मंत्री खुशीत आहेत. काही घोळ झाले असते, तर त्यांना दूरचित्रवाणीवर चमकण्याची संधी मिळाली असती हे खरे. पण घोळ झाले म्हणजे ते निस्तरणे आले. त्याने काम वाढते. त्यापेक्षा हे बरे! मात्र या सुरळीतपणामुळे शैक्षणिक बिटवाल्या वार्ताहरांना जरा चुकल्या चुकल्यासारखेच वाटत होते. परंतु आता वैद्यकीयच्या प्रवेश परीक्षांचा घोळ सुरू झाल्यामुळे त्यांचेही जीव भांडय़ात पडले आहेत. तिकडे एव्हाना शाळा-महाविद्यालयांतील गुरुजनांच्या तासिकांची वेळापत्रकेही तयार झाली आहेत. एकंदर वातावरण असे जीवनशिक्षणमय आहे. अशा काळात, येत्या सोमवारी गुरुपौर्णिमा यावी हा म्हणजे दुग्धशर्करायोगच! (खरे तर हा दिवस नेहमी याच काळात येत असतो. परंतु त्यालाच योग वगरे म्हटले म्हणजे प्रतिपादनास ग्रॅमभर वजन येते, एवढेच!) तर येत्या सोमवारी गुरुपौर्णिमा आहे. महर्षी व्यास हे जगद्गुरू. आज जे काही साहित्य प्रसवले जात आहे ते सर्व व्यासांचे उच्छिष्ट मानले जाते, म्हणजे पाहा त्या माणसाची प्रतिभा किती खोल! अशा उत्तुंग माणसाची पूजा या दिवशी केली जाते. शिवाय बुद्धाने धम्मचक्रप्रवर्तन केले तोही हाच, आषाढी पौर्णिमेचा दिवस. तो आपण गुरुपौर्णिमा म्हणून साजरा करतो. गुरू या शब्दाचा अर्थच मुळी थोर, मोठा असा आहे. आपल्या जीवनप्रवाहाला गती आणि दिशा देणारा, आपल्याला अंधारलेल्या आयुष्यात ज्ञानज्योती उजळवणारा, आपले डोळे उघडवणारा, प्रसंगी कान पिळणारा थोर पुरुष म्हणजे गुरू. त्याच्यावाचून अन्य सोय नाही. तरणोपाय नाही. म्हणजे अगदी जगद्गुरू तुकोबाराय झाले तरी त्यांनाही सत्यगुरूराय हवाच. तुकोबांना बाबाजी चतन्य भेटले. विवेकानंदांना परमहंस सापडले. गांधींना गोखले मिळाले. आपल्या सारख्या सर्वसामान्यांना असेच कोणी भेटतील, असे नव्हे. किंबहुना असे कोणी भेटले असते तर आपलेच नाव वरच्या यादीत नसते का आले? परंतु आपल्याला जे भेटले, ज्यांनी ओनामा दिला, ज्यांनी बोट धरून आयुष्याचा की-बोर्ड शिकवला, ते भलेही कोण्या शाळेतले मास्तर असोत, ते आपल्यासाठी गुरुब्र्रह्मा गुरुर्वष्णिुच असतात! त्यांच्याप्रती आपण जरूर कृतज्ञता व्यक्त करावी. भावना कृतज्ञतेसारख्या असल्या, तरी त्या साठून राहिल्या की त्रासदायक ठरतात. तेव्हा त्यांचे विरेचन होणे हे चांगलेच. तर ते आपण असे दिवस साजरे करून करतोच. पण हे झाले ज्याचे-त्याचे, वैयक्तिक पातळीवरचे. तेथेही संभवत: सगळ्यांच्याच वाटय़ाला काही चितळे मास्तर येतात असे नाही. अनेकांना चितळ्यांऐवजी चाटेच जास्त भेटतात. अर्थात त्यांनाही कोणी आपले व्यास आणि बुद्ध मानू शकते. तो ज्याच्या त्याच्या आकलनाचा आणि निवडीचा प्रश्न आहे. पण अवघ्या समाजाचे काय?
