राजकीय कटकारस्थानांचे केंद्र कोणते, असा प्रश्न जर कुणी विचारला, तर उत्तर प्रदेश हे पहिले उत्तर ठरू शकेल यात शंका नाही. प्रत्येक घडामोडीला कारस्थानाची किनार असावी असाच इथल्या राजकारणाचा माहोल असतो. तीन वर्षांपूर्वी मायावतींच्या एका जाहीर सभेत मधमाश्यांचे मोहोळ उठले आणि तो प्रकार म्हणजे प्रतिस्पर्धी पक्षाकडून सभा उधळण्यासाठी घडविलेल्या राजकीय कारस्थानाचा भाग असावा या संशयाने मायावतींना पछाडले. तातडीने चौकशी सुरू करण्याचे आदेश मायावतींनी दिले आणि पोलिसांनी क्षणाचाही विलंब न लावता, काही अज्ञातांविरुद्ध गुन्हादेखील नोंदविला. गंमत म्हणजे, राजकीय कटात सामील असल्याचा संशय असलेल्या मधमाश्या आसपास घोंघावत असतानादेखील विचलित न होता मायावतींनी आपले भाषण सुरूच ठेवले आणि पक्षाच्या निष्ठावान कार्यकर्त्यांनीही ते शांतपणे ऐकून घेतले. त्या कटाचे मूळ कोठे शिजले, ते उजेडात आल्याचे ऐकिवात नाही, पण उत्तर प्रदेशच्या राजकारणात शिजणारे कटदेखील बहुरंगी असतात, हे या प्रकारामुळे सर्वतोमुखी झाले. या कटालाही मागे सारणाऱ्या एका घटनेने सध्या खळबळ माजविली, आणि पोलीस खात्याच्या शोधकौशल्याचीही कसोटी लागली. उत्तर प्रदेशचे प्रभावशाली नगरविकास मंत्री आझम खान यांच्या तबेल्यात बांधलेल्या सात म्हशींचे साखळदंड कापून काही चोरटय़ांनी त्या म्हशी लांबविल्या आणि मंत्र्याच्या चोरीला गेलेल्या म्हशींच्या शोधासाठी अवघे पोलीस दल कामाला लागले. मुझफ्फरनगरातील दंगलींची आणि दंगलग्रस्तांच्या छावण्यांमधील हलाखीची राष्ट्रव्यापी चर्चाही मागे पडली. म्हशींचा शोध घेण्यासाठी श्वानपथक दाखल झाले. वासावरून चोरीचा छडा लावणाऱ्या या कुत्र्यांना मात्र, चोरीचा माल शोधावयाचा की चोरांचा छडा लावायचा, हे समजतच नव्हते. त्यामुळे म्हशींच्या शोधाला विलंब झाला आणि कर्तव्यात हलगर्जी केल्याच्या ठपक्यावरून तीन पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबनाची कारवाई ओढवून घ्यावी लागली. आपल्या तबेल्यातील लाडक्या म्हशींच्या चोरीमुळे अस्वस्थ झालेल्या आझम खान यांच्या दु:खात अन्य काही मंत्रीही सहभागी झाले आणि पोलिसांच्या निलंबनाच्या कारवाईचेही काहींनी समर्थन केले. तोवर पोलिसांनी कसोशीने शोध घेऊन आझम खान यांच्या चोरीला गेलेल्या म्हशी त्यांच्या तबेल्यात आणून बांधल्या होत्या. उत्तर प्रदेशच्या या प्रभावशाली मंत्र्याच्या दावणीला बांधलेल्या त्याच्या म्हशींचे मोल मोठे आहे, हे या घटनेने जसे स्पष्ट झाले, तसेच तेथील पोलिसांची अवस्था मात्र राजकीय नेत्यांच्या दावणीला बांधलेल्या जनावरांसारखी झाल्याचेही उघड झाले आहे. जवळपास सहा हजार पोलीस अधिकारी वेगवेगळ्या राजकीय नेत्यांच्या सेवेत गुंतले आहेत, आणि त्यांच्यावर उत्तर प्रदेशचे सरकार वर्षांकाठी सुमारे २५ कोटी रुपये खर्च करीत आहे. अशा कडेकोट बंदोबस्तातही, एका मंत्र्याच्या तबेल्यातून झालेल्या म्हशींच्या चोरीमागे काही राजकीय कटकारस्थानच होते का, याचाही शोध आता कदाचित सुरू होईल. या चोरीचा छडा लावण्यासाठी रात्रीचा दिवस करणाऱ्या तब्बल दोनशे पोलिसांना कोणती बक्षिसी मिळणार, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. या चोरी प्रकरणानंतर काही नेत्यांचे मेंदूच गायब झाल्याची खुसखुशीत चर्चाही सुरू झाली असून अनेकांनी वारंवार गुडघ्यांवरून हात फिरवून आणि गुडघे खाजवून आपापले मेंदू शाबूत आहेत किंवा नाही हे तपासले, असेही सांगण्यात येते. उत्तर प्रदेशातही सध्या नरेंद्र मोदींच्या सभांची जोरदार चर्चा आहे. दोन दिवसांकरिता का होईना, जनतेच्या मनात मुरलेली मोदीनामाची हवा काढून घेण्याचे काम आझम खान यांच्या म्हशींनी बजावल्याचा सूरही कुठेकुठे उमटत आहे. असे असेल, तर या चोरीलाही कारस्थानाचा वास येणारच की!