22 February 2019

News Flash

एकविशीचा मोबाइल..

भारतातील मोबाइल सेवा सुरू होऊन कालच्या ३१ जुलै रोजी २० वर्षे पूर्ण झाली. किमान निम्मे भारतीय आता मोबाइलधारक आहेत.

| August 1, 2015 12:36 pm

भारतातील मोबाइल सेवा सुरू होऊन कालच्या ३१ जुलै रोजी २० वर्षे पूर्ण झाली. किमान निम्मे भारतीय आता मोबाइलधारक आहेत.. ते सतत कुणाशी तरी संपर्क साधण्यासाठी वा स्वत:त रममाण होण्यासाठी मोबाइल वापरत आहेत आणि त्यांच्यावर सव्‍‌र्हरांची नजर असणेही आता अंगवळणी पडले आहे!
मोबाइल फोन नव्हता तेव्हा माणसे एकमेकांशी बोलत तरी कशी असतील असा नवलप्रश्न पडणारी पिढी केव्हाच जन्माला आलेली आहे. त्याआधीची ते जाड काळे दूरध्वनी संच अनुभवलेली, चार दिवसांचा पाहुणा म्हणून येऊन गेलेला पेजर नावाचा निरोप्या पाहिलेली पिढी अधूनमधून स्मरणरंजनात रमताना दिसते, की तेव्हा कुठे बाहेर फोन करायचा तर ट्रंक कॉल बुक करून कशी चारचार तास वाट वगरे पाहायला लागायची. हे सर्व पाहिले की कोणासही वाटावे की भारतात हे मोबाइलनामक इटुकले यंत्र आणि प्रचंड तंत्र येऊन बराच काळ लोटला असेल. तर ते आहेच. काळ सापेक्ष असतो आणि आजच्या तंत्रयुगात तर दोन वर्षांत पिढीबदल होतो म्हणतात. पण आपल्या नेहमीच्या दिनदíशकेनुसार हिशेब लावला तर लक्षात येईल, की आज आपल्या सवयीची झालेली मोबाइल क्रांती अजून कोवळीच आहे. काल, ३१ जुललाच तिचा विसावा वाढदिवस झाला. आज भारतातील मोबाइल एकविशीत आला.
ज्या कोलकात्यातून १६४ वर्षांपूर्वी पहिली तार पाठविण्यात आली होती त्याच कोलकात्यातून ३१ जुल १९९५ रोजी पहिला मोबाइल कॉल लावण्यात आला, ही घटना ऐतिहासिक योगायोगाची. त्या योगायोगाला आणखी एक वेगळी जोड आहे. ती म्हणजे हा कॉल केला होता एका साम्यवादी नेत्याने. ज्योती बसू यांनी. ते तेव्हा पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री होते. मोबाइलचे जाळे देशात पहिल्यांदा कोठे अंथरले जाईल तर ते कोलकात्यामध्येच, हा त्यांचा हट्टाग्रह होता. ते सुरू झाले तेव्हा त्यांनी रायटर्स बििल्डगमधून तेव्हाचे केंद्रीय दूरसंचारमंत्री सुखराम यांना पहिला मोबाइल फोन केला. आज ज्योती बसू आपल्यात नाहीत. सुखराम हे अन्य एक दूरसंचारमंत्री ए राजा यांच्यासमवेत तिहार तुरुंगात आहेत. वेगळ्या अर्थाने, संपर्कक्रांतीने देशात आणलेल्या समृद्धीला लागलेली ही कटू फळेच. पण तेव्हा सुरू झालेले ते दळणवळण आज अशा टप्प्यावर आले आहे की त्यास वगळून जगण्याची कल्पना करणेही कठीण वाटावे. देशाची लोकसंख्या सव्वाशे कोटी आणि मोबाइल फोन-संख्या शंभर कोटी, अशी सद्य:स्थिती आहे. अनेकांकडे दोन मोबाइल असतील, असे जरी मानले तरी किमान निम्म्या भारतीय लोकसंख्येच्या हातात मोबाइल फोन आणि मुठीत दुनिया आहे. किमान जग आपल्या कवेत आल्याची भावना तरी आहे. ती किती खरी आणि किती भ्रामक हा वेगळा प्रश्न. परंतु या संपर्क साधनाने येथील नागरिकांना माहितीनामक अस्त्र सहज उपलब्ध होईल, अशी परिस्थिती तर नक्कीच निर्माण केली आहे. याचे कारण या यंत्रामागे असलेल्या तंत्रात आहे. दिवसेंदिवस ते अत्याधुनिक होत चालले आहे. त्याने माणसे एका बटणाच्या अंतरावर आणली हे खरेच. खरे तर आज हे कमी झालेले अंतरही अनेकांच्या अंगावर येत आहे. त्याने माणसामाणसांतील भौगोलिक अवकाश मिटवला. परंतु मोबाइल हे केवळ एकमेकांशी बोलण्याचे साधन नाही. कालिदासाचे शब्द उसने घेऊन सांगायचे तर ती इटुकली यंत्रपेटी आज आपली सचिव आणि सखी बनलेली आहे. शरीराच्या एखाद्या अवयवाप्रमाणेच ती सवयीची बनली आहे. तिच्यावरचे आपले अवलंबित्व वाढतच चालले आहे. एवढे की विजेरी संपून मोबाइल बंद पडताच माणसे जगण्याचे श्रेयस हरपल्यासारखी हवालदिल होताना दिसतात. पाहू तेव्हा लोक मोबाइलच्या पडद्यात नजरा थिजवून बसलेले असतात. मोबाइलमध्ये गाणी भरून देण्याचे व्यवसाय गावोगाव चालतात आणि या