‘छत्रपती स्मारकासाठी सरकारची लगीनघाई’ (लोकसत्ता, ४ फेब्रु. ) ही बातमी वाचली. आजमितीला राज्यात दररोज किमान एक आंदोलन सुरू आहे. अपंगांचे प्रश्न प्रलंबित आहेत, अंगणवाडी सेविका गेला महिनाभर न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत. कनिष्ठ महाविद्यालयातील अध्यापक संपावर गेले आहेत. या सर्व मागण्या आíथक आहेत, सरकारकडे त्या पूर्ण करण्यासाठी पसे नाहीत. छत्रपती स्मारकाला ५३० कोटी रुपये खर्च येणार आहे. त्यासाठी आíथक तरतूद आहे, पण राज्यातल्या गोरगरीब, अपंग, शिक्षक यांना मात्र सरकार टोलवत आहे.
या सरकारला छत्रपतीही समजलेले नाहीत आणि त्यांचे उचित स्मारक कसे करायचे याची जाणीवही त्यांना नाही.

दुरावणारे भारतीय हिरे..
अमेरिकेच्या महाशल्यचिकित्सक पदावर नियुक्ती झालेले डॉ. विवेक मूर्ती यांच्याबद्दल (व्यक्तिवेध, ५ फेब्रुवारी) वाचून या मूळच्या भारतीय व्यक्तीचा अभिमान वाटला. सत्या नाडेला मायक्रोसॉफ्टचे नवे सीईओ झाले, सुंदर पिचई गुगलचे वरिष्ठ उपाध्यक्ष झाले.. ही भारतीय व्यक्तींनी परदेशात उच्च पदं भूषवण्याची आणखी काही उदाहरणं.
या व्यक्ती कदाचित शालेय शिक्षणापासूनच तिकडे राहून तिकडच्याच नागरिक झाल्या असतील; तरीही असं एक शल्य आहे की हे मूळचे हिरे भारताच्या खाणीतले पण त्यांना पलू पडले अमेरिकेत आणि त्यांच्या कर्तृत्वाचा फायदाही अमेरिकेलाच. ते स्वत नाही तरी त्यांचे पालक तिकडे जाऊन स्थायिक झाले असतील. आजकाल बरीच मुलं तिकडे शिक्षणासाठी तिकडे जातात, स्वततल्या गुणांना चमक आणतात आणि मग तिथेच नोकरी-व्यवसायाच्या निमित्तानं स्थायिक होऊ पाहतात. याचा अर्थ भारतात त्यांना योग्य शिक्षण मिळत नाही असा मुळीच नाही. पण त्यात सातत्य राहू शकत नाही. त्याला कारण शिक्षणक्षेत्रातही आणलं जाणारं राजकारण आणि आíथक हितसंबंधांचं प्राबल्य. त्यामुळे शिक्षण अडथळ्यांचं होतं आणि नोकरीची हमीही राहत नाही. भारतरत्न सी. एन. आर. राव यांनीही भारतात शास्त्रज्ञांना आवश्यक यंत्रणा, पसा आणि मोकळीक मिळत नाही अशी खंत बोलून दाखवल्याचं आठवतं. तेव्हा राज्यकत्रे, राजकारणी नेते आणि समाजधुरीण यांनी यावर गांभीर्यानं विचार करून आपल्याकडच्या हिऱ्यांना बाहेरची कोंदणं बघावी लागणार नाहीत, अशी परिस्थिती भारतात निर्माण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे.
श्रीपाद पु. कुलकर्णी, बिबवेवाडी, पुणे</strong>

