गुजरातेत पोरबंदरनजीक भर समुद्रात झालेले बोटीचे ‘एन्काऊंटर’ हे खरे की खोटे असा अत्यंत गंभीर प्रश्न आता उभा ठाकला आहे. ही घटना गेल्या ३१ डिसेंबरच्या रात्रीची. सगळे जग नव्या वर्षांचे स्वागत करीत असताना पाकिस्तानातून एक बोट आली. त्यात दहशतवादी असावेत. त्यांच्याकडे स्फोटके असावीत. तटरक्षक दलाने त्यांचा पाठलाग केला असता ते चार दहशतवादी बोटीच्या खालच्या भागात जाऊन दडले आणि त्यांनी बोटीला आग लावली. त्यामुळे बोटीवर स्फोट झाला. त्यात ते मारले गेले. कदाचित तत्पूर्वी त्यांनी सायनाइड खाऊन आत्महत्याही केली असावी, असा सरकारचा दावा होता. ही बोट रोखून आपण मोठा दहशतवादी कट हाणून पाडल्याचे सांगत सरकारने तेव्हा स्वत:ची पाठही थोपटून घेतली होती. मात्र त्याच वेळी ‘इंडियन एक्स्प्रेस’ने त्या सर्व घटनाक्रमात काळेबेरे असल्याचे म्हटले होते. त्यावर संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांनी तातडीने खुलासा करून ती बातमी चुकीची असल्याचे आणि सरकारची माहितीच योग्य असल्याचे म्हटले होते. त्या बातमीवरून सरकारला सवाल करणाऱ्या विरोधी पक्षांच्या नियतीविषयीच शंका तेव्हा भाजपाई मंडळींनी व्यक्त केल्या होत्या. ‘इंडियन एक्स्प्रेस’ने पर्रिकर यांच्या विधानांतील विसंगती निदर्शनास आणून दिल्यानंतरही ते आपल्या म्हणण्यावर ठाम होते. मात्र आता तटरक्षक दलाचे उपमहानिरीक्षक बी. के. लोशाली यांनी गुजरातेतील एका कार्यक्रमात बोलताना जो बार उडवून दिला, त्यामुळे पर्रिकर आणि मोदी सरकार तोंडघशी पडले आहे. लोशाली हे एक जबाबदार अधिकारी आहेत. आपण काय सांगत होतो हेही त्यांना चांगलेच ठाऊक होते. तरीही त्यांनी ही बोट आपल्याच आदेशावरून उडवून देण्यात आल्याचा दावा केला. ‘‘मला तुम्हाला एक गोष्ट सांगायचीय. तुम्हाला ३१ डिसेंबरची रात्र आठवतच असेल.. आपण ती पाकिस्तानची (बोट) उडवून दिली.. मी तेव्हा गांधीनगरमध्ये होतो. त्या रात्री मी सांगितले, की उडवून द्या ती बोट. आपल्याला त्यांना बिर्याणी खाऊ घालायची नाही..’’ ही लोशाली यांची वाक्ये आहेत. आता ते खोटे बोलत आहेत, माध्यमांनी त्यांच्या वक्तव्याचा विपर्यास केला असे म्हटले जाईल. पर्रिकर यांनी तर लोशाली यांच्यावर कारवाईचेच आदेश दिले आहेत. परंतु त्यामुळे त्या घटनेबद्दल निर्माण झालेल्या संशयाच्या चिखलात सरकारचे पाय अधिकच रुतत चालले आहेत. ती बोट दहशतवाद्यांची असल्याचे पुरावे सरकारकडे असल्याचे सांगण्यात येते. तसे असेल तर सरकारने ते पुरावे जाहीर करण्याची गरज आहे. याचे कारण या एकंदरच लपवाछपवीमुळे भारताची आंतरराष्ट्रीय पातळीवरील प्रतिमा खराब होण्याची शक्यता आहे. तिकडे पाकिस्तानने केव्हाच तसा आरडाओरडा सुरू केला आहे. पाकिस्तानशी काही दिवस गट्टी केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा बट्टी केली आहे. लवकरच परराष्ट्र सचिव एस. जयशंकर पाकिस्तान दौऱ्यावर जाणार आहेत. तेथे हे प्रकरण आडवे येऊ शकते. हे सर्व लक्षात घेऊन सरकारी यंत्रणांनी इकडेतिकडे बोटे दाखविण्याऐवजी देशासमोर सत्य काय ते ठेवावे. भारताच्या नैतिक अधिकाराच्या सलामतीसाठी ते अत्यंत आवश्यक आहे.