पूर्वीचा काळ अहाहा किती रम्य आणि आताचा जमाना कित्ती बरे वाईट असे म्हणणाऱ्यांचे पानच नव्हे, तर देठही पिकलेला असतो, हे काही वेगळे सांगायला नको. आम्हीही जुने ते सोनेच असते असे मानत नाही. पण जुना, अगदी चाळिसेक वर्षांमागचा काळ पाहिला, तरी एक गोष्ट खासच लक्षात येते, की तेव्हा सगळ्याच क्षेत्रात गुरू म्हणावीत अशी माणसे होती. त्यांच्या विचारांच्या, नतिकतेच्या धाकात समाजगाडा धावत होता. विनोबा भावे, साने गुरुजी, पु. ग. सहस्रबुद्धे, र. धों. कर्वे, लक्ष्मणशास्त्री जोशी, मे. पुं. रेगे, दुर्गाबाई भागवत, नरहर कुरुंदकर, अनंतराव भालेराव, गोविंदराव तळवलकर.. नावे तरी किती घ्यायची? महाराष्ट्र नामक गुरुकुलाचे हे कुलगुरूच! सत्ता यांना वचकायची आणि समाज त्यांचे ऐकायचा. आज ती परिस्थिती नाही. लोकांमागून चालणारे पुढारी आज पायलीला पन्नास आहेत आणि मोक्षमार्ग दाखवण्याचा दावा करणारे ह-व्यास महर्षी तर अडक्याला तीन मिळतील. अशा लोकांचे दुर्भिक्ष कधी नव्हतेच. पठारे सर्वत्रच असतात. सुळके थोडेच असतात. अशा शिखरांनीच समाजाचे आभाळ पेललेले असते. आजच्या काळाचे दुखणे हेच आहे, की आज डोंगराएवढी माणसेच दिसत नाहीत. आपल्या सांस्कृतिक ऱ्हासकाळाचेच हे लक्षण. समाजात आज अनेक प्रश्न आहेत. राज्यकर्त्यां वर्गाची अनतिकता, र्सवकष भ्रष्टाचार हा तर त्यातला प्रमुख प्रश्न. कपाळावर बुद्धिजीवी असा बारकोड लावून फिरत असलेल्या आपल्या तथाकथित सांस्कृतिक पुढाऱ्यांनी त्यावर काही बोलावे, काही लिहावे, ही काही मोठी अपेक्षा नाही. पण त्यांना रस कोटय़ातल्या घरात, सरकारी समित्यांत, पुरस्कारांत आणि अनुदानांत म्हटल्यावर ते मौनाचीच अक्षरे गिरवणार, हे झालेच. पण हे काही एकाच दिवसात झालेले नाही.
मध्यमवर्ग चिरफाळणे आणि समाजाचे सामाजिक-सांस्कृतिक पुढारपण राजकीय नेत्यांकडे जाणे ही गेल्या तीस-पस्तीस वर्षांतली प्रक्रिया आहे. जागतिकीकरणामुळे जी एक अर्थप्रधान व्यवस्था निर्माण झाली, तिचाच हा परिणाम आहे. या व्यवस्थेने मध्यमवर्गाचा सामाजिक-आíथक स्तर उंचावला आणि त्याच्या मूल्यात्मक, सांस्कृतिक प्राथमिकता बदलल्या. याच मध्यमवर्गातून आलेले गुरुवर्य मग बेसिक आणि डीएच्या हिशेबातच रमले. वेतनवाढीसाठी संप करताना दिसू लागले. शाळेत भाकऱ्या थापू लागले. शाळांचे गोठे आणि शिकवणीवर्ग मोठे झाले. विद्यापीठांत पदव्यांचे बाजार सुरू झाले आणि प्राध्यापक पी.एचडी.सारख्या पदव्याही विकत आणू लागले. महंतें महंत करावे, हे विद्यापीठांचे काम. पण मुळात आडातच नसल्याने पोहऱ्यात कोठून येणार हा प्रश्न होताच. तेव्हा हे कामही होईनासे झाले. समाजाला जणू आता बुद्धिजीवींची गरजच नाही, अशा पद्धतीने हे सगळे चाललेले आहे. राजकीय नेत्यांना गुरुता प्राप्त झाली ती यामुळेच. आता यावर कोणी म्हणेल, की पण विद्यापीठांतून तर मोठमोठे पदवीधर पुष्कळच बाहेर पडतात. तेव्हा येथे बुद्धिजीवी या शब्दाचा अर्थ मुळातून समजून घेतला पाहिजे. ऑक्सफर्ड डिक्शनरीनुसार बुद्धिजीवी म्हणजे स्वतंत्र विचाराची इच्छा धरणारा, राष्ट्राचा एक विभाग. असा विभाग आपली विद्यासंकुले निर्माण करतात, असे म्हणण्याचे धाडस आजतरी कोणी करणार नाही. असे बिनविचारकण्याचे पदवीधर ही आपल्या गुरुजनांची निर्मिती असेल, तर गुरुपौर्णिमेसारखा पवित्र सण साजरा करणे आणि नरोटीची उपासना करणे यात काही फरक नसणारच. ते तसे झालेच आहे. किंबहुना पोकळ सांस्कृतिक-सामाजिक पुढारी आणि खुज्या सेलिब्रिटी यांच्या जमान्यात सगळ्याच गोष्टींचे इव्हेंटीकरण झाले आहे. त्या नशेत मग, एखादा खुजा अभिनेता चार पावसाळे अधिक पाहिल्याच्या अर्हतेवर स्वत:ला महागुरू म्हणवून मिरवताना दिसला, तरी त्याचे आपणांस काहीच वाटेनासे झाले आहे. दूरचित्रवाणी वाहिन्यांची ही देणगीच म्हणायची! त्यांच्यामुळे आता गल्लीतले नेतेही दिग्गज आणि नेटपंडितही विचारवंत झाले आहेत. आणि ते स्वाभाविकच आहे. जेव्हा सगळ्याच गोष्टींचे किरकोळीकरण होते, तेव्हा प्रौढ साक्षरही विद्वान वाटू लागतात. आता अपवाद सगळीकडेच असतात. पण परिस्थितीचा लसावि हेच सांगतो आहे, की यापुढच्या गुरुपौर्णिमा जरा जपूनच साजऱ्या कराव्या लागणार आहेत. काय सांगावे, आपण मेणबत्त्या घेऊन एखाद्या समाजगुरूस पूजण्यास जावे आणि तो महागुरू निघावा!