24 November 2017

News Flash

असामान्य उद्योगपती

जगभरातील उद्योगजगतात रतन टाटा हे नाव आदराने घेतले जाते. वयाची ७५ वर्षे पूर्ण होताच

सुभाष रेगे | Updated: January 6, 2013 12:11 PM

जगभरातील उद्योगजगतात रतन टाटा हे नाव आदराने घेतले जाते. वयाची ७५ वर्षे पूर्ण होताच त्यांनी डिसेंबरअखेरीस निवृत्ती पत्करली. त्यानिमित्ताने टाटा स्टीलमधून निवृत्त झालेले अधिकारी सुभाष रेगे यांनी व्यक्त केलेल्या भावना..
भारतातील सगळ्यात मोठय़ा उद्योगसमूहाचे अध्यक्ष व जगातील एक प्रमुख उद्योगपती रतन टाटा यांनी १९९१ साली टाटा उद्योगसमूहाची धुरा आपल्या खांद्यावर घेतली व ती धुरा त्यांनी गेल्या वर्षी २८ डिसेंबर रोजी खाली ठेवली. एरव्ही सर्व क्षेत्रांतील मोठी कर्तबगार मंडळी कधी पायउतार होणार हा आम्हाला प्रश्न पडतो. पण या रत्नपारखी उद्योजकाने तशी वेळच येऊ दिली नाही. श्रीसमर्थ रामदासस्वामींच्या उक्तीप्रमाणे टाटा साम्राज्याचे हे राजे उपभोगशून्य तर राहिलेच, पण ते स्वत:च्या मस्तीत, आनंदात व समाधानी वृत्तीने निवृत्त झाले! धन्य ते राजे व धन्य त्यांची प्रजा. म्हणून तर सर्व कामगार त्यांच्यात देव पाहत. टाटांनी आपल्या उद्योगाचा पाया (बेस) कसा सशक्त व निरोगी राहील हे पाहिले. नंतर त्यांनी ‘टाटा ब्रॅण्ड’ कसदार व दर्जेदार राहील याकडे लक्ष दिले. टाटांनी आपल्या उत्पादन गुणवत्तेत कधीही तडजोड केली नाही. त्यांचे उत्पादन म्हणजे गुणवत्तेत सवरेत्कृष्टच असले पाहिजे, हे त्यांनी आपल्या कंपनीतील उच्च अधिकारी ते शॉप फ्लोअरवरील कामगारांत बिंबवले होते. २१ वर्षांत त्यांनी आपले पोलादाचे जाळे ८५ देशांत पसरविले, ही आपल्या देशासाठी अभिमानाची गोष्ट आहे. हे साध्य झाले ते त्यांच्या अंगी असलेल्या जिद्द, दूरदृष्टी, व्यावसायिक गुणवत्ता व जागतिक भान यांमुळे. टाटांचे व्यक्तिमत्त्व फारच साधे होते, हे त्यांच्या बॉम्बे हाऊसमधील कार्यालयात गेलेल्यांना समजून येते. उद्योगपती म्हणून त्यांनी कधीही बडेजाव केला नाही की स्वत:साठी उंच इमारत बांधली नाही. त्यांना देशातील गरीब जनतेबद्दल प्रेम तसेच आपल्या कंपनीतील कामगारांबद्दल आपुलकी होती. अशा या रत्नपारखी उद्योजकाने टाटा समूहाची पुढील जबाबदारी सायरस मिस्त्री या तरुणाकडे दिली ते योग्य आहे. रतन टाटा आता कंपनीचे मानद अध्यक्ष असतील. त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा!

First Published on January 6, 2013 12:11 pm

Web Title: uncommon human being industrialist
टॅग Ratan Tata