राज्य अल्पसंख्याक आयोगांच्या दहाव्या वार्षिक परिषदेमध्ये केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी केलेल्या भाषणामुळे अल्पसंख्याकांची सुरक्षितता आणि धर्मातर या दोन ज्वलंत प्रश्नांची काही उत्तरे मिळण्याऐवजी गोंधळच वाढणार, हे निश्चित. याचे कारण राजनाथ सिंह यांच्या त्या भाषणात केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे नेते एकाच वेळी डोकावत होते. त्यांच्या वक्तव्यांची दोन प्रतले सहजच स्पष्ट होत होती. ती कशी हे समजून घेण्यासाठी आपणांस राजनाथ यांनी मांडलेले मुद्दे पाहावे लागतील. त्यातील पहिला मुद्दा धर्मातरासंबंधीचा. देशात धर्मातरे होता कामा नयेत, म्हणजे येथील ख्रिश्चनांनी आणि मुस्लिमांनी धर्मातराच्या मार्गाने धर्मप्रसार करता कामा नये, ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची सर्वज्ञात भूमिका आहे. त्याचबरोबर ज्या हिंदूंचे धर्मातर झाले आहे त्यांना पुन्हा स्वधर्मात आणले पाहिजे ही संघाची दुसरी भूमिका भाजप सत्तेवर आल्यानंतरच कृतीत अवतरली आहे. राजनाथ यांना त्यात काहीही वावगे दिसत नाही. उलट ‘धर्मातर खरोखरच आवश्यक आहे का?’ असा सवाल ते करतात. येथे धर्मातराचा जो अर्थ त्यांच्या मनात आहे तो लक्षात घेण्यासारखा आहे. एका धर्माने आपण दुसऱ्या धर्माहून श्रेष्ठ आहोत हे सांगण्याचा मार्ग म्हणजे धर्मातर असा त्यांचा समज आहे. याशिवाय धर्मातर हे आमिष दाखवूनच होत असते असेही त्यांना म्हणायचे असावे. ‘लोकांची सेवा करणे ठीक आहे, पण धर्मपरिवर्तन कशाला करता?’ असा प्रश्नच त्यांनी आपल्या भाषणातून केला आहे. या सवालामागे एक आरोप लपलेला आहे आणि तो ख्रिश्चन मिशनऱ्यांवरील आहे हे समजणे कठीण नाही. केंद्रीय गृहमंत्री अल्पसंख्याक आयोगाच्या परिषदेत जेव्हा असे बोलतात, तेव्हा त्यातून काय संदेश जातो हे वेगळे सांगण्याची आवश्यकता नसते आणि याउपर ते पुन्हा जेव्हा ‘अल्पसंख्याकांना सुरक्षितता देण्याची गरज आहे’ हेदेखील सांगतात तेव्हा तर त्यातून गोंधळच निर्माण होतो. एकीकडे अशी सुरक्षिततेची भाषा करायची अन् दुसरीकडे अल्पसंख्याकांच्या प्रार्थनास्थळांवरील वाढत्या हल्ल्यांचा उल्लेखही करायचा नाही, यातील विसंगतीने सरकारच्या भूमिकेविषयीच प्रश्न निर्माण होत आहेत. राजनाथ यांच्यासारख्या मुत्सद्दय़ाच्या लक्षात ही बाब येत नसेल असे नाही. परंतु त्यांची अडचण ही की ते आपल्याच वैचारिक प्रतिमेचे कैदी आहेत. या भाषणातील दुसरा मुद्दा होता मुस्लिमांच्या वाढत्या लोकसंख्येचा. राजनाथ यांनी या मुद्दय़ावर संघ संघटनांना धोबीपछाडच दिली आहे. या देशात किती मुसलमान आहेत याने काय फरक पडतो? त्यांची लोकसंख्या वाढत असेल तर खुशाल वाढू देत. तो काही मुद्दा नाही. परंतु धर्मातराचे चक्र मात्र थांबलेच पाहिजे असे ते म्हणाले. एरवी कोणा नेत्याने हे उद्गार काढले असते तर राजनाथ यांनीच त्याच्यावर स्यूडोसेक्युलर म्हणून टीकेची झोड उठवली असती. आज त्यांनाच हे बोलावे लागत आहे, याचे कारण ते सरकारचे प्रतिनिधी आहेत. राजनाथ यांच्या संपूर्ण भाषणाकडे पाहिले तर एक बाब स्पष्ट दिसते, ती म्हणजे त्यात सलग असा भूमिकेचा सूरच नाही. याला चुचकार, त्याला चिमटा काढ, त्यावर बोट ठेव आणि आपलेच कसे खरे हेही ठसव, असेच या भाषणात चालले होते. त्यामुळे त्याचे मोल केवळ या महत्त्वाच्या विषयांवरील मल्लिनाथी यापलीकडे जात नाही. केंद्रीय गृहमंत्र्यांनी असे मल्लिनाथ असणे ही काही फार चांगली गोष्ट नव्हे.