काँग्रेसमध्ये कुरघोडय़ा, गटबाजीच्या राजकारणाची परंपरा वर्षांनुवर्षे चालत आली आहे. या गटबाजीच्या राजकारणाला दिल्लीतील काँग्रेसच्या ढुढ्ढाचाऱ्यांनी नेहमीच खतपाणी घातले. विरोधकांपेक्षा स्वपक्षीयांशी लढल्याने काँग्रेसजनांना वेगळीच ऊर्जा प्राप्त होते, असे नेहमी बोलले जाते. हे सारे एरवी ठीक होते, पण अलीकडेच पक्षाच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती झालेल्या राहुल गांधी यांना पक्षाच्या पारंपरिक कार्यपद्धतीत बदल करायचा आहे! राहुल गांधी यांच्या राजकारणाचा बाज निराळा आहे. नेमके तेच काँग्रेसजनांच्या पचनी पडणे कठीण जाते आणि मग जे होते, ते उत्तर प्रदेशात दिसलेच आहे. काँग्रेसच्या दृष्टीने मुंबई शहर मात्र महत्त्वाचे आहे, कारण २००४ आणि २००९च्या लोकसभा निवडणुकीत मुंबईने काँग्रेसला भरभरून दिले. यामुळेच पक्षाच्या उपाध्यक्षपदी निवड झाल्यावर राहुल गांधी हे राज्यात प्रथम मुंबईतील पक्षाच्या संघटनात्मक कामाचा आढावा घेण्याकरिता आले. मुंबईत पक्षाची संघटनात्मक अवस्था फारच बिकट आहे. गेल्या वर्षी महापालिका निवडणुकीत सपशेल आपटी खाल्ल्यापासून मुंबईत काँग्रेसला डोके वर काढणे शक्य झालेले नाही. मुंबई काँग्रेसचा अध्यक्ष मराठी की बिगरमराठी नेमायचा याचा घोळ अद्याप सुरू आहे. परिणामी वर्षभर मुंबई काँग्रेस नेतृत्वाविना आहे. पक्षाच्या संघटनात्मक वाढीसाठी काय करता येईल हे राहुल गांधी यांना पक्षाच्या पदाधिकाऱ्यांकडून जाणून घ्यायचे होते, पण शुक्रवारच्या भेटीत झाले भलतेच. पक्षांतर्गत वाद, हेवेदावे याचे दर्शन नेतेमंडळींसमोर करण्याची परंपरा काँग्रेसमध्ये रुजली आहे. मुख्यमंत्री विरुद्ध राज्याचे प्रभारी, खासदार विरुद्ध आमदार यांच्यातील वादाचे पडसाद काँग्रेसच्या नव्या उपाध्यक्षांसमोर उमटले. कहर म्हणजे राज्याचे प्रभारी मोहन प्रकाश यांच्या विरोधात उघडपणे झालेला हल्लाबोल. समाजवादी चळवळीत आयुष्य व्यतीत केलेले मोहन प्रकाश हे दहा वर्षांपूर्वी काँग्रेसमध्ये दाखल झाले तरी त्यांचा जुना पिंड काही गेलेला नाही. राहुल गांधी यांच्या जवळच्यांमध्ये मोहन प्रकाश यांची गणना होते. तरीही मोहन प्रकाश यांना पदावरून हटविण्याची उघडपणे मागणी होते, तीही राहुल गांधी यांच्या समक्ष आणि मागणी होताच उपस्थित कार्यकर्ते दादही देतात.. हे सारेच काँग्रेसच्या युवराजांच्या शिस्तीत बसणारे नव्हते. मोहन प्रकाश हे राज्यात किती अप्रिय आहेत याचा अंदाज बहुधा राहुल गांधी यांना आला असेल. राहुल गांधी यांच्यासमोर मुख्यमंत्र्यांचीही कोंडी करण्याचा पद्धतशीर प्रयत्न झाला, पण लोकप्रतिनिधींच्या नव्हे, तर लोकांच्या दृष्टीने महत्त्वाच्या कामांना प्राधान्य देतो हे मुख्यमंत्र्यांनी सुनावले ते बरे झाले. विशेषत: धारावी पुनर्विकासावरून खासदार गायकवाड आणि त्यांची मंत्री कन्या वर्षां गायकवाड यांना योग्य तो संदेश मिळाला असेल. मुंबईकरांनी काँग्रेसला साथ दिली असली तरी या मुंबईच्या समस्या सोडविण्याकरिता केंद्र वा राज्यातील काँग्रेस सरकारांनी पाहिजे तेवढे लक्ष दिलेले नाही. मुंबईकरांच्या समस्या एवढय़ा जटिल असताना प्रिया दत्त किंवा संजय निरुपम यांच्यासारख्या खासदारांना पदपथ अडविणाऱ्या फेरीवाल्यांचे हक्क जास्त महत्त्वाचे वाटतात. आपण काहीही कामे केली नाहीत तरी शिवसेना-भाजप युती आणि मनसेच्या मतविभाजनात आपला लाभ होणार या भ्रमातच मुंबईतील काँग्रेसचे नेते आहेत. अशा स्थितीत राहुल यांच्याहीपुढे गटबाजीचेच दर्शन घडवून त्यांना आपापल्याच अजेंडय़ांसाठी गटवण्याचे काम मुंबईकर काँग्रेसजनांपुढे होते. पण राहुल यांनी ही गटबाजी मोडण्याचे सूतोवाचही न केल्यामुळे केंद्रीय काँग्रेसनेत्यांची पारंपरिक भूमिकाच त्यांनी निभावल्याचे दिसले.