राक्षसी टोलधाडीच्या चिंधडय़ा उडवण्यासाठी राज ठाकरे यांच्या आंदोलनाला वाहन धारकांनी पाठिंबा दिला त्यामुळे त्यांचे हे आंदोलन यशस्वी झाले आणि अखेर सरकारला राज ठाकरे यांना चच्रेला पाचारण करावे लागले. गेली अनेक वष्रे टोल च्या माध्यमातून सरकारने जनतेच्या चालवलेल्या लुटीला कोणीतरी वाचा फोडणे आवश्यक होते. सनदशीर मार्गाने हे विद्यमान सरकार काही कोणाच्या ताकास तूर लागू देत नाही तेव्हा रस्त्यावर उतरणे क्रमप्राप्त होते. अनेक टोलनाके हे अनधिकृत आहेत, अनेक टोल नाक्यावर वाहन धारकांची अक्षरश लूटच केली जात आहे, हे बेकायदा उद्योग सरकारला दिसत नाहीत आणि राज ठाकरे यांचे आंदोलन बेकायदा ठरवले जाते, हा अजब न्याय आहे .
सरकारे एवढी बावळट असतात का असा प्रश्न पडतो; कारण जो कोटींचा कोटी महसूल एखादी खासगी कंपनी राजरोसपणे आणि सगळ्यांच्या देखत कामावत, लुटत आहे आणि सरकार ढिम्म बसून आहे. जर हाच महसूल जर सरकारच्या तिजोरीत जमा झाला तर राज्यात सुधारणा होऊ शकतात, याची विद्यमान सरकारला जाणीव नसावी याचे आश्चर्य वाटते.

काळोख रोखण्यासाठी चर्च काय करणार?
‘ गिरजाघरांतील काळोख’ हे संपादकीय (८ फेब्रुवारी) वाचून एक काथोलिक म्हणून मला दुख वाटले नाही. या बाबी जगाला माहीत होत्या. युरोप- अमेरिकेत गेली दहाएक वष्रे धर्मसेवकांकडून होणाऱ्या बालकांच्या लंगिक शोषणाच्या बातम्या येत होत्या. या घटनांना वेळीच रोखणे रोमला शक्य होते, मात्र पोप पौल दुसरे यांचे प्रयत्न त्या दिशेने झाले नाहीत. त्याची फळे आता दिसतात. संयुक्त राष्ट्रसंघाने अहवाल देऊनही रोम आताही तो अहवाल अमलात आणण्याच्या मनस्थितीत नाही. ही भाविकांच्या दृष्टीने गंभीर बाब आहे. १९६० च्या काळापर्यंत धर्मसेवकांना सकाळ- संध्याकाळ हातात रोझरी घेऊन चर्चच्या आवारात प्रार्थना करताना पाहिले आहे. आज असे चित्र दुर्मिळ आहे. सध्या चर्चमध्ये जमिनीचा न्याय ते पसा कसा गोळा करावयाचा या साठी नऊ-दहा कमिटय़ा असतात. पूर्वी काथोलिक शाळांतून िहदू मुख्याध्यापक झाले; आता त्या ठिकाणी धर्म सेवक- सेविका दिसतात.
आज सरकारी, खासगी क्षेत्रात काथोलिक उच्च पदी आहेत. मुंबईचे पोलीस प्रमुख म्हणून रिबेलो-मेंडोंसा हे काथोलिक आले, मात्र ते शाळा-कॉलेजचे मुख्याध्यापक होऊ शकले नसते कारण त्या क्षेत्रात सामान्य काथोलिकांना (धर्मसेवक नसलेल्यांना) आता स्थान नाही.
येशूच्या नावाने प्रसिद्धी व पसा गोळा करणे हाच काथोलिक चर्चा मोठा धंदा झाला आहे. येशूचा सेवेचा धर्म मागे पडला आहे. भौतिक जगात मोह असतो, त्या पासून दूर रहा असे येशूने सांगितले आहे, मात्र त्याकडे धर्म सेवकांचे लक्ष नाही. मुंबईचे माजी महापालिका आयुक्त सदाशिव तिनईकर एकदा मला म्हणाले होते की,  येशूचा  सेवेचा धर्म चर्च विसरलेले दिसते. त्यांना मी कारण विचारले. ते म्हणाले, ‘त्यांच्याकडून नेहमी माझ्याकडे जमिनींबद्दल चौकशी होते’.
आमच्या वसईत ‘जवळपास २८ टक्के काथोलिक चर्चमध्ये जात नाहीत’ असे दहा वर्षांपूर्वी मराठी लेखक फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांनी लिहिले होते, आज ती संख्या ४०- ४५ टक्के आहे, कारण एकच धर्म सेवकांचे सार्वजनिक वागणे. युरोपमध्ये काथोलिक धर्म संपण्याच्या मार्गावर आहे. आता रोम काय करते ते पाहूया!
मार्कुस डाबरे,  पापडी, वसई

