वाघ या उमद्या आणि देखण्या प्राण्याविषयी अनेकांना उत्सुकता असते. ती उत्सुकता शमवण्याचे काम हे पुस्तक काही प्रमाणात करते. पण लेखकाचा दोन-अडीच दशकांचा अनुभव विचारात घेता त्याचे या पुस्तकातील लेखन अभ्यासात्मक होण्याऐवजी काल्पनिक आणि रंजकतेच्या पातळीवरच अधिक प्रमाणावर जाते, हेही तितकेच खरे.
ग्लोबल वार्मिगमुळे ढासळत चाललेले पर्यावरण आणि पर्यावरण टिकवून ठेवण्यात वने आणि वन्यजीवांची असलेली महत्त्वाची भूमिका यामुळे तज्ज्ञ, अभ्यासकांसोबतच सामान्य माणसाच्या ओठी या विषयावरची चर्चा हमखास होते. माणसाला वने आणि वन्यजीवांच्या अधिक जवळ नेण्यासाठी कदाचित हीच एक गोष्ट कारणीभूत असावी. एवढे मात्र खरे की यातील मोजक्या काही व्यक्ती गांभीर्याने या विषयाच्या मुळाशी जाण्यासाठी, त्याचा अभ्यास करण्यासाठी निसर्गाशी समरस होतात आणि काही लोक तसे फक्त दर्शविण्याचा प्रयत्न करतात. जागतिक पातळीवर पर्यावरण हा विषय गांभीर्याने चर्चिला जात असला तरीही वाघांबद्दल असलेले आकर्षण वेगळेच आहे. नुसता ‘वाघ’ हा शब्द उच्चारला तरी कान टवकारले जातात हे नक्की!
याच वाघाला बघण्यासाठी, तर काहींची अभ्यासण्यासाठी पावले जंगलाकडे वळतात. वाघ आणि त्याच्याशी संबंधित विषयावर आजवर अनेक पुस्तके आली आहेत. त्यातील काही पुस्तके खरोखरीच अभ्यासण्यासारखी आहेत, तर काही पुस्तकांमध्ये अभ्यासापेक्षा कल्पनाचित्रच अधिक रंगवलेले दिसून येते. राज्यातील पाच व्याघ्र प्रकल्पांपैकी चार व्याघ्र प्रकल्प एकटय़ा विदर्भात आहे आणि सहावा व्याघ्र प्रकल्प अधिसूचनेच्या प्रतीक्षेत आहे. या सहाही व्याघ्र प्रकल्पांपैकी ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील वाघांचे साम्राज्य देशीविदेशी नागरिकांना आपल्याकडे आकर्षित करीत आहे.
याच व्याघ्र प्रकल्पातील वाघांच्या साम्राज्यावर एक दशकापूर्वी अतुल धामणकर यांचे ‘वाघ’ हे पुस्तक प्रकाशित झाले. मराठी भाषेतील या पुस्तकाने त्या वेळी वाचकांना आकर्षित केले असले, तरीही सुजाण वाचकांच्या त्यावरील प्रतिक्रिया ‘वास्तवापेक्षा कल्पनाविश्व अधिक’ अशाच होत्या. आता तब्बल एक दशकानंतर या पुस्तकाचा इंग्रजी अनुवाद आला खरा, पण त्याच्याशी संबंधित आणि दहा वर्षांत बदललेल्या परिस्थितीवर आधारित ‘ट्रेलिंग द टायगर’ हे पुस्तक अलीकडेच प्रकाशित झाले आहे. दहा वर्षांत जसा काळ बदलला, तसेच या पुस्तकातसुद्धा काळानुरूप गांभीर्य होणे अपेक्षित होते. लेखकाच्या लेखणीबद्दल प्रश्न उभारण्याचे कारण नाही, पण खरे तर हा विषय अतिशय गंभीर आहे. त्यामुळे काल्पनिक आणि रंजकतेच्या आहारी न जाता या दहा वर्षांत झालेला परिस्थितीचा बदल यात येणे अपेक्षित होते. त्याउपरही धामणकर यांचा २३ वर्षांचा वाघ आणि जंगलाशी असलेला संबंध बघता ते गांभीर्य येणे अपेक्षित होते. मात्र ते काल्पनिक आणि रंजकता यातच अधिक गुंतलेले दिसतात. गेल्या दहा वर्षांत मानव-वन्यजीव संघर्षांत प्रचंड वाढ झालेली आहे. वाघांच्या शिकारीने सर्वानाच हैराण केले आहे. यामागची कारणे आणि त्यामुळे वाघाच्या वर्तणुकीत झालेले बदल धामणकर यांचा अनुभव बघता या पुस्तकात यायला हवा होता. मात्र, तसे झालेले नाही. अलीकडे वाघांचा अनुभव घेणारे अनेकजण असतात आणि त्यांच्याकडून असे लिखाण होऊ शकते, पण संबंधित लेखकाचा दोन-अडीच दशकांचा अनुभव बघता रूपकात्मक लिखाणापेक्षा, अभ्यासात्मक लेखन अधिक असावयास हवे होते असे वाटते.
वाघ आणि वाघिणीचे एकत्र येणे, त्यातून होणारा बछडय़ांचा जन्म, त्यांच्या जन्मानंतर त्यांनी या विश्वात टाकलेले पहिले पाऊल यासह काही बाबी मात्र या पुस्तकात चांगल्या प्रकारे अधोरेखित करण्यात आल्या आहेत. लेखकाला त्याच्या सुरुवातीच्या काळात सहकाऱ्यांनीसुद्धा चांगली साथ दिलेली आहे आणि त्यामुळे त्याचे अनुभव समृद्ध झाले आहेत.
सोनिया खरे यांनी वाचकांना समजेल अशा सहजसोप्या इंग्रजीत या पुस्तकाचा अनुवाद केला आहे. शिवाय वाघाची विविध छायाचित्रे दिल्याने पुस्तक आकर्षक व वाचनीय झाले आहे. येणाऱ्या काळात लेखकाकडून बदलत्या परिस्थितीवर प्रकाश टाकण्यात येईल, अशी अपेक्षा करायला हरकत नाही.
ट्रेलिंग द टायगर – अतुल धामणकर,
इंकिंग इनोव्हेशन्स, मुंबई,
पाने : १९५, किंमत : ३०० रुपये.