02 March 2021

News Flash

निरुपयोगी सुस्कारा

कमालीचे क्रौर्य आणि अतिरेकी धर्मवाद हे वैशिष्टय़ असलेल्या तालिबान्यांना अमेरिकी सरकार आणि त्या देशातील कंपन्यांनी खतपाणी घातले.

कमालीचे क्रौर्य आणि अतिरेकी धर्मवाद हे वैशिष्टय़ असलेल्या तालिबान्यांना अमेरिकी सरकार आणि त्या देशातील कंपन्यांनी खतपाणी घातले. लादेननंतर आता मुल्ला ओमरही मरण पावला असला तरी इस्लामी दहशतवादाचा धोका संपलेला नाही, हे लक्षात ठेवणे गरजेचे आहे..

मुल्ला मुहंमद ओमर मुजाहिद याच्या मरणाच्या बातम्या जितक्या आल्या तितक्या अन्य कोणाच्या आल्या नसतील. हा मुल्ला ओमर म्हणजे तालिबान या कडव्या दहशतवादी संघटनेचा प्रमुख. जगात बहुतेक सर्व देशांना हवा असलेला गुन्हेगार. त्याच्या मरणाची ताजी (आणि बहुधा अंतिम!) बातमी बुधवारी प्रसृत झाली आणि हा मुल्ला ओमर दोन वर्षांपूर्वीच अल्लाला प्यारा झाल्याचे सांगण्यात आले. तसे ते याआधीही अनेक वेळा सांगितले गेले होते. परंतु या वेळी ही घोषणा करण्यासाठी आवश्यक ती माहिती जमा करणाऱ्या सर्व संस्थांत एकमत दिसत असल्याने या वेळी ती खरी आहे असे मानण्यास हरकत नसावी. या वेळी अफगाण सरकारनेदेखील मुल्लामरण खरे असल्याचे जाहीर केले आहे. दोन वर्षांपूर्वी पाकिस्तानातील रुग्णालयात मुल्लास मरण आल्याचे यात म्हटले आहे. या मरण तपशिलातील योगायोग दुर्लक्ष करता येण्याजोगा नाही. त्याची चर्चा करण्याआधी या मुल्ला ओमरची कुंडली मांडणे गरजेचे आहे.
तालिबान या दहशतवादी संघटनेचा प्रमुख इतकीच त्याची ओळख अपुरी आहे. १९७९ सालच्या डिसेंबर महिन्यात सोविएत रशियाचे सरचिटणीस लिओनिद ब्रेझनेव यांनी अफगाणिस्तानात रशियन फौजा पाठवण्याचे ठरवल्यावर त्या परिसरात कम्युनिस्टांच्या विरोधात धर्मभावना संघटित करणारे जे काही म्होरके होते, त्यातील हा एक आघाडीचा. त्या काळात अफगाणिस्तानात तत्कालीन अध्यक्ष नजीबुल्ला यांच्या विरोधात अनेकांच्या कारवाया सुरू होत्या. या नजीबुल्ला यांना रशियाचा पािठबा होता. त्यामुळे त्यांच्या विरोधात कारवाया करणाऱ्यांवर जेव्हा सरकारी दमनशाहीचा वरवंटा फिरू लागला त्यावेळी अमेरिकेने त्यास चतुरपणे धर्माचे कोंदण दिले. अमेरिकेचे तत्कालीन सुरक्षा सल्लागार झिबिग्न्यू ब्रेझिन्स्की यांनी मध्यपूर्वेतील अनेक देशांत अमेरिकेने गुप्तपणे इस्लामी धर्ममरतडांना रसद पुरवावी अशी योजना आखली. हेतू हा की सोविएत रशियाच्या सीमांवरील या देशांतून रशियाचा प्रभाव कमी व्हावा. त्या रशियाविरोधातील गनिमी काव्यात जी काही नररत्ने पुढे आली त्यातील एक म्हणजे हा मुल्ला ओमर. सुरुवातीला त्यास सौदी अरेबियाने अमेरिकेच्या मदतीने पोसले. त्या वेळी अनेक मुसलमान तरुण साम्यवादी रशियाच्या विरोधात लढण्यासाठी पाठवले गेले. त्यांची निवड, भरती करणे, त्यांना लढण्यासाठी तसेच मरण्यासाठी किमान प्रशिक्षण देणे आदी