‘विठ्ठलाच्या पूजेसाठी ब्राह्मणेतर पुजारी’ ही बातमी (२३ जुलै) वाचली. वर वर पाहता हा निर्णय आधुनिक विचारसरणी दाखवणारा वाटतो. पण हे पुजारी निवडतानाही एक चलाखी केलेली दिसते. यात गुरव आणि आणि जंगम हे प्रवर्ग पूर्वीपासून चहा व्यवसाय करीत आहेत. यात फक्त आता िशपी आणि कासार या समाजाची भर पडली आहे, पण यात शोषित आणि पददलित अशा कोणत्याच समाजाच्या पुजाऱ्यांना प्रतिनिधित्व दिले गेलेले दिसत नाही. जो चोखामेळा विठ्ठलाच्या गळ्यातला ताईत झाला होता, त्याच्या जातीतील श्रद्धेय इच्छुकांना ही संधी का मिळू नये?

गरसमज वाढवणारे लिखाण..
‘तत्त्वभान’ या सदरातील श्रीनिवास हेमाडे यांचा ‘सौंदर्यशास्त्र.. केवळ गरसमज’ हा लेख (१७ जुल ) वाचला. यात लेखकाने एकाहून एक भोंगळ व बाष्कळ विधानं केली आहेत.
(१) सौंदर्यशास्त्राला ‘ललितकलांविषयीचे तत्त्वज्ञान’ वा ‘कलेचे तत्त्वज्ञान’ असेही म्हणतात. लेखक जर पाश्चात्त्य सौंदर्यशास्त्राविषयी बोलत असेल तर हे निखालस चुकीचं विधान आहे. वस्तुत: कलेची मीमांसा हा सौंदर्यशास्त्राचा केवळ एक भाग आहे. कारण, निसर्ग (फूल वा खवळलेला समुद्र ही कांटच्या ‘क्रिटिक ऑफ जजमेंट’मधली अनुक्रमे ‘ब्यूटिफुल’ व ‘सबलाइम’ची उदाहरणं) आणि कला (उदा. कविता वा नृत्य) यांच्या संवेदनातून येणाऱ्या सौंदर्यानुभवाची तात्त्विक चर्चा म्हणजे सौंदर्यशास्त्र, असं सौंदर्यशास्त्राचे बहुतेक अभ्यासक मानतात.
(२) ‘प्राचीन ग्रीक काळापासून सौंदर्यशास्त्र निसरडे व वादग्रस्त ठरले.’ इथेही जर लेखक पाश्चात्त्य सौंदर्यशास्त्राविषयी बोलत असेल तर हेही अजून एक निखालस चुकीचं विधान आहे. प्राचीन ग्रीक वाङ्मयात (उदा. होमरच्या काव्यात) व तत्त्वज्ञानात (उदा. प्लेटोच्या संवादांत) सौंदर्यचर्चा आढळत असली, तरी सौंदर्यशास्त्र हा स्वत:चा अभ्यासविषय व स्वत:चं ध्येयधोरण असलेला एक स्वतंत्र विषय म्हणून अठराव्या शतकात उदयास आला, असे तत्त्वज्ञानाचे व सौंदर्यशास्त्राचे अभ्यासक व इतिहासकार मानतात (उदा. पॉल गायर). अलेक्झांडर बाऊमगार्टेन या जर्मन तत्त्वचिंतकाने १७५० साली ‘इस्थेटिका’ हा ग्रंथ लिहून हा शब्द घडवला व या विषयाची मुहूर्तमेढ रोवली, असं सर्वसाधारणपणे मानलं जातं.
(३) ‘सौंदर्यशास्त्राचे मूळ तत्त्वज्ञानात असताना ते मराठी समीक्षेची मिरासदारी बनले.’ हा फक्त समीक्षक आणि हा फक्त तत्त्वचिंतक हे कोण ठरवणार? ‘तत्त्वभान’ या सदराचे लेखक? ‘रा. भा. पाटणकर या इंग्रजीचे प्राध्यापक असलेल्या मराठी समीक्षकांनी तत्त्वज्ञानाचे अभ्यासक म्हणून कांट, क्रोचे व कॉिलगवूड यांच्या सौंदर्यविचाराची पद्धतशीर मांडणी मराठीत केली,’ असं विधान जर आपण केलं तर सदरहू लेखक पार भांबावून जाणार, यात शंकाच नाही. तत्त्वज्ञान-साहित्य-समीक्षा या वर्गीकरणाची चिकित्सा करणाऱ्या, देरिदा आणि मंडळींचा जाता जाता उल्लेख करणारा हा लेखक अशी हवाबंद व हुकूमशाहीवादी विभागणीही जाता जाताच करतो हेही स्वाभाविकच आहे म्हणा.
(४) ‘‘इस्थेटिक्स .. असे शब्द शोधयंत्राला दिले की ते सुगंधी पावडरी, तेले.. इत्यादी सौंदर्यप्रसाधनांची ‘स्थळे’ दाखविते.’’ या बाष्कळ कोटीतून लेखकाचं मराठी समीक्षेने न डागाळलेलं, तत्त्वज्ञानावरचं अव्यभिचारी प्रेम उघड होतं, असं म्हणावं का?
जुजबी माहिती देताना लेखकाची अशी गत झाली आहे. त्यामुळे या लेखात तत्त्वज्ञानाविषयीचं व सौंदर्यशास्त्राविषयीचं लेखकाचं आकलन वगरे सापडण्याची शक्यताच उद्भवत नाही. परंतु नुसती परिचयपर माहिती देतानाही झालेल्या अशा चुकांमुळे व अनावश्यक उथळ विनोदांमुळे तत्त्वज्ञानाविषयीचे गरसमज वाढायला हातभार लागणार आहे.
-डॉ. प्रशांत बागड
(भारतीय प्रौद्योगिकी संस्थान, कानपूर येथे तत्त्वज्ञानाचे साहाय्यक प्राध्यापक)