अंगणवाडी सेविकांचे हाल दिसत नाहीत?
निवडणुका जसजशा जवळ येतील तसतसा राजकीय पक्षांना जनतेचा पुळका येणारच.. त्यातही, ज्या आंदोलनातून जास्तीत जास्त राजकीय फायदा मिळेल ती ऊसदर, टोल यासारखी आंदोलने करून चमकेगिरी करण्याची संधी घेऊन हे पक्ष एकमेकांशी स्पर्धा करत असतात.
 परंतु भरमसाट कामे, आधीच कमी असलेले व वेळेवर न मिळणारे मानधन, संपकाळातील मानधन कापणे यातून वेठबिगारांपेक्षा वेगळी वागणूक न मिळणे अशा स्थितीतील गरीबबापडय़ा अंगणवाडी सेविकांच्या प्रश्नांकडे, महिनाभर चाललेल्या त्यांच्या संपाकडे लक्ष देण्यास या पक्षांना वेळ नाही, कारण त्यांचे राजकीय मूल्य शून्य आहे! महिनाभरानंतरही त्यांच्या मागण्यांकडे लक्ष का दिले जात नाही? राजकीय पक्षही या बाबत इतके असंवेदशील कसे?
सुरेश डुंबरे, ओतूर (पुणे).

युतीचा भाव उतरेल, असे सरकारला वाटते का?
मनसेचे रास्ता रोको आंदोलन स्थगित ही बातमी वाचली (लोकसत्ता नेट आवृत्ती) आंदोलनाची नौटंकी सर्व महाराष्ट्राने चार तास अनुभवली, राज ठाकरे यांना ताब्यात घेतले- सोडून दिले ,आंदोलन तहकूब झाले आता ते मुख्यमंत्र्यांना टोल प्रश्नासंबंधी भेटत आहेत. िहसक कार्यकत्रे नेत्यालाही खिजगणतीत ठेवत नाहीत याचा प्रत्यय या निमित्ताने आला. बारावीच्या प्रयोग-परीक्षांना त्रास होणार नाही कारण हे आंदोलन महामर्गावर आहे हे म्हणणाऱ्या मनसेला महाराष्ट्राचा भूगोल ठाऊक नाही असे दिसते, कारण शाळांमध्ये परीक्षेला जाण्यासाठी अनेक विद्यार्थ्यांना महामार्ग ओलांडावा लागतो.
मनसेच्या या आंदोलनामुळे शिवसेना भाजप युतीचा भाव कमी होईल एवढय़ा मर्यादित हेतूने हे सरकार या आंदोलनाकडे पाहात असेल तर तो त्यांचा भ्रम आहे.   
गार्गी बनहट्टी, मुंबई</strong>