मोबाइलपुरताच विजयानंद देणाऱ्या खेळांची सर्वत्र चलती असते. याहून महत्त्वाचे म्हणजे माणसे सतत कोणाशी ना कोणाशी बोलतच असतात. कधी थेट, तर कधी लिहून. एकमेकांबरोबर सतत बोलण्याची, एकमेकांच्या दुरून संपर्कात राहण्याची आवश्यकता माणसाला भासते ती केवळ हाती हे साधन आहे म्हणून की ती त्याची उपजतच निकड आहे याचा शोध मानवी वर्तनाच्या अभ्यासकांनी जरूर घ्यावा. एक मात्र खरे की मोबाइलने भारतीयांना पूर्णत: कहय़ात घेतले आहे. मदतीच्या मिषाने आलेला हा उंट मानवी अस्तित्वाचा तंबूच जणू बळकावून बसला आहे. हे चांगले की वाईट? हा शाप की वरदान? कदाचित यापुढील शाळकरी निबंधांचा हाही एक विषय ठरेल. वस्तुस्थिती मात्र अशी आहे की या साधनाने असा विचार करण्याचा अवकाशही माणसांजवळ ठेवलेला नाही. याचे कारण, आपल्या हे लक्षात येत नाही, परंतु मोबाइल फोनने मानवी जीवनास एका वेगवान आवर्तात ढकलून दिले आहे. वेग हे आजच्या माहिती आणि तंत्रज्ञान युगाचे अनन्यसाधारण वैशिष्टय़ आहे. ‘बस दो मिनट’ हे या जमान्याचे घोषवाक्य आहे. पूर्वीचे अक्कलशून्य दूरध्वनी संच तेथे टिकणे शक्यच नव्हते. त्यांची जागा आजच्या स्मार्टफोनने घेतली आहे. वेगवान संपर्क, झटपट माहिती पुरवठा, तत्काळ विविध सेवा देणारी आणि म्हणूनच व्यक्तीला कालानुरूप असण्याचा विश्वास देणारी ही यंत्रे तिला एकाच वेळी सबल करीत आहेत आणि त्याच वेळी त्याला एका अवकाशव्यापी व्यूहाच्या – मॅट्रिक्सच्या कडीमध्ये अडकून टाकीत आहेत. माणूस आज वेगळा राहूच शकत नाही. तो एकटा राहू शकत नाही. आभाळाच्या पलीकडील ध्रुवीय उपग्रहांपासून मोबाइल मनोऱ्यांपर्यंत आणि मोबाइलमधील सिम कार्डापासून संगणकांच्या महाकाय सव्‍‌र्हपर्यंत सगळेच त्याच्यावर नजर ठेवून आहेत. त्यातून सुटायचे म्हटले तरी अवघड आहे. खासगी अवकाशाचा विनाश की जगात टिकण्यासाठी आवश्यक असलेली माहिती असे दोनच पर्याय त्याच्यासमोर आहेत. बहुसंख्यांना त्या खासगी अवकाशाची निकडच भासेनाशी झाल्यामुळे त्यांची निवड माहिती, संपर्क आणि सेवा हीच आहे. मोबाइलचे जाळे पसरण्यामागील महत्त्वाचे कारण हे आहे.
मोबाइल संपर्क यंत्रणेची दुसरी-तिसरी पिढी आपण आज अनुभवत आहोत. चौथी आपल्या दारावर येऊन उभी आहे. वेग वाढतोच आहे. माहिती, सेवा, संपर्क आणि मनोरंजन धबाबा आदळत आहे. त्याचे दृश्य परिणाम मोठे मौजेचे आहेत हे खरेच. परंतु या सर्वातून एकाच मापाचे वैचारिक आणि भावनिक साचे निर्माण होत चालले आहेत. मोबाइलमधील व्हॉट्सअ‍ॅप वा तत्सम संदेशवाहक अ‍ॅप्समधून होत असलेले दळणवळण हा त्याचा भयावह पुरावा आहे. त्या संदेशांचा गदारोळ एवढा असतो की त्यातील माहिती तपासून पाहणे, त्यावर शांतचित्ताने विचार करणे याची उसंतही कोणास मिळत नाही. माणसे सतत आलेला संदेश पुढे पाठविण्याच्या गडबडीत. आजचा सामाजिक चिडचिडेपणा हा माणसाच्या हरवलेल्या अवकाशाचा आणि गमावलेल्या उसंतीचा परिणाम आहे, हे नीट ध्यानी घेतले पाहिजे.
अवघ्या २० वर्षांत मोबाइलने देशाच्या सामाजिक व्यवस्थेत हे बदल घडवून आणले आहेत. जगण्याचे िरगटोन बदलले आहेत. अर्थात ज्या देशात संपर्काची एसटी वा रस्त्यासारखी साधने अद्यापही अनेकांच्या आवाक्यात नसतात त्या देशात जर मोबाइल स्वस्तात उपलब्ध होत असेल तर तो पसरणारच यात काही कौतुक नाही. त्यातून काही बाबतीत झालीच तर प्रगती होईल, परंतु ते प्रगतीचे साधन मानण्यात फारसा अर्थ नाही. तसाही तो अगदी शंभर कोटी लोकांच्या हातांत असला तरी लहानच आहे. तो जसजसा मोठा होत जाईल तसतसे त्याचे परिणाम आणखीही दृग्गोचर होतील. मात्र ते काहीही असले, तरी आता त्यापासून सुटका नाही. त्याला दरवर्षी ३१ जुलला वाढदिवसाच्या हार्दकि शुभेच्छांचा एसेमेस पाठविणे एवढेच आता आपल्या हाती उरलेले आहे.

First Published on August 1, 2015 12:36 pm

Web Title: twenty one years ago mobile launch in india
टॅग India,Mobile