नरेंद्र मोदी हा आगामी निवडणुकातील आपला हुकमी नेता आहे, असे भाजप सांगतो. ते जर खरे असेल तर अन्य पक्षांत नाकाम ठरलेल्या नेत्यांना आता आपले म्हणण्याची गरज या पक्षास का भासावी ?
फार काळ सहन करावी लागलेली उपासमार संपण्याची शक्यता दिसू लागल्यावर संभाव्य पंगतीत आपले स्थान कोणते यावरून भुकेकंगालांत साठमारी सुरू होते. अशा वेळी अन्यांच्या पंगतीत ओरपून सुस्त झालेलेदेखील आपापली पळीपंचपात्री घेऊन नव्याने रांगेत उभे राहण्यात धन्यता मानतात. महाराष्ट्र भारतीय जनता पक्षात जे काही सध्या सुरू आहे त्यावरून याचा प्रत्यय यावा. तब्बल १५ वर्षे सत्तेविना घालवल्यानंतर नरेंद्र मोदी यांच्या आशीर्वादाने भाजपस पुन्हा एकदा महाराष्ट्रात राज्य करण्याची संधी मिळेल अशी चिन्हे आहेत. परंतु प्रदीर्घ कालानंतर मिळणाऱ्या या संधीचे सोने कसे करता येईल याची काही योजना तयार करण्याऐवजी राज्य भाजपचे नेतृत्व आपापसांतील हेवेदाव्यांत गुरफटले असून पक्षांतर्गत सत्तासंघर्षांतून भुक्कड आणि टिनपाट मंडळींना जवळ करू लागले आहेत. इतर पक्षांतून ओवाळून टाकले गेलेले वा भाकड झालेले अनेक नेते सध्या भाजपला आपले मानू लागले आहेत. यात नवीन काही नाही. बोट बुडण्याचा सुगावा हा त्या बोटीच्या कप्तानापेक्षा त्या बोटीवरील उंदरांनाच आधी लागतो. तो लागल्यावर हे भेदरलेले उंदीर आपले काय होणार या विवंचनेतून बोटीबाहेर उडय़ा मारू लागतात. उंदरांचा हा गुणधर्म बऱ्याच अंशी राजकीय पक्षांनाही लागू पडतो. निवडणुकांच्या तोंडावर त्यामुळेच पक्षांतरे होत असतात. त्यामुळे कधी सेना-भाजपसारख्या पक्षांत आयुष्य काढलेले धर्मनिरपेक्ष ठरून काँग्रेसच्या सेक्युलर गंगेत न्हाऊन पुण्यवान होतात, तर कधी या सेक्युलर पक्षांची धर्मनिरपेक्षता किती बेगडी आहे, याचा साक्षात्कार झालेले, रक्ताने काँग्रेसी असलेले नेते सेना-भाजपत सामील होताना दिसतात. सध्या देशात भाजपची हवा असल्यामुळे तेथील संभाव्य अच्छे दिनांवर हात मारून घेण्यासाठी त्या पक्षाबाहेर अनेक जण हात जोडून रांगेत उभे आहेत. या अशा दरवाजाबाहेर तिष्ठणाऱ्या पाच प्रमुख गणंगांना भाजपने नुकतेच आपले म्हटले. हे असे होतच असते. तेव्हा यात काही नवीन आहे, असे नाही. परंतु सत्ता मिळवण्याची खात्री असलेल्या भाजपवर या असल्या भाकडांना आपले म्हणण्याची वेळ यावी हीच यातील दखल घेण्याजोगी बाब.
एरवी डॉ. विजयकुमार गावित, बबनराव पाचपुते, भास्करराव खतगावकर, सूर्यकांता पाटील आणि डॉ. माधव किन्हाळकर ही मंडळी अग्रलेखाद्वारे दखल घेण्याच्या लायकीची नाहीत. यातील एकेकाचे कर्तृत्व अनुल्लेखानेच शोभून दिसावे. परंतु त्यांची सामुदायिक दखल घ्यावी लागते ती सत्तातुर भाजपला त्यांची गरज लागली म्हणून. यातील गावित यांच्या नावावर संजय गांधी निराधार योजनेत बनावट लाभार्थी घुसवण्याची कर्तबगारी नोंदलेली आहे. या कर्तबगारीची नोंद केवळ माध्यमांनीच घेतली होती असे नाही. तर न्या.      पी. बी. सावंत आयोगानेदेखील आपल्या अहवालात या डॉ. गावितांना चार रट्टे लगावले होते. भाजपचा निर्लज्जपणा हा की असे हे मान्यवर डॉक्टर गावित आदिवासी विकासमंत्री असताना याच भाजपने त्यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी विधानसभेचे कामकाज बंद पाडले होते. आता भाजपस त्याचा सोईस्कर विसर पडत असेलही. त्याचमुळे त्याची आठवण करून देणे आवश्यक ठरते. हभप बबनराव पाचपुते यांचाही लौकिक यापेक्षा वेगळा नाही. वरून कीर्तनाचा आव आणीत आतून तमाशाची मौज करणाऱ्या उज्ज्वल नेत्यांची थोर परंपरा या महाराष्ट्रास आहे. पाचपुते हे या अशा नेत्यांचे आजचे प्रतिनिधी. स्वत:स ते वारकरी म्हणवतात आणि वारीलाही नेमाने हजेरी लावत असतात. पांडुरंगाच्या भेटीची आस बाळगणाऱ्या या हभप पाचपुत्यांवर आपल्या मंत्रिपदाच्या काळात भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप आहेत. त्यांची