हर हर.. (हे हर हर नुसतेच.. मोदी नव्हे)! हे भलतेच झाले. मुंग्यांनी मेरू पर्वत तर गिळला नाही ना? राज्यातील पाटबंधारे आणि/किंवा सार्वजनिक बांधकाम खात्याचे प्रकल्प कोणतीही खर्चवाढ न होता पूर्ण तर होऊ लागले नाहीत ना? ठाकरेबंधूंचे तुझ्या गळा माझ्या गळा असे तर झाले नाही ना? पृथ्वीराज चव्हाण यांना एखादा विनोद कळला आणि ते खळाळून हसले असे झाले नाही ना? नितीन गडकरी यांनी कडकडीत लंघन तर नाही केले? साधा पट्टेवाला देशाच्या गृहमंत्रिपदापर्यंत कसा गेला हे सांगावयाची आता गरज नाही असे तर सुशीलकुमार शिंदे यांना वाटले नाही ना? मग हे असे काय झाले? राजमान्य राजश्री सकलराजकारणमंडित आदरणीय शरदचंद्ररावसाहेब पवार हे असे कसे काय वदते झाले? मतदानाच्या तारखांतील फारकत पाहता एके ठिकाणी मतदान झाल्यावर अंगुलीची शाई पुसून अन्यत्र मतदानास जावे अशी जाहीर मसलत पवारसाहेबांनी द्यावी? असे बोलून आपल्या अखंड राजकीय यशाचे गुपित तर आपण फोडत नाही ना अशी पुसटशी शंका त्यांना येवो नये? बरे, हे इतके सोपे का आहे? एका अन्नछत्रातील भोजनावर ताव मारून पळीपंचपात्री वाळायच्या आत दुसऱ्या अन्नछत्राच्या रांगेत उभे राहावे इतके का ते साधे आहे? एका राजकारण्याच्या दारात वाट पाहून झाल्यावर दुसऱ्याच्या दारात जावे हे महाराष्ट्रातील लेखकु, कलावंत वा कुलगुरूंना एक वेळ शोभावे. पण म्हणून त्यांनी मतदारांना तसा सल्ला द्यावा? बोटाची शाई वाळायच्या आत ती पुसून टाका आणि दुसरीकडे जाऊन मतदान करा..? हर हर. आमच्या मते राजकारणात अतिदीर्घकाळ व्यतीत केल्यामुळे आमच्या पवारसाहेबांची राजकारणाविषयी अतिपरिचयामुळे होणारी अवज्ञा झाली असावी. अन्यथा ते असे बोलते ना! या अतिपरिचयामुळे त्यांना आपली राज्यव्यवस्था ही लोकशाही नसून लोकशाई आहे असे वाटले असण्याची शक्यता नाकारता येत नाही. अर्थात पवारसाहेबांसारख्या ज्येष्ठाच्या मनी शाही काय आणि शाई काय, असा प्रश्न निर्माण झाला असेल काय? या दोनही मानल्या तर खुणा. नाही मानायच्या असे ठरवले तर कधीही पुसता येणारे ठिपके असे वाटून त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना वरील संदेश दिला असेल काय? नुसते प्रश्न आणि प्रश्नच. ज्यांनी उत्तरे द्यावयाची त्यांनीच प्रश्न निर्माण केल्यास त्याचे गांभीर्य अधिकच वाढते. समस्त राष्ट्रवादीजनांचे सध्या असे झाले असेल. राजकीय पटलावर कोणताही प्रश्न पडला आहे आणि त्याचे उत्तर पवारसाहेबांकडे नाही, असे होणे केवळ असंभव. भले हा प्रश्न मग शिवसेनेतील असो, भाजपमधील गोपीनाथराव वा नितीनभौ यांच्यातील असो, सहाध्यायी काँग्रेसमधील असो वा खुद्द राष्ट्रवादीतील असो, थोरल्या पवारसाहेबांकडे उत्तर नाही असे होणे नाही. कोणत्याही प्रश्नावर उत्तर शोधण्याचे त्यांचे कौशल्य इतके की बऱ्याचदा त्यांच्याकडे उत्तर आहे म्हणून त्यासाठी प्रश्न निर्माण होताना या महाराष्ट्राने पाहिलेले आहे. प्रश्ननिर्मितीच्या आधीच उत्तर शोधून तयार ठेवण्यात त्यांच्याइतका माहीर अन्य कोणी या महाराष्ट्रभूमीत नाही. तरीही त्यांनीच प्रश्न निर्माण करावा म्हणजे काय? बोटाची शाई पुसून पुन्हा एकदा मतदान करावे असे विधान त्यांनी का बरे केले असावे? तसे ते करताना त्यांनी मतदारसंघ घेतला तोदेखील साताऱ्याचा. म्हणजे साताऱ्यात केलेल्या मतदानाची खूण पुसा आणि मुंबईत येऊन पुन्हा मतदान करा, अशी त्यांची मसलत. यात त्यांनी साताराच का बरे घेतला असावा? तो तर दिव्य आणि कर्तृत्ववान उदयनराजे भोसले यांचा मतदारसंघ. ते छत्रपतींचे वंशज. तेव्हा त्यांना केलेल्या मतदानाची खूण आई जगदंबेचा