मानेवर रुळलेले पांढरे केस, वेशभूषा म्हणजे गुडघ्यापर्यंतचा झब्बा आणि पायजमा. औरंगाबादमध्ये आल्यावर कोणालाही सहज भेटता येईल, असे व्यक्तिमत्त्व म्हणजे बशर नवाज. १९३५ चा त्यांचा जन्म. शिक्षणही तसे फार म्हणता येणार नाही. पण म्हटले तर त्या काळी म्हणजे १९५२ मध्ये ते मॅट्रिक झालेले. १९५४ मध्ये शाहराह या साहित्यविषयक मासिकात पहिली गझल लिहिली. त्या वर्षी ती सर्वोत्कृष्ट ठरली. तसा हा माणूस अवलिया. म्हणजे निवडणुका लढविल्या, त्यातील चढ-उतारही पाहिले. पण गझल एवढय़ा ताकदीची की, मानवी भावभावना काही शब्दात मनात साठवून ठेवाव्याशा वाटतात.
बशर नवाज यांनी पुरोगामी विचार मांडले. त्यांच्या कवितेत आणि समीक्षेतही ते मनाला पटलेली गोष्ट न सांगता ठेवत नसत. त्यांच्या गझला गुलाम अली, लता मंगेशकर, मोहम्मद अजीज, तलत अजीज, भूपिंदरसिंग, मेहदी हसन यांसारख्या नामवंत गायकांनी गायल्या. १९८३ मध्ये दूरदर्शनने अमीर खुस्रो यांच्यावर मालिका सुरू केली होती. त्याच्या २६ भागांचे लिखाण बशर नवाज यांनी केले. त्यांनी आकाशवाणीवर ६० नाटय़ रूपांतरणे लिहिली. त्यांना अनेक पुरस्कार मिळाले. ते मराठी आणि उर्दू या दोन काव्यक्षेत्रातील दुवा म्हणून ओळखले जात. अनेक मराठी कवी त्यांचे मित्र होते. साहित्य, सांस्कृतिक क्षेत्रातील अत्यंत छोटय़ा कार्यक्रमासही ते हजेरी लावत. शायरीची उंची ते मुशायऱ्यांना हजेरी लावत तेव्हाच उपस्थितांना कळे. एरवी बशर नवाज म्हणजे कमालीचा हळवा आणि नम्र माणूस. आपल्या नर्मविनोदी स्वभावामुळे ते अनेकांची फिरकी घेत. मात्र, राजकीय भूमिका घ्यायला बशर नवाज कचरले नाहीत. त्यांनी आणीबाणीच्या विरोधात बरेच काम केले. पुरोगामी विचारांची रुजवणूक व्हावी, असे त्यांचे वर्तन होते. उर्दू शायरीतील जी मोठी नावे घेता येतील त्या प्रत्येकाने बशर नवाज यांच्या काव्याची तारीफ केली. कित्येकदा त्यांना मुंबईत चित्रपटसृष्टीतून बोलावणे येई. पण औरंगाबाद हे आपल्याला मानवणारे शहर असल्याचे ते सांगत. त्यांच्या शायरीवर अनेकांनी पीएच. डी. केली. देश-विदेशात त्यांचे चाहते आहेत, म्हणूनच त्यांची शायरी मराठी, हिंदी व पंजाबी भाषेत अनुवादित झाली. कोणी खास भेटायला आले की, आवर्जून येत राहा असे सांगत. एखादा शेर ऐकवा असे म्हटले की तो आवर्जून ऐकवत. शब्दांचा अर्थ कळला नाही तरी तो समजावून सांगण्याची त्यांची तयारी असे. जात्याच कवी असल्याने जाणिवांना साद घालणारा माणूस आता काळाच्या पडद्याआड गेला.