भ्रष्ट अकार्यक्षमता इतक्या उच्च दर्जाची की राष्ट्रवादीसारख्या भ्रष्टाचाराच्या आरोपांचे वावडे नसलेल्या पक्षालादेखील त्याची नोंद घ्यावी लागली आणि त्यांना मंत्रिमंडळातून वगळावे लागले. या अशा पाचपुत्यांना भाजपने आता आपले म्हटले आहे. तिसरे भास्करराव खतगावकर. हे दिवंगत  शंकरराव चव्हाणांचे जावई आणि ‘आदर्श’कार अशोक चव्हाण यांचे मेव्हणे. नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक धुळीस मिळवायचे श्रेय नि:संशय त्यांचे. हा घोटाळा इतका गंभीर होता की मुख्यमंत्रिपदावर असलेल्या अशोक चव्हाण यांना त्या वेळी या बँकेच्या पुनर्वसनासाठी रिझव्‍‌र्ह बँकेने उभेदेखील केले नाही. या बँकेच्या कर्ज घोटाळ्यातून या भास्कराचे तेज दिसून आले. त्याच तेजाने दिपून भाजपने त्यांना जवळ केलेले दिसते. सूर्यकांता पाटील यादेखील नांदेड जिल्ह्य़ातल्याच. त्यांची अकार्यक्षमता तर केंद्रीय पातळीवर सिद्ध झालेली. त्या शरद पवार यांच्या निकटवर्तीय. परंतु त्यांच्या हिंगोली मतदारसंघात पवारांनी त्यांना कात्रजचा घाट दाखवला आणि तो मतदारसंघ काँग्रेसला दिला. त्या बदल्यात त्यांचे पुनर्वसन राज्य विधान परिषदेत केले जाणार होते. परंतु तेथेही राष्ट्रवादी अध्यक्षांनी त्यांना वाटाण्याच्याच अक्षता लावल्या. याचा अर्थ इतकाच की राष्ट्रवादीला त्यांची काहीही गरज आणि उपयुक्तता नाही. तशी ती जरा जरी असती तरी चाणाक्ष पवारांनी त्यांना दूर केले नसते. तेव्हा राजकीयदृष्टय़ा इतक्या निरुपयोगी पाटीलबाईंची कणव भाजपला आली आणि त्यांनाही पक्षाने आपले म्हटले. या अशा नवभाजपवाल्यांच्या यादीतील डॉ. किन्हाळकर हेदेखील मराठवाडय़ातल्या नांदेडचे. त्यांची पुण्याई इतकीच की माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचे ‘अशोकपर्व ’ हे पेड न्यूज प्रकरण त्यांनी धसास लावले. परंतु या भ्रष्टाचारविरोधी मोहिमेसाठी भाजपने त्यांना जवळ केले असे म्हणावे तर बाकीच्यांच्या प्रवेशाचे समर्थन भाजप कसा करणार?
तसा प्रयत्नदेखील भाजप करणार नाही. याचे कारण इतके दिवस नाक वर करून नैतिकतेचा आव आणणारा हा पक्षदेखील अन्यांच्याच मार्गाने निघालेला आहे. नरेंद्र मोदी हा आगामी निवडणुकांतील आपला हुकमी नेता आहे, असे हा पक्ष सांगतो. ते जर खरे असेल तर या भाकडांची गरज या पक्षास का भासावी? अन्य पक्षांत नाकाम ठरलेल्या अशा गणंगांच्या यादीतील विनायक मेटे यांना भाजपने लोकसभा निवडणुकीआधी आपल्यात सामील करून घेतले. त्यामुळे भाजपचे किती भले झाले? या भाकडभरतीमुळे भाजपच्या पदरात दोनपाच जागांपेक्षा काहीही अधिक पडणार नाही. तेव्हा मोदी यांच्या पुण्याईसमोर या दोनपाच जागांची मातबरी भाजपस का वाटावी? तशी ती वाटत असेल तर मोदी यांच्या पुण्याईचा भरवसा भाजपस राहिलेला नाही, असा निष्कर्ष काढला गेल्यास चूक ते काय? या पाचांतील कोणाहीवर कोणताही आरोप सिद्ध झालेला नाही, असा शहाजोग युक्तिवाद यावर भाजपचे एकनाथ खडसे आदी नेते करतील. हे खडसे स्वत:स नैतिकतेचा आदर्श मानतात. परंतु विरोधी पक्षांत राहूनही सत्ताधाऱ्यांच्या मदतीने आपले कंत्राटी हित कसे साधावे याची कला त्यांच्याइतकी कोणास अवगत नसेल. तेव्हा त्यांचा युक्तिवाद वादासाठी खरा मानायचा तर प्रश्न निर्माण होतो तो अजित पवार वा सुनील तटकरे यांच्याबद्दल. या दोन मंत्र्यांवर तर केवळ आरोपांच्या वावडय़ाच उठलेल्या आहेत. जसे डॉ. गावित यांच्यावर न्या. सावंत आयोगाने ताशेरे ओढलेले आहेत तसे काही अजित पवार वा तटकरे यांच्याबाबत झालेले नाही. तेव्हा भाजप त्यांच्याविरोधात कोणत्या तोंडाने भ्रष्टाचारविरोधाच्या गमजा मारणार?
इतिहास हे दाखवतो की ही खोगीरभरती अत्यंत तात्कालिक ठरते आणि सत्ताबदलाची वेळ आल्यास हे मान्यवर नव्या घरोब्याच्या शोधाला लागतात. तेव्हा या अशा भाकडभरतीतून काहीही साध्य होत नाही याचे भान भाजपने बाळगलेले बरे.