पाण्यात राहूनही कोरडे राहता येण्यासाठी एक वेगळेच कौशल्य अंगी बाणवावे लागते. ते मिळवण्यासाठी कष्ट फार करावे लागत नसले, तरीही तोंडची वाफ फुकाच दवडण्याची सवय अंगी जडवावी लागते. केंद्रात आणि राज्यात भाजपची सत्ता स्थापन झाल्यापासून महाराष्ट्रातील शिवसेनेचे हे असे झाले आहे. त्यामुळे सेनेला आता माध्यमांमधील भाजप नेत्यांच्या भ्रष्टाचाराच्या बातम्या खुपू लागल्या आहेत. सेनेचे कार्यकारी अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी ‘जिकडे पाहावे तिकडे भ्रष्टाचार’ असे वक्तव्य केले. त्यामागचे राजकारण न कळण्याएवढे सेनेचे सैनिकही खुळे नाहीत आणि भाजपचे कार्यकर्तेही. सेनेसाठी केंद्र आणि राज्यातील सत्तेपेक्षा महत्त्वाचे आहे, ते मुंबई महानगरपालिकेवरील आपले वर्चस्व. कोणत्याही स्थितीत त्याला नख लागता कामा नये, याची सेनेला नेहमीच काळजी असते. जगातील अनेक देशांच्या अर्थसंकल्पांपेक्षाही अधिक उलाढाल करणारी मुंबई महापालिका, हे सेनेचे सर्वात मोठे बलस्थान आहे. या पालिकेच्या निवडणुकीत आता सेनेला भाजपची लुडबुड नको आहे. जरी या दोन्ही पक्षांनी ती निवडणूक एकत्रित लढण्याचे ठरवले असले तरीही. केंद्रातील सत्तेत मोठा वाटा हवा असणाऱ्या सेनेला भाजपने वाटाण्याच्या अक्षता लावल्या. सेना आणि भाजपची युती झाल्यापासून महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीच्या निकालांमध्ये कायम सेनेचीच सरशी असे. याचे कारण त्यांच्या वाटय़ाला उमेदवारही जास्त येत. परिणामी आपण मोठा भाऊ आणि भाजप लहान भाऊ असा समज सेनेच्या मनात रुतून बसला. या समजाला गेल्या निवडणुकीत तडा गेला, तेव्हा सेनेच्या नेत्यांना फुरंगटून बसण्याशिवाय काहीच करता आले नाही. स्वतंत्र राहण्याची भाषा करून धमकावण्याचा प्रयत्न केला, तेव्हा केंद्रातील सत्तेतून बाहेर का पडत नाही, असा प्रश्न सेनेला विचारण्यात आला. त्याचे पटणारे उत्तर देण्याऐवजी केंद्रातील सत्तेत टिकून राहण्याचेच धोरण सेनेने ठेवले. महाराष्ट्रात तर न मागता दिलेला राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा नाकारून तेव्हा भाजपने नैसर्गिक संबंधाच्या नावाखाली शिवसेनेला बरोबर घेऊन सत्ता स्थापन केली. तरीही सेनेचा हा हट्ट काही पुरा होईना. आता मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत मोठय़ा भावाचीच भूमिका बजावायची असल्याने तेथे आपल्या सत्तेत कुणी वाटेकरी सेनेला नको आहेत. हे असे असले, तरीही जर उद्धव ठाकरे यांना मात्र सर्वत्र भ्रष्टाचारच दिसत असेल, तर त्यांनी सत्तेतून बाहेर पडणेच अधिक श्रेयस्कर. सत्तेतही राहायचे आणि टीकाही करायची हे काही सभ्य संस्कृतीचे लक्षण नव्हे. विधानसभा निवडणुकीत आपण एकहाती सत्ता मागितली होती, ही त्यांच्या मनातली खदखद असली, तरीही त्याचा उत्तरार्ध सगळ्यांना ठाऊकच आहे. आता निदान मुंबई पालिकेत तरी तशी सत्ता मिळावी, अशी त्यांची इच्छा आहे. त्यासाठी असे फासे टाकावे लागताहेत. सेनेचे संस्थापक बाळासाहेब ठाकरे अशा द्यूताच्या राजकारणात रस बाळगत नसत. जेव्हा जे वाटले, तेव्हा ते तसेच होईल, असा त्यांचा बाणा असे. मग भविष्यात काय घडेल आणि अमुक काळानंतर कोण कोणाबरोबर असेल, असल्या चिंतांनी त्यांना कधीच सतावले नाही. सेनेचा हा इतिहास नेते विसरले तरीही सैनिक विसरणे शक्य नाही. सत्तेत राहून सत्ताधाऱ्यांवरच टीका करण्याची ही रीत काय सांगते, हेही म्हणूनच त्यांना समजू शकणारे आहे.

Yoga for a healthy liver: Here are 3 asanas that work
यकृत निरोगी ठेवण्यासाठी ‘ही’ योगासने फायदेशीर; जाणून घ्या करण्याची सोपी पद्धत
article about elon musk india visit elon musk investment in india
अन्यथा : जगी ज्यास कोणी नाही, त्यास..
Mentally healthy Psychotherapy Mental health problems
ताणाची उलगड: मानसिकदृष्ट्या निरोगी आहोत का?
Techie doubles his income
वर्षाला १ कोटी रुपये कमावण्यासाठी व्यक्तीने शोधला जुगाड, लाखोंचे शैक्षणिक कर्जही फेडलं, एकाच वेळी केल्या….