जसे राजकारणी, तसेच हेही
‘अयोग्य आणि असमंजस’ हा अन्वयार्थ (११ फेब्रुवा्ररी) कायदा राबविणाऱ्यांच्या नतिक अधपतनावर सार्थ भाष्य करतो. गेल्या काही महिन्यांत न्यायालयांकडून महिलांबाबत इतकी उलटसुलट विधाने केली जात आहेत आणि काहीसे वादग्रस्त निकालसुद्धा दिले जात आहेत. त्यामुळे समाजात वाद-चर्चा झडत आहेत. अशा वेळी, न्यायाधीश मंडळीच अनतिक वर्तन करताना पकडली गेली तर त्यांनी स्वत आपापल्या पदाचा राजीनामा दिला पाहिजे होता. पण आपल्या देशात समस्त राजकारण्यांनी गुन्हे करूनही आपापले पद उपभोगण्याची परंपरा कायम केलेली आहे. त्यामुळेच एका महिला वकिलाने अत्याचाराचा आरोप करूनही निवृत्त न्या. गांगुली आपले पद सोडायला तयार नव्हते; तर हे न्यायाधीश आम्ही चुकलोच नाही असे म्हणत आहेत.
एकूणच पदारूढ सरकारी अधिकारीवर्ग स्वतला वेगळे समजतो यात वाद नाही. समाजाला शिस्त लावताना स्वतला ते नियम लागू पडतात हे त्यांना कधी उमजणार?
-माया हेमंत भाटकर, चारकोप गाव, मुंबई.

भारतीय लोकशाहीचा मर्माभ्यास पुढे जावा
‘लोकशाहीच्या वास्तवाचा मर्मज्ञ’ हा लेख (११ फेब्रु.) वाचला. अनेक लोकांना राजकारणात रसच नसेल तरीही राज्यव्यवस्थेला ‘लोकशाही’ का म्हणायचे असा प्रश्न प्रा. रॉबर्ट डाल यांना पडला. त्याअर्थी ही समस्या भारतापुरतीच नाही हे स्पष्ट होते. ‘नागरिकांना राजकारणात रस नसूनही लोकशाही टिकते कशी, एखादा मोठा बहुमताचा गट लोकशाहीला गिळंकृत करून हुकूमशाही चालवू शकतो..तसे का होताना दिसत नाही’ असे डाल यांचे निरीक्षण असले तरी रथयात्रा, गुजरात दंगली, ‘जनमताचे निर्णय’ (रामलीला मदानात दिल्ली विधानसभेचे अधिवेशन भरवून तेथे जनलोकपाल विधेयक पारित करण्याचा हट्ट), खाप पंचायतींचे प्राबल्य वाढणे अशी वळणे मिळाली तर संख्याशाही ही लोकशाहीला, उदारमतवादी मूल्यांना गिळंकृत करेल असे भारतात आणि इतर तिसऱ्या जगात होण्याचा धोका आहे असे वाटते.
सदाचरण, नीतिमत्ता, स्वच्छ चारित्र्य या मूल्यांकडे दुर्लक्ष करून गुंड आणि भ्रष्टाचारी नेत्यांनासुद्धा लोक भरभरून मते का देतात? अन्याय-निवारणाबाबत वैयक्तिक पातळीवर उदासीन असणारा नागरिक झुंडशाहीच्या बुरख्याआडूनच का आक्रमक होतो? किंबहुना कानाखाली आवाज काढणे, खळ्ळखटॅक करणे, राडा /शक्तिप्रदर्शन करणे, नियम न जुमानणे याचे अप्रूप आणि आकर्षण का आहे? ते वाढत आहे काय? ‘लोकशाहीत रस नसणे’ सार्वत्रिक असले तरी त्याबद्दल फक्त येथेच तिरस्कार आहे काय, असल्यास का? सरंजामी अर्थव्यवस्थेच्या मुशीत राहणाऱ्या तिसऱ्या जगातील समाजावर भांडवलशाही अर्थव्यवस्थेच्या मानसिक जडणघडणीचे संस्कार पुरेसे झाले नाहीत काय? असे असल्यास या घटकाचा परिणाम पाश्चिमात्य/भांडवलशाही जगातील समाजाचे वर्तन आणि तिसऱ्या जगातील समाजाचे वर्तन यामधील फरकावर कितपत होतो? याचा अभ्यास होणे आवश्यक वाटते. त्यामुळेच भारतासारख्या व्यामिश्र लोकशाहीकडे लक्ष वेधणारे आणि येथील समस्येभोवती केंद्रित झालेले संशोधन होऊन हेराल्ड लास्की, रॉबर्ट डाल यांचे कार्य अव्याहत राहावे.
-राजीव जोशी, पुणे.