मोदींची भलामण चुकीचीच
‘पवार आणि मोदी परस्परांना पूरक’ ही बातमी (लोकसत्ता, ४ फेब्रुवारी) वाचली. पवार यांच्यासंदर्भात बोलणे कठीण आहे. ते कधी शब्द फिरवतील हे सांगता येत नाही. मात्र त्यांनी मोदी यांना दिलेले समर्थन अयोग्य आहे. मोदी यांनी भले कुणाला ठार मारले नसेल पण ते गुजरातचे मुख्यमंत्री असताना २००२ साली शेकडो निष्पाप मुसलमान मारले गेले तेव्हा त्यांच्या पक्षाचे आमदार जमाव घेऊन रस्त्यातून फिरत, यांना मारा, त्यांना मारा हे सांगत होते हे कसे नाकारता येईल?
मुसलमान मारले जात असताना गुजरातमधील सरकारी यंत्रणा शांत होती. याबद्दल एका मुलाखतीत मोदी यांनी ‘रस्त्यावर गाडी भरधाव जाताना चाकाखाली येणारी कुत्री मरतात’ अशा अर्थाचे विधान केले होते! मोदींना न्यायालयांनी निदरेष ठरवल्याचे सांगणाऱ्यांत आता पवारही सामील झाले असतील, परंतु निव्वळ अशा प्रकारे न्यायालयांचा हवाला देऊन मोदींची भलामण करणे चुकीचे का ठरते, हे सांगणारा ‘रीडिंग द क्लीन चिट’ हा पत्रकार विनय सीतापती यांचा लेख दिनांक ३ फेब्रुवारी २०१४ च्या ‘इंडियन एक्स्प्रेस’मध्ये प्रसिद्ध झाला आहे. हा लेख मोदी यांचा राजकीय नादानपणा दाखवून देणारा आहे.
मार्कूस डाबरे, वसई

भ्रष्टाचाराची स्थिती वाईट नाही, म्हणजे कशी?
‘भ्रष्टाचारासंबंधी आत्यंतिक वाईट अवस्था नाही -चिदंबरम’ ही बातमी (३१ जानेवारी) वाचली. चिदंबरम यांचे हे विधानच ‘आत्यंतिक वाईट’ आहे. भ्रष्टाचार पाहणी अहवाल २०१३ नुसार १७७ देशांतील भ्रष्टाचाराची पाहणी करण्यात आली. यामध्ये डेन्मार्क हा सर्वात कमी भ्रष्टाचार असणारा देश आहे. या यादीत भारताचा क्रमांक ९४ वा आहे. म्हणजे ९३ देशांमध्ये भारतापेक्षा कमी भ्रष्टाचार होतो. असे असतानाही आत्यंतिक वाईट परिस्थिती नाही असे म्हणणाऱ्या चिदंबरम यांना आणखी किती भ्रष्टाचाराची अपेक्षा आहे? विकास, भ्रष्टाचार निर्मूलन या बाबतीत खरे तर आपण एका-एका देशाला मागे टाकण्याचा प्रयत्न करणे आवश्यक आहे.
‘परिस्थिती अजून वाईट नाही’ असे आपण जेव्हा म्हणतो, तेव्हा हा भ्रष्टाचार आम्हाला सुसह्य आहे, असा याचा अर्थ होतो. मंत्री, आमदार, खासदार इत्यादी लोकांना तो सुसह्य असेलही! पण सामान्य जनता या भ्रष्टाचाराला किटलेली आहे. पावलोपावली भ्रष्टाचाराचा सामना सामान्य जनता करत असते. त्याचं सोयरसुतक राजकारण्यांना नाही, हेच चिदंबरम यांच्या विधानावरून स्पष्ट होते.  
इतर देशांमध्येही भ्रष्टाचार आहे, असेही चिदंबरम यांनी पुढे म्हटले आहे. असेलही. परंतु,  टूजी घोटाळा, कोळसा घोटाळा असे महाकाय घोटाळे क्वचितच सापडतील.
ही मुलाखत चिदंबरम यांनी ‘बीबीसी’ला दिली आहे. त्यामुळे जगात आपल्या देशाची प्रतिमा खराब होऊ नये म्हणून कदाचित त्यांनी असे विधान केले असेल. परंतु, जगभरात आपल्या स्वच्छ कारभाराची नितळ प्रतिमा तयार करण्यासाठी फक्त बोलण्यापेक्षा प्रत्यक्ष कृतीही आवश्यक आहे.
संदेश दशरथ कासार, अकोले

