जग मावळून त्या एका परमतत्त्वात विलीन होणं, हेच जर खरं अध्यात्म असेल तर त्यात समूहातील सुरक्षित भावनेचा संबंध येईलच कुठे, असा प्रश्न हृदयेंद्रनं विचारला. त्यावर ज्ञानेंद्र त्याच्याकडे रोखून पहात म्हणाला..
ज्ञानेंद्र – कठोपनिषदातला पहिलाच मंत्र आहे.. ॐ सह नाववतु। सह नौ भुनुक्तु। सह र्वीय करवावहै। तेजस्वि नावधीतमस्तु। मा विद्विषावहै।। ॐ शान्ति: शान्ति: शान्ति:।। म्हणजे परमात्मा आमचं रक्षण करो, आमचं पालन करो, आम्ही संघटितपणे सामथ्र्य संपादन करावं, आमच्या अध्ययनानं आम्हास आत्मप्रकाश प्राप्त होवो, आमच्याकडून परस्परांचा द्वेष न होवो, आम्हाला आत्मशांति व प्रेम लाभो..
हृदयेंद्र – पण हा मंत्र समूहाचा नाही, गुरु आणि शिष्य ही प्रार्थना करीत आहेत, असाही त्याचा अर्थ आहे..
ज्ञानेंद्र – गुरु हा मंत्र शिष्याला शिकवत आहेत, असं म्हण हवं तर.. तुझ्याच म्हणण्याप्रमाणे जो सद्गुरू हा परमात्म्याचंच रूप आहे त्याला आपल्या रक्षणासाठी कशाला आणि कुणाची प्रार्थना करावी लागेल? त्याला शिष्याच्या जोडीनं कुठलं सामथ्र्य मिळवावं लागेल? त्याचं कोणतं अध्ययन बाकी आहे ज्या योगे त्याचं आत्मप्रकाश मिळवणं बाकी आहे? तो कुणाचाच द्वेष करीत नाही.. तेव्हा अध्यात्माचं ध्येय बाळगणाऱ्या समूहानंच केलेली ही प्रार्थना आहे.. आणि हृदू तू तरी समूहापासून दूर आहेस का? समूहात तुला सुरक्षित वाटत नाही का?
योगेंद्र – तुमच्या दोघांकडूनही काहीतरी गफलत होत आहे.. हृदू जगाचं मावळणं म्हणजे समूहापासून दूर होणं नाही, हे तूही मागे बोलला होतास.. जगाचं मावळणं म्हणजे जगाचा प्रभाव मावळणं.. आणि ज्ञान्या तुझ्या बोलण्यात काहीअंशी तथ्य असलं तरी ते पूर्ण बरोबर नाही.. पंढरीत भक्तांना परस्परांच्या सान्निध्यात आनंद मिळत होता तो ते समविचाराचे आणि समभावनेचे होते म्हणून नव्हे.. ज्याला एका विठ्ठलाशिवाय दुसरं भानच नाही, त्यांचं हे एकत्र येणं होतं.. ते एकटे असते तरी त्याच भावनेत तल्लीन असतेच, पण अखेर तुकोबाही म्हणतात ना? त्याप्रमाणे त्यांची सर्वाची भक्तीची जात एकच होती आणि म्हणून त्यांच्या एकत्र येण्यातून भक्ती-प्रेमाचा उत्तुंग अविष्कार अनुभवता आला.. जो आजही टिकून आहे आणि आजही प्रेरणा देत आहे.. ज्ञानेश्वरांपाठोपाठ निवृत्ती, सोपानदेव, मुक्ताबाईंनी समाधी घेणं.. नामदेवांसकट त्यांच्या घरातील सर्वानीच समाधीस्थ होणं आणि केवळ गर्भवती असल्यानं मागे राहिलेल्या लाडाईनं, मला ते भाग्य का नाही, अशी आर्तता आपल्या अभंगात व्यक्त करणं.. हे सारंच अलौकिक आहे.. अशा भावशिखरावर जे संत होते त्यांच्या एकत्र येण्यात समूहासक्त भावनेचा स्पर्शही नव्हता..
बुवा – योगेंद्र म्हणाले त्यात बरंच तथ्य आहे.. इथे सारे एका विठ्ठलासाठीच जमले होते.. एकमेकांमध्ये त्या विठ्ठलाचंच रूप पाहात होते.. आणि म्हणूनच एकमेकांचा संग हा त्या विठ्ठलाचाच संग झाला होता..  म्हणूनच ‘‘ऐसा नामघोष ऐसे पताकाचे भार। ऐसे वैष्णव डिंगर दावा कोठें।।’’ असं सेना महाराज भावतन्मयतेनं म्हणताहेत..
ज्ञानेंद्र – तत्त्वज्ञानात ‘कल्पनेचा अनुषंग’ म्हणून एक सूत्र आहे.. म्हणजे अनेक कल्पनांच्या अनुषंगानं, आधारानं एका मुख्य कल्पनेला बळकटी द्यायची..  तसं हा नामघोष, हे पताकांचे भारे, वाळवंटातला तो खेळ.. या साऱ्यातला आनंद हा मुख्य विठ्ठलभक्तीच्या बळकटीकरणाला पूरकच होता.. इथे विठ्ठलभक्ती ही कल्पना आहे, असं माझं म्हणणं नाही, फक्त तत्त्वज्ञानाच्या त्या सूत्राच्या आधारे मी या साऱ्याचा वेगळ्या अंगानं विचार करतोय..
बुवा – पण हे सारं सुख, हा सारा आनंद एक विठ्ठल आहे, म्हणूनच तर आहे! त्या विठ्ठलाचं प्रेमच या साऱ्यातून वाढत आहे.. एखाद्या लहान अर्भकाचे आई किती तऱ्हांनी लाड करते.. त्याच्यासाठी किती गोष्टी करते.. पण त्या प्रत्येकात अर्भकाचंच प्रेम असतं.. कोणतीही गृहिणी स्वयंपाक रांधते तेव्हा त्यात घरातल्याच सर्वाच्या आवडीनिवडीचा विचार असतो.. त्यात प्रेमच असतं ना? तसं या नामघोषातून, या पताकांच्या सळसळीतून, वैष्णवांच्या वाळवंटातील गर्दीतून त्या एकाचंच प्रेम वाढत होतं.. अनेकातून एकाकडे जात ऐक्य साधणाही ही वारी होती!
चैतन्य प्रेम