सद्गुरूंचा या जगातला वावर, प्रत्येक व्यवहार, प्रत्येक कृती ही माझी सेवाच आहे, असं भगवंत कृतज्ञतेनं नमूद करतात. स्वामी स्वरूपानंद संपादित ‘ज्ञानेश्वरी नित्यपाठा’तील पुढील ओवीत या कृतज्ञतेची परमावधी साधत भगवंत म्हणतात, ते माझ्याच योग्यतेचे आहेत! ही ओवी अशी : ‘‘ते पापयोनीहि होतु का। ते श्रुताधीतहि न होतु का। परी मजसी तुकितां तुका। तुटी नाहीं।। ७१।।’’ (ज्ञा. अ. ९, ओवी ४४९). अरे, जगाच्या दृष्टीनं त्यांचा जन्म उपेक्षित अशा आर्थिक वा सामाजिक गटात का झाला असेना, ते ऐकून-वाचून ‘पंडित’ झालेले तर सोडच, पण त्यांना अक्षरओळखदेखील का झाली नसेना, माझ्याशी त्यांची तुलना केली तर ते त्याच तोलामोलाचे आहेत! आपल्या महाराष्ट्रातच किती विविध आर्थिक-सामाजिक स्तरांत संत जन्मले पहा! संपूर्ण चराचरातला पसारा सद्गुरू जर आवरत आहेत तर ते प्रत्येक स्तरावर त्यांच्यासारखे, त्यांच्यातलेच एक होऊन जाणारच ना? मी समजा सामान्य परिस्थितीत जगत असेन, तर श्रीमंत परिस्थितीतल्या माणसाशी माझी जवळीक होणं सोपं आहे का? त्यामुळेच सर्वच स्तरांवर, सर्व प्रकारच्या द्वैतमय स्थितीत सद्गुरू त्या-त्या स्तरानुसार वावरले, पण त्यांचं कार्य, त्यांचा मूळ हेतू कणमात्रही त्यांच्या नजरेआड झाला नाही. प्रत्येक संतानं व्यापकतेचीच शिकवण दिली. स्वामी स्वरूपानंद म्हणतात, ‘‘कधीं खाई तूप-रोटी। कधीं राहे अर्धपोटी।। १।। कधीं झोंपे गादीवरी। कधीं घोंगडी अंथरी।। २।। कधीं लोकरीची शाल। कधीं पांघरी वाकळ।। ३।। कधीं हवेली सुंदर। कधीं चंद्र-मौळी घर।। ४।। कधीं सज्जनांची भेटी। कधीं नाठाळाशीं गांठी।। ५।। कधीं गळां पुष्प-हार। कधीं निंदेचा भडिमार।। ६।। कधीं सुखाचा संसार। कधीं हिंडे दारोदार।। ७।। स्वामी म्हणे आत्म-स्थित। संत सुखदु:खातीत।। ८।।’’ (संजीवनी गाथा, क्र. ५७). समस्त द्वैतमय परिस्थितीत राहूनही सद्गुरूंची आत्मस्थिती कणमात्र ढळत नाही आणि जगाला आत्मस्थितीकडे वळवण्याचं, ‘विश्वस्वधर्म सूर्ये पाहो’ या स्थितीकडे वळवण्याचं त्यांचं कार्य कधी थांबत नाही. आम्ही मात्र सुखदु:खातीत संतांना दु:खच द्यायचा प्रयत्न करीत राहतो. निरक्षराकडून खरं अक्षर असं ज्ञान घ्यायला साक्षर कमी पडतात हेच खरं. त्यामुळे ‘श्रुताधीत’ अशा पढतपंडितांची श्रीतुकाराम महाराजांच्या अभंगांना धर्मविरोधी ठरविण्यापर्यंत मजल गेली. चोखामेळा महाराजांना मंदिराची पायरी नाकारण्यापर्यंत मजल गेली. भगवंतानं मात्र त्यांच्याशी आपलं ऐक्य वारंवार सिद्ध केलं. या ७१व्या ओवीशी स्वामी स्वरूपानंद संपादित ‘ज्ञानेश्वरी नित्यपाठा’चा पूर्वार्ध जणू संपतो आणि उत्तरार्धात प्रत्यक्ष कृतीचा निर्देश आहे. एक विसरू नका, हा सर्व बोध अशा शिष्याला सुरू होता जो तन, मन आणि प्राणांसकट सद्गुरू सेवेत रत होता. आता जो मुळात सद्गुरू सेवेत लीन आहे, त्यानं सद्गुरूमय कसं व्हावं, हा प्रश्न का विचारला असावा? तर त्याच्या निमित्तानं जणू सद्गुरूंनीच लोकोपकारक असा प्रश्न उत्पन्न केला आणि त्याचा बोध केला. अखेरच्या ओव्यांतला हा कृतीचा बोध असाच आपल्या सर्वासाठी आहे.