कामे एक व्यक्ती सर्व ताकदीनिशी करीत होती. सौदी राजघराण्याशी संबंधित या व्यक्तीस कोणत्याही साधनसंपत्तीची कमतरता नव्हती. कारण अमेरिकी आणि सौदी राजकारण्यांच्या कृपेने या व्यक्तीच्या कुटुंबीयांचा व्यवसाय उत्तम सुरू होता. ही व्यक्ती म्हणजे ओसामा बिन लादेन. या ओसामाने अफगाणिस्तानातील रशियाच्या विरोधात लढण्यासाठी जी काही मुहाजिर भरती केली होती, त्यामधील एक म्हणजे हा मुल्ला ओमर. तो मूळचा अफगाणीच. पश्तून. त्याचे वडील स्थानिक धर्मगुरू होते. त्यामुळे त्यास धर्माची दीक्षा घरबसल्याच मिळाली. त्याच्यासारख्या अनेक मुजाहिदीनांनी केलेला संघर्ष आणि त्याहीपेक्षा मुख्य म्हणजे सोविएत रशियात झालेले सत्ता परिवर्तन यामुळे रशियन फौजा अफगाणिस्तानात ठेवण्याबाबत धोरणात्मक बदल झाला. सोविएत रशियाच्या सरचिटणीसपदी निवडले गेलेले मिखाइल गोर्बाचोव यांनी रशियातून फौजा मागे घेण्याची घोषणा केली आणि काही महिन्यांतच, १९८९ साली, आपल्या फौजा खरोखर माघारी बोलावल्या. त्यानंतर नजीबुल्ला यांची राजवट तग धरू शकली नाही. या सर्व बंडखोरांनी त्यांना ठार करून त्यांचे शव राजवाडय़ासमोर लटकावून ठेवले. १९९२ सालची ही घटना. त्या वेळी तालिबानचा जन्म व्हायचा होता. त्या काळात अफगाणिस्तान म्हणजे गुंडपुंडांचा इलाका बनलेले होते आणि टोळीवाले आपापल्या प्रांतात धुडगूस घालत होते. त्या वेळी मदरशांत राहून आपल्या कारवाया करीत राहणाऱ्या मुल्ला ओमर यास म्हणे दैवी साक्षात्कार झाला आणि अफगाणिस्तानातील ही बजबजपुरी संपवण्यात पुढाकार घेण्यास या दृष्टान्तात सांगण्यात आले. त्या वेळी हाती काहीही नसलेल्या ओमर याने मदरशांमधील पन्नासेक विद्यार्थ्यांना हाताशी धरून एक संघटना काढली. तीत सर्व जण मदरशांत तालीम घेणारेच होते. म्हणून ती तालिबान.
कमालीचे क्रौर्य हे तालिबानचे वैशिष्टय़. कंदाहार, काबूल आदी परिसरांत त्या वेळी ज्या काही टोळ्या सक्रिय होत्या त्यात तालिबानइतकी दहशत अन्य कोणाचीही नव्हती. त्यामुळे गावागावांतून स्थानिक प्रश्न सोडवण्यासाठी गावकरी तालिबानला बोलावून घेत. त्या वेळी मुल्ला ओमरने केलेले निवाडे त्याच्या अमानुषतेची साक्ष देतात. दुसऱ्या टोळीच्या प्रमुखाचे शिरच कापून मिरव, कोणाला जीपच्या मागे बांधून फरफटवून नेत ठार कर तर कोणाला गावात भर चौकात फाशी दे, असे उद्योग ही संघटना सर्रास करीत असे. पुढे तिचा प्रभाव इतका वाढला की तालिबानने स्वत:चे सरकारच घोषित केले. विजनवासातील सरकार. ते सर्वार्थाने विजनवासातील होते. कारण त्या सरकारचा प्रमुख मुल्ला ओमर हा कधीही कोठेही प्रकट होत नसे. किमान चार वेगवेगळ्या चकमकींत तो मरता मरता वाचला. अशाच एकात त्याचा एक डोळा गेला होता, असे म्हणतात. इस्लामचे कडवे पालन हे त्याचे जीवितसूत्र होते. इस्लामला छायाचित्र काढणे मंजूर नसल्यामुळे त्याचे एकही अधिकृत छायाचित्रदेखील