‘तेलावरचे तरणे’ हे संपादकीय (८ जाने.) जागतिक आíथक सद्यस्थिती अन् भारतीय बाजारावरील त्याचा परिणाम याचे योग्य विश्लेषण करणारे होते. मंगळवारी मुंबई भांडवली बाजाराचे जे काही झाले त्याला १०० टक्के खनिज तेलाचे घसरते भाव आणि ग्रीसमधील संभाव्य आर्थिक संकट जबाबदार असून या दोन्ही कारणांवर आपले नियंत्रण नसल्याने नजीकच्या काळात ‘अच्छे दिन’ येण्याची सुतराम शक्यता दिसत नाही. खनिज तेलाचे घसरते भाव आपल्याला कितीही सुखावह वाटले तरीही अशी स्थिती येणाऱ्या काळात जागतिक आíथक संकट येण्याचे संकेत देणारी आहे.
सद्यस्थितीत सौदी अरेबियाने युरोपला कमी किमतीत तेल विकण्याचा निर्णय घेऊन आपल्या उत्पन्नापेक्षा जागतिक तेल निर्यातीतला वाटा कायम ठेवण्यात प्राथमिकता दिलेली दिसते. याचे मूळ कारण उत्तर अमेरिकेत वाढलेल्या तेल उत्पादक कंपनीच्या संख्येत आहे. भारतासारख्या प्रचंड खनिज तेल आयात करणाऱ्या देशात असे वातावरण ग्राहकांना व सरकारला ‘फिल गुड’ वाटणारे असेच आहे. त्यामुळे जगातील जास्त वाढ असलेल्या क्षेत्राकडे गुंतवणूक आकर्षति होईल. मात्र दुसऱ्या बाजूने विचार करता खनिज तेलाचे घसरते भाव रशिया, इराण व व्हेनेझुएला अशा तेलनिर्यात देशांचे कंबरडे मोडणारे असून त्या देशांच्या आíथक वृद्धीवर तीव्र परिणाम करणारे ठरेल. संभाव्य घसरण महागाई दराला धोक्याच्या पातळीखाली घेऊन जाऊ शकत असल्याने खनिज तेलाच्या घसरत्या भावाचे जगातल्या अनेक अर्थतज्ज्ञांनी स्वागत न केल्याचे दिसते.
अगोदरच खनिज तेलाच्या घसरत्या भावाने युरोझोन संकटात आणला आहे. त्यामुळे या वर्षांत जागतिक आíथक स्थिती ही खनिज तेलाच्या भावावर अवलंबून असणार हे मात्र नक्की. येणाऱ्या काळात सौदी अरेबियाने आपले सद्य तेलधोरण कायम ठेवल्यास तेलाचे भाव २० डॉलर प्रतिबॅरल येण्याची शक्यता नाकारता येत नाही. सौदी अरेबियाने तेलाचे उत्पादन कमी करण्याचे आधीच नाकारल्याने तेलाचे दर स्थिर ठेवण्यासाठी फक्त अमेरिका व कॅनडा या देशांना पुढाकार घेऊन आपले तेल उत्पादन कमी करावे लागेल. युरोपमधील मंदी व चीनमध्ये कमी झालेली मागणी यामुळे एकंदरीत तेलाची मागणीही कमी राहील असे वाटते. आपण अचूक म्हटल्याप्रमाणे ‘अच्छे दिन’ वास्तवात येण्यासाठी व सुदृढ अर्थव्यवस्थेसाठी भारताला जागतिक परिस्थितीवर अवलंबून न राहता नवीन आíथक धोरणे आखून ती योग्य रीतीने राबवावी लागतील.
-सचिन मेंडिस, वसई

केवळ बाजारात उपलब्ध नसलेल्या पुस्तकांना दुर्मीळ म्हणावे ?
‘‘कवितांचे वेचे’ पुनप्र्रकाशित’ (लोकसत्ता, ४ जानेवारी) या बातमीत काही माहिती प्रक्षिप्त असल्यामुळे पुढील मुद्दे वाचकांपर्यंत पोहोचावेत, या हेतूने हा पत्रप्रपंच.
१) ‘१८५४ मध्ये पहिल्यांदा प्रकाशित झालेल्या या ग्रंथाची शेवटची आवृत्ती १९५७ मध्ये प्रकाशित झाली होती. अलीकडच्या काही वर्षांत हा ग्रंथ उपलब्ध नव्हता.. गेल्या ६०-६५ वर्षांपासून हा ग्रंथ उपलब्ध नव्हता.’ ही बातमीतील विधाने अचूक नाहीत. पुण्यातील शरद गोगटे यांनी आपल्या ‘शुभदा-सारस्वत प्रकाशन’ या संस्थेतर्फे या पुस्तकाची ‘शाश्वत साहित्यमाला’ या योजनेअंतर्गत १९९० साली नवी आवृत्ती काढली होती. तिला कवयित्री शांता शेळके यांनी नव्याने प्रस्तावना लिहिली. या आवृत्तीचे १९९३ साली पुनर्मुद्रणही झाले. ते अगदी चार-पाच वर्षांपूर्वीपर्यंत बाजारात उपलब्ध होते. या पुस्तकाची एक प्रत गोगटे यांनी पु.ल. देशपांडे यांना भेट म्हणून पाठवली होती. ती पाहून पुलंनी त्यांना पत्र लिहून, ‘‘आमच्या पिढीची काव्याभिरुची या संग्रहावर पोसली गेली आहे,’’ अशी प्रांजळ कबुली दिली होती.