प्रसाद म्हणून मिरवायला हवी. तरीही ती पुसा असे सांगण्याची जुर्रत पवारसाहेब करीत असतील तर त्यामागे खचितच काही कारण असणार. महाराष्ट्राने गौरविलेली साताऱ्याची तऱ्हा पुसायची आणि मुंबईत येऊन पुन्हा नव्याने ती खूण तर्जनीवर लावून घ्यायची, असे साहेबांचे म्हणणे. परंतु या मुंबापुरीत सहा मतदारसंघ. पण साहेबांनी नक्की कोणत्या मतदारसंघात नव्याने मतदान केले जावे ते गुलदस्त्यातच ठेवले आहे. त्यातील राष्ट्रवादीच्या वाटय़ास येईल तो एखादाच. म्हणजे मग अन्य पाच ठिकाणी पवार आज्ञापालकांनी काय करावयाचे? त्या मतदारसंघात घडय़ाळ नाही. मग त्यांनी पंजास मत द्यावे काय? तेव्हा साताऱ्यात पुसलेले शाईचे कुंकू कोणत्या उमेदवारास मत देऊन पुन्हा तर्जनीभाळी लावावे तेही त्यांनी सांगितले असते तर जास्त बरे झाले असते. मुंबईत येऊन पुन्हा मतदान करा असा संदेश साहेब देत असतील तर तो काय काँग्रेसच्या भल्यासाठी असेल की काय, या प्रश्नाच्या भुंग्याने समस्तांचे माथे भणभणून गेले आहे. साहेबांनीच जर असा सहयोगी काँग्रेसच्या भल्याचा विचार सुरू केला असेल तर त्याचा नक्की अर्थ काय, हेही कार्यकर्त्यांना कळेनासे झाले आहे. त्यात पंचाईत ही की एका लक्ष्याचा वेध घेता घेता दुसऱ्यास घायाळ करणे ही साहेबांची खासियत. त्यामुळे त्यांच्या या प्रश्नाने काँग्रेसवालेही घाम पुसताना दिसतात. साहेबांच्या सांगण्यानुसार ही मंडळी खरोखरच बोटे पुसून मुंबापुरीत आली तर त्यांची बोटे कोणत्या पक्षासमोरील बटणाकडे जातील हा प्रश्न काँग्रेसजनांना सतावू लागला आहे. त्याउप्पर काँग्रेसजनांचा मुद्दा हा की मुंबईत राष्ट्रवादीचे फार कोणी नसताना साहेब या मंडळींना मुंबईकडेच पुन्हा मतदानासाठी या असे का बरे सांगत आहेत. साहेबांच्या या सल्ल्यावर काँग्रेसची उच्चस्तरीय समिती नेमण्याची मागणी काँग्रेसजनांनी साताऱ्याच्याच पलीकडच्या कऱ्हाडचे पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे केल्याची वदंता आहे. या मागणीच्या पाठपुराव्यासाठी सातारच्याच शालिनीताई पाटील यांनाच गळ घालण्यात आल्याचेही बोलले जात आहे. साहेबांचे दिवंगत मित्र जे की बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना अत्यवस्थ असल्याने आपल्या पक्षास देऊन झालेली मते पुन्हा त्या पक्षाच्या संजीवनीसाठी वळवावीत असा तर त्यांचा कावा नाही ना, हाही काँग्रेसजनांना पडलेला प्रश्न आहे. म्हणजे स्वार्थही झाला आणि परमार्थही. असो.
परंतु आम्हाला चिंता आहे ती त्याहीपेक्षा महत्त्वाच्या घटकाला पडलेल्या प्रश्नाची. हा महत्त्वाचा घटक म्हणजे जनता, अर्थात तुम्ही-आम्ही. आमचा प्रश्न हा की या पवार कुटुंबीयांना झाले आहे काय? गुदस्ता पवारकन्या चि. सुप्रियाताई यांनी आपल्या कार्यकर्त्यांना सरकारी बस गाडय़ांऐवजी मंत्र्यांच्या गाडय़ांना आग लावा असा संदेश दिला होता. ही अशी आगलावी भाषा सुप्रियाताईंच्या तोंडी योग्य नव्हे. शिवाय त्यांनी या अग्निकार्यातून राष्ट्रवादीच्या मंत्र्यांचा अपवाद केला आहे किंवा काय, हेही कळावयास मार्ग नाही. त्यामुळे चि. सुप्रियाताईंच्या या धमकीमुळे अलीकडे मंत्री दुसऱ्यांच्याच गाडय़ांतून प्रवास करू लागले आहेत, असे म्हणतात. आणि दुसरी चिंता म्हणजे चि. अजितदादा पवार यांची. ज्यांचे बोट धरून चि. अजित हे दादा झाले त्या साहेबांनीच अशी भाषा वापरल्यास दादांनी कोणाच्या तोंडाकडे पाहावे? काकाच असे बोलू लागले तर पुतण्याने करायचे काय?
तेव्हा त्यामुळे काय केलेत काका.. असा प्रश्न अजितदादांना पडला असेल तर त्याचे गांभीर्य आपण समजून घ्यायला हवे, इतकेच.