गुप्तधनाचा शोध असो, सत्तापद असो किंवा कुरघोडीचा खेळ असो, स्वप्न हे या साऱ्यामागच्या राजकारणाचे मूळ असते. नरेंद्र मोदी यांना पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून जाहीर केल्यामुळे, प्रतिस्पर्धी राजकीय पक्षांचे काय करायचे ते मोदीच पाहून घेतील अशा समजुतीतील भाजपमधील काही नेते सध्या स्वप्ने पाहण्यातच दंग आहेत. स्वप्न पाहण्यासाठी झोपेत असावे लागते, आणि हवे तेच स्वप्न पडत असेल, तर जागे होण्याचे भानदेखील राहात नाही. सुमारे २० वर्षांपूर्वी, भाजपचे नेते गोपीनाथ मुंडे यांना सत्तापालटाचे स्वप्न पडले. शरद पवार यांच्यावर नेम धरूनच सत्तापालट शक्य आहे, हे त्यांनी ओळखले आणि पवार यांच्या विरोधात ‘ट्रकभर’ पुरावे आपल्याकडे असल्याचा डांगोरा पिटण्यास सुरुवात केली. पुढे सत्तापालटासाठी ट्रकभर पुराव्यांची केवळ हवादेखील पुरेशी ठरली, आणि मुंडे यांचे स्वप्न खरेही झाले. स्वप्नांची हीच वाट वारंवार सत्तेकडे नेईल असा समजही त्यामुळे भाजपमध्ये रूढ झाला असावा. त्या वेळी शरद पवार यांच्या विरोधात ट्रकभर पुराव्यांची हवा मुंडे यांनी तयार केली होती. तशी हवा अजित पवार यांच्या विरोधात तयार करण्यासाठी आता भाजपचे विनोद तावडे सरसावले आहेत. महाराष्ट्रातील सिंचन घोटाळ्याचे आरोप करून आपले राजकीय स्थान भक्कम करण्याच्या स्वप्नात सध्या विनोद तावडे रमले आहेत. म्हणूनच, गोपीनाथ मुंडे यांनी शरद पवारांच्या विरोधात ट्रकभर पुराव्यांचा नारा दिला, तर आपण अजित पवारांच्या विरोधात ‘बैलगाडीभर’ तरी पुरावे गोळा केले पाहिजेत, असा ध्यास घेत अखेर तावडे यांनी १४ हजार कागदांचे गठ्ठे तीन सुटकेसमध्ये भरून तो ऐवज पुरावे म्हणून चितळे समितीकडे बैलगाडीतून मिरवणुकीने नेला. मुंडे यांच्या ट्रकभर पुराव्यांचे पुढे काय झाले, पुराव्यांची ती हवा शरद पवार यांच्या राजकीय स्थानाला धक्का तरी देऊ शकली का, हे प्रश्न आजही अनुत्तरितच असताना पवार यांच्या पुतण्याच्या विरोधातील पुरावे म्हणून बैलगाडीभर कागद गोळा करून तावडे आता तीच हवा पुन्हा तयार करू पाहात आहेत. मुळात, कागदांचे गठ्ठे हा केवळ पुरावा नसतो, तर आरोपांना बळकटी देणारे निश्चित, ठोस असे काही पांढऱ्यावरचे काळे त्यावर असावे लागते, हे न जाणण्याएवढे तावडे आता अपरिपक्व राहिलेले नाहीत, आणि कागदांचे गठ्ठे बांधून बैलगाडीतून त्यांची मिरवणूक काढल्याने तावडे यांच्या हाती सज्जड पुरावे आले असे मानण्याइतकी जनतादेखील दुधखुळी नाही. मुळात, एवढे गाडीभर पुरावे हाती असताना, केवळ बैलगाडीतून मिरवणुका काढण्याऐवजी ते पुरावे घेऊन तावडे थेट न्यायालयात जात नाहीत, हा प्रश्न जनतेला पडत असेल तरी त्याचे उत्तर तावडेंखेरीज कुणाकडेच नाही. सिंचन घोटाळ्याची पाळेमुळे खणावीत आणि आपण त्या श्रेयाचे धनी व्हावे हे तावडे यांचे स्वप्न आहे, तर अजित पवार यांना गजाआड पाठविण्याचे मुंडे यांचे स्वप्न आहे. या स्वप्नांच्या वाटा वेगवेगळ्या आहेत. सिंचन घोटाळ्याची चौकशी केली, तर तत्कालीन पाटबंधारे मंत्री म्हणून भाजपचेच गोपीनाथ मुंडे, महादेव शिवणकर आणि एकनाथ खडसे यांच्यापर्यंत जावे लागेल, असा टोला अलीकडेच सत्ताधारी पक्षातून हाणला गेला होता. तावडे यांनी तर सिंचन घोटाळ्याच्या सखोल चौकशीची मागणी लावून धरली आहे. तावडे आणि मुंडे यांचे संबंध राजकीय क्षेत्रापुरते जगजाहीरच आहेत. सत्ताधाऱ्यांनी हाणलेला टोला चौकशीच्या रूपाने तावडे यांच्या स्वप्नाशी जाऊन थांबला तर?..