नाही. त्याचप्रमाणे इस्लामला मूíतपूजाही वज्र्य. त्यात पुन्हा या मूर्ती अन्य धर्मीयांच्या असल्या तर पाहायलाच नको. त्याचमुळे बामियान येथील भव्य बुद्ध मूर्ती या तालिबान्यांच्या डोळ्यांत खुपल्या आणि २००१ साली त्यांनी त्या बॉम्ब पेरून उद्ध्वस्त केल्या. तेव्हापासून तालिबान हे अतिरेकी धर्मवादास प्रतिनाम बनले. या असल्या कारवायांमुळे तालिबानची दहशत जवळपास अफगाणिस्तानात सर्वदूर पसरली. त्यातील निर्लज्ज भाग असा की आज मुल्लाच्या मरणाने सुटकेचा नि:श्वास सोडणारे अनेक तालिबान्यांस खतपाणी घालत होते. यात मुख्य अमेरिका सरकार आणि त्या देशांतील कंपन्या. त्यांनी तालिबानच्या प्रसारासाठी थेट मदत केली.
अमेरिकेचे माजी अध्यक्ष जॉर्ज बुश आणि त्यांच्या प्रभावाखालील तेल कंपन्या या यांतील महत्त्वाच्या गुन्हेगार. त्यातील दोन अत्यंत महत्त्वाच्या. युनिकॅल आणि दुसरी म्हणजे एन्रॉन. या दोन्ही कंपन्यांना ताजिकिस्तान-अफगाणिस्तान-पाकिस्तान-भारत अशी तेलवाहिनी टाकावयाची होती. ती टाकण्यातील सगळ्यात मोठा अडथळा होता तो तालिबान. कारण ही तेलवाहिनी अफगाणिस्तानच्या भूमीतून जाणार होती. तेथे तालिबान्यांचे राज्य होते. त्यामुळे त्यांनी अनुमती दिली नाही तर या कंपन्यांना मोठा फटका होता. तेव्हा या दोन्ही कंपन्यांनी थेट मुल्ला ओमर याला लक्षावधी डॉलरची लाच देऊ केली. या सर्व व्यवहारांसाठी अमेरिकेच्या सीआयए या गुप्तहेर संघटनेने मुल्ला ओमरच्या साथीदारांना अमेरिकेतील टेक्सास येथे साक्षात बुश यांच्या हवेलीवर खासा पाहुणचार आयोजित केला होता. हा इतिहास आहे. तेव्हा तालिबान्यांचे प्रस्थ वाढलेच असेल तर त्या मागील या कारणांकडे दुर्लक्ष करता येणार नाही. या तालिबान्यांच्या काळात महिलांवर प्रचंड अत्याचार झाले. केवळ एखाद्या किरकोळ कारणासाठी महिलांना दगडाने ठेचून मारण्याची शिक्षा हे तालिबानी देत. काबूलमध्ये फुटबॉल खेळण्याचा प्रमाद केला म्हणून तालिबान्यांनी त्यांचे शिरकाण केले. पुढे अमेरिकेतच सत्ताबदल झाला आणि गृहमंत्रिपद मॅडेलिन अलब्राइट यांच्यासारख्या खमक्या महिलेकडे गेल्यामुळे तालिबान्यांचे प्रस्थ कमी होऊ लागले.
पुढे ९/११ घडले आणि सगळीच समीकरणे बदलली. त्यामुळे एके काळी ज्याला पोसले त्याच्या जिवावर उठणे अमेरिकेस आवश्यक ठरले आणि ओसामा बिन लादेन आणि मुल्ला ओमर नकोसे झाले. या दोहोंतील ओसामा २०११ साली मारला गेला. दोन वर्षांनी मुल्ला ओमर गेला. परंतु म्हणून इस्लामी दहशतवादाचा धोका संपला असे नाही. इसिसच्या रूपाने ओसामा आणि मुल्ला यांची नवी पिढी समोर आली आहे. त्यामुळे मुल्लामरणाने सुस्कारा सोडणे निरुपयोगीच ठरेल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 31, 2015 12:59 pm

Web Title: usa and terror
Next Stories
1 एक शोकान्त उन्माद
2 विज्ञानेश्वराचे प्रस्थान
3 काय साधणार?
Just Now!
X