२) १९५४ साली प्रकाशित झालेल्या शतसांवत्सरिक आवृत्तीचे संपादन अ. का. प्रियोळकर यांनी केले आहे. तिला त्यांनी दीर्घ प्रस्तावना लिहिली असून गोडबोले यांच्या मूळ आवृत्तीत नंतर कुणी कुणी फेरफार करून सुधारित आवृत्त्या काढल्या त्याचा तपशीलवार आढावा घेतला आहे. तेव्हापासून हीच आवृत्ती प्रमाण मानली जाते. या संग्रहाचा दुसरा भाग १८६३ साली परशुराम गोडबोले यांनी स्वत: प्रकाशित केला. हा भाग पहिल्या भागापेक्षाही सरस असला तरी तो फारसा वाचकांना माहीत नाही, असे विष्णुशास्त्री चिपळूणकरांनी ‘निबंधमाला’मध्ये (अंक ५८, १९१७, पृ. ८५६) लिहिले आहे.  
३) ‘‘..१९५४ मध्ये तत्कालीन मुंबई राज्याच्या शिक्षण विभागाच्या मराठी संशोधन मंडळाकडून त्यात काही नव्याने भर टाकून तो पुन्हा प्रकाशित करण्यात आला,’’ हे बातमीतील विधान प्रक्षिप्त आहे. मुंबई संशोधन मंडळ ही संस्था सी. डी. देशमुख यांच्या सूचनेवरून ‘मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालया’ने सुरू केली. तिचे पहिले संचालक कृ. पा. कुलकर्णी, तर दुसरे संचालक अ. का. प्रियोळकर होते. एम.ए. आणि पीएच.डी.चे मराठी भाषेसंदर्भातील संशोधन या मंडळात विद्यार्थ्यांना करता येते. या मंडळाला मुंबई विद्यापीठाची मान्यता आहे. या मंडळाचा आणि मुंबई राज्याच्या शिक्षण विभागाचा काहीही संबंध नव्हता आणि नाही.
४) ‘दुर्मीळ’ असा शब्दप्रयोग बातमीत या पुस्तकाविषयी केला गेला आहे. केवळ बाजारात उपलब्ध नसलेल्या पुस्तकांना दुर्मीळ म्हणावे काय? काव्य-वेच्यांचे ‘नवनीत’ राज्यभरच्या जवळपास सर्व प्रमुख ग्रंथालयांमध्ये ते नक्कीच उपलब्ध आहे. ज्याच्या अतिशय मोजक्या प्रतीच शिल्लक असतात आणि जे सहजासहजी मिळणे दुरापास्त अशाच पुस्तकाला ‘दुर्मीळ’ म्हणतात.
– शिवाजी पाटोदेकर, पुणे</p>

या मद्यासक्तीचं काय करावं?
‘जपानी अमलाची रात्र’ हा लेख (अन्यथा, २७ डिसें.) व ‘राजपेय.. जयपूर संस्थानचे!’ हे पत्र (लोकमानस, ३ जाने.) तसेच बीअरच्या बाटलीवर गांधीजींचे छायाचित्र ही बातमी (७ जाने.) वाचली.
जपानी वा देशी एकूणच मद्यासक्तीचं गुणगान वाचून खूश व्हावं की तिकडे बीअरच्या बाटलीवर गांधीजींच्या छायाचित्रावर आक्षेप घेतला जातो म्हणून समाधान वाटून घ्यावं अशा पेचात वाचक पडतो. उत्तमोत्तम दर्जाची मादक पेये जर शरीरस्वास्थ्यास आवश्यक वा पूरक असतील तर बीअरच्या बाटलीवरील आपल्या राष्ट्रपित्याच्या छायाचित्रास आक्षेप घेण्याचे कारण उरत नाही. या संबंधी डॉ. अभय बंग यांचे मत वेगळेच आहे. त्यांच्या मतानुसार मद्यसंस्कृती महाराष्ट्राला पोखरते आहे. ‘महाराष्ट्र’ या शब्दातील ‘महा’च्या जागी ‘मद्य’ हा शब्द आला असून हा एक आधुनिक ‘ध’ चा ‘मा’ झाला आहे! समाजात बहुसंख्य लोक मद्यपान करतात म्हणून लोकशाहीच्या नियमानुसार मद्यपान योग्य मानायचे की, डॉ. बंग यांच्यासारखे समाजधुरीण ते त्याज्य म्हणतात व ती गोष्ट सप्रमाण सिद्ध करतात ते योग्य मानायचे?
    -दिलीप रा. जोशी, नाशिक