मैत्रीतली नैतिकता आपणच पाळायची?
भारत-पाकिस्तानचे सांगीतिक सूर एकत्र आणण्यासाठी दोन्ही देशांच्या कलाकारांचा समावेश असलेल्या बॅण्डच्या विरोधात शिवसेनेने मंगळवारी मुंबईत आंदोलन केले, हे योग्यच आहे असे माझे मत आहे. आपल्याला काही स्वाभिमान आहे की नाही? की नुसतीच भारत-पाक मत्रीच्या नावे बोंब करायची आणि मत्रीसाठी हवी असलेली नतिकताही आपणच दाखवायची? सीमेवरील चकमकी आणि पाकिस्तानप्रणीत दहशतवादी कारवाया यांत अनेक भारतीय सैनिक व नागरिक शहीद होत आहेत आणि इथे काही मंडळी सांगीतिक सूर एकत्र आणत आहेत.
क्रीडा, संगीत, शिक्षण, वैद्यकीय उपचारांतील देवाणघेवाण यांबाबत नक्कीच कोणीही राजकारण करू नये ही अपेक्षा ठीक; परंतु देशाचा स्वाभिमान बाजूला ठेवून आपल्या देशावर तिरकी नजर ठेवणाऱ्या पाकशी मत्रीचा एकतर्फी प्रयत्नही करता कामा नये.
भारत-पाकिस्तानचे सांगीतिक सूर जुळून मत्री दृढ होणारच असेल तर असे असंख्य कार्यक्रम सीमेवर भारत आणि पाक सनिकांमध्ये आयोजित केले पाहिजेत.. त्यामुळे तरी शांतता नांदेल! जोपर्यंत पाक दहशतवादी कारवाया पूर्णपणे बंद करत नाही, तोपर्यंत भारताने कोणत्याही प्रकारचे मत्रीपूर्ण संबंध त्या देशाशी न ठेवणेच बरे. नाहीतर आम्ही इथे संगीताचे कार्यक्रम करत राहू आणि पाक आपला देश पोखरण्याचे कार्य नेहमीप्रमाणे करतच राहील.
अमित अशोक देवळेकर, कांदिवली-पूर्व.

फोटो तेवढे ज्याचे त्याने सांभाळायचे!
नरेंद्र मोदी आणि शरद पवार यांच्या कथित भेटीच्या नुसत्या बातमीमुळे (मोदी-पवार गुप्त भेट- लोकसत्ता- जाने.) महायुतीच्या नेत्यांमध्ये एकदम धास्तीचे वातावरण तयार झाले. एक गोष्ट आरशासारखी स्वच्छ आहे ती ही की, राजू शेट्टी सोडले तर इतर सर्व पक्षांतील नेत्या-कार्यकर्त्यांतील काहींना, शरद पवार एनडीएमध्ये आल्यास मनापासून हवे आहेत. यापूर्वीही देश पातळीवर, राज्य पातळीवर आणि अगदी स्थानिक पातळीवर, एकमेकांच्या पूर्ण विरोधी मतांच्या पक्षांच्या आघाडय़ा, युत्या, किंवा बाहेरून पाठिंबा या पद्धतीने सत्तेचे खेळ खेळले गेलेले मतदारांनी अनुभवले आहेत. जॉर्ज फर्नाडिस यांच्यासारखे कट्टर लोहियावादी एकेकाळी भाजपप्रणीत एनडीएचे समन्वयक म्हणून काम करीत होते, शिवाय त्या सरकारमध्ये मंत्रिपदावरही होते.
एकाच चेहऱ्याचे सरकार आता लोकांनाही अपेक्षित नाही. यापुढेही देशपातळीपासून स्थानिक पातळीपर्यंत, विचित्र तोंडाचे सरकार स्वीकारण्याची मानसिक तयारी भारतीय जनतेने केलेली आहे. असे विचित्र तोंडाचे बाळ भारतीय जनताच जन्माला घालत असल्याने ते तसे स्वीकारण्याशिवाय जनतेपुढेही अन्य काय मार्ग आहे? महात्मा गांधी, बाबासाहेब आंबेडकर, लोहिया आणि सावरकर, सुभाषबाबू, गोळवलकर गुरुजी यांचे फोटो तेवढे ज्याचे त्यांनी सांभाळले म्हणजे झाले!
मोहन गद्रे, कांदिवली.