राजवाडय़ांना ‘घरपट्टी’ असते का?
‘येथे भुजबळ राहतात..’ हे सर्वश्रुत आहे, पण उशिरा का होईना याकडे कोणाचे तरी लक्ष गेले (लोकसत्ता, २३ जुलै) हेही नसे थोडके! मुंबई-नाशिक प्रवास करण्याची बरेचदा वेळ येते. त्यानिमित्ताने नेहमी ‘रामबागे’चे (?) म्हणजे भुजबळ फार्मचे दर्शन होत असते. अनेक लक्ष्मीपतींची कुलंगडी काढणाऱ्या सरकारी खात्यांची आणि मुख्यत्वे मीडियाची नजर अजून याकडे कशी वळत नाही याचे नेहमी सखेद आश्चर्य वाटायचे. भुजबळांच्या मुंबईमधील मालमत्तेबद्दल आवाज उठवणाऱ्या भाजपच्या खासदारांची नजरही अजून नाशिककडे वळली नव्हती. नाशिकमधील या राजवाडय़ात कडेकोट बंदोबस्त असतो. पण सामान्य जनता आश्चर्य आणि हळहळ या व्यतिरिक्त आणखी काय व्यक्त करणार? आता माहिती समोर आली आहे. पण हे प्रकरण कसे तडीस जाणार की बासनात गुंडाळले जाणार हे बघायचे. कारण बाहुबलींची ताकद लपलेली नाही आणि शेवटी लोक हळूहळू विसरतातच.
नाशिक महानगरपालिका नागरिकांकडून घरांच्या किमतीप्रमाणे घरपट्टी आकारते. मग या राजवाडय़ांना कशा प्रकारे कर लावला जातो कीसरकारी घरांप्रमाणेच मंत्री म्हणून सूट मिळते हे जाणून घेणेही रंजनात्मक ठरेल. नाशिकच्या जनतेचे डोळे आधीच उघडलेले आहेत, पण ही बातमी अजून थोडा विचार करायला प्रवृत्त करील हे नक्की.
-आदिती परांजपे , ठाणे पश्चिम.

भारतीय सौंदर्यशास्त्राचे दुवे..
श्रीनिवास हेमाडे यांच्या ‘तत्त्वभान’ या सदरातील ‘सौंदर्यशास्त्र- निव्वळ गैरसमज’ या लेखात (१७ जुलै) भारतात साहित्यशास्त्र आहे, कलामीमांसाही आहे, परंतु ‘सौंदर्यशास्त्र’ नाही, अशा अर्थाचे मतप्रदर्शन दिसते. त्यासंबंधाने हे पत्र.
भरतमुनींचे ‘नाटय़शास्त्र’ हा सौंदर्यविषयक भारतीय विचारांचा पाया आहे. काश्मिरी पण्डित आनन्दवर्धनाचा ‘ध्वन्यालोक’ हा साहित्यशास्त्रावरील प्रमुख आधारग्रंथ आहे. त्यावर रसिकश्रेष्ठ टीकाकार काश्मिरी पण्डित अभिनवगुप्तकृत ‘ध्वन्यालोकलोचन’ नामक विस्तृत व मार्मिक टीका लिहिली आहे. वरील ग्रंथांतून कित्येक तत्त्वे अशी आढळतात की जी सर्व ललितकलांना लागू होतील. रानिएरो नोलि हे इटालियन पण्डित लिहितात – ‘फॉर ए सिम्पल अ‍ॅण्ड क्लीअर स्टेटमेंट ऑफ इंडियन अ‍ॅटिटय़ूड टू एस्थेटिक प्रॉब्लेम्स वन टर्न्‍स मेनली  टू आनंदवर्धन’ (संदर्भ : एन्सायक्लोपीडिया ऑफ वर्ल्ड आर्ट, खंड पाच, पृ. ६२- ७१, ) विष्णुधर्मपुराणातील चित्रसूक्त, सोमेश्वरपंडित यांच्या अभिलषितार्थचिन्तामणीमधील आलेख्यकर्म, समरांगणसूत्रधार, शारंगदेव यांनी लिहिलेला संगीतरत्नाकर याही ग्रंथांत त्या- त्या ललितकलांविषयी शास्त्रीय विवेचन आहे.  
म्हणजे भारतीय जाणिवांचे सौंदर्यशास्त्र कलामाध्यमांच्या अंगाने विकसित झाले.
– शशिकान्त पुरुषोत्तम वीरकर, पुणे
(आधार  – भारतीय सौंदर्यशास्त्र : पु ना. वीरकर; ध्वन्यालोक (मराठी अनुवाद : पु. ना. वीरकर व मा. वा. पटवर्धन ))

मोदी सरकारकडे आयते कोलीत
‘हमाम में सब..’ हा अग्रलेख (लोकसत्ता, २३ जुल) वाचला. यूपीएचे राजकीय भवितव्य  पूर्वपापांमुळे अधिकाधिक अंध:कारमय होऊ लागले आहे!  ‘इण्डियन हेरॉल्ड’ प्रकरणीचा धुरळा अजून खाली बसलेला नाही तोच काटजूनामक धूमकेतू यूपीएच्या राशीला लागलाय.
‘काटजू आत्ताच असे का बडबडले,’ असे विचारणाऱ्यांनी ते काय बोलले त्याचा विचार करून त्यांच्या आरोपांना उत्तर देणे जरूर आहे. न्यायाधीशांच्या नेमणुकीच्या सध्याच्या व्यवस्थेत तात्काळ बदल करण्याची गरज काटजूंच्या आरोपांनी ठळकपणे अधोरेखित झाली आहे.  नेहमीप्रमाणे यूपीएच्या कार्यकाळात काही तरी काळेबेरे झाल्याची पावतीच मनमोहन सिंग यांच्या मौनाद्वारे मिळते. वास्तविक पंतप्रधान कार्यालयाच्या आदेशाची प्रतच माध्यमांकडे असताना सिंग यांचे मौन त्यांच्या कायदेमंत्र्यांच्या खोटेपणावर अधिकच लख्ख प्रकाश टाकते. हा सगळा प्रकार मोदी सरकारच्या हातात आयते कोलीत देऊन न्यायाधीश नेमणूक प्रक्रियेत सरकारला हवे असलेले बदल विनासायास घडवून आणायला मदतच करील.
राजीव मुळ्ये, दादर (मुंबई)

वाक्य ऑर्वेलचे नव्हे, लॉर्ड अ‍ॅक्टनचे!
‘हमाम में सब ..’ हा अग्रलेख (२३ जुलै) वाचला. त्यातील आशयाबद्दल दुमत असण्याचे कारणच नाही. न्यायव्यवस्थेशी हा राजकीय खेळ निश्चितच सुदृढ लोकशाहीसाठी महागात पडू शकतो. मात्र संपादकीयातील एका चुकीच्या उल्लेखासाठी हा पत्रप्रपंच. अग्रलेखात एक वाक्य असे आहे- ‘निरंकुश सत्ता ही निरंकुश भ्रष्टाचार करते.’ हे विधान जॉर्ज ऑर्वेलचे नसून, लॉर्ड अ‍ॅक्टन यांचे असून ते वचन असे-  ‘Power tends to corrupt and absolute power corrupts absolutely.’
-केतन भोसले, ठाणे पश्चिम.