पाकिस्तानातील अतिरेकी, क्रूर प्रवृत्तींना ठेचून काढण्याच्या प्रयत्नांचा भाग असलेले ज्येष्ठ पोलीस अधिकारी चौधरी अस्लम यांच्यावरला दहावा प्राणघातक हल्ला मात्र खरोखरच जीवघेणा ठरला. ज्या कराची शहरावर अस्लम यांनी प्रेम केले, त्याच शहरात ‘तेहरीक-ए-तालिबान’च्या दहशतवादय़ांनी चौधरींना टिपले. काराकोरम महामार्गावरल्या डोडियाल या लहानशा गावात जन्मलेले, तिथेच प्राथमिक शिक्षण झालेले मोहम्मद अस्लम ‘चौधरी’ हे कळत्या वयात कराचीतच राहिले. इथेच ठाणे अंमलदार पदापासून सुरुवात करून, वरिष्ठ पोलीस अधीक्षकापर्यंतचा त्यांचा प्रवास झाला होता. पाकिस्तानी केंद्रीय अन्वेषण पथकात त्यांचा समावेश करून घेऊन, त्यांना सिंध प्रांताची जबाबदारी देण्यात आली होती.
‘तालिबान’ हा शब्द जेव्हा अतिरेकी गटांशी जोडला गेला नव्हता, तेव्हापासून हिंसक बंडखोरांशी लढण्याचा सराव चौधरींना मुहाजिर कौमी मूव्हमेंटपासून होता. असे म्हटले जाते की, या बेनझीर भुत्तोविरोधी ‘मूव्हमेंट’ला भारताचा पाठिंबा होता. चौधरी एक प्रकारे, बेनझीर यांच्या पथ्यावर पडणाऱ्या चकमकी मुहाजिरांशी करीत होते. पण पुढे अतिरेकी गटच जाळे पसरू लागल्यावर चौधरी अस्लम यांचा कस लागला. पोलीस अथवा कोणतीही सरकारी यंत्रणा शिरूच शकणार नाही, असा कब्जा कराचीतील लयारी भागावर गुंडांनी आणि दहशतवादय़ांनी वर्षांनुवर्षे जमवत आणला असताना, या भागात शिरण्याची हिंमत चौधरींनी दाखविली. चकमकींसाठी चौधरी यांच्या पथकाची ख्याती झाली, ती याच भागात. यापैकी २०१० सालच्या एप्रिलमधील एक चकमक तीन दिवस चालली होती आणि प्राणहानीचा आकडा होता २४. पाकिस्तानची आर्थिक राजधानी असलेल्या कराचीत खंडणीखोरी, अपहरण हे गुन्हे सर्रास घडत; त्यांची संख्या कमी झाली ती चौधरी अस्लम यांनी अशा चकमकींचे नेतृत्व सुरू केल्यानंतर. रेहमान डकैत या गुंड टोळीप्रमुखाला चौधरी अस्लम यांच्या पथकाने उडविले, त्यानंतर त्यांच्यावर तालिबानी म्हणवणाऱ्या गटांकडून थेट हल्ले सुरू झाले. एक हल्ला तर थेट त्यांच्या घराच्या व्हरांडय़ात सकाळीच स्फोटकांनिशी गाडी घुसवून झाला होता. परिसर त्यामुळे हादरला, पण चौधरी बचावले आणि ‘इथेच या तालिबान्यांना गाडेन’ अशी प्रतिज्ञा करते झाले. परंतु तसे होणार नव्हते. तूर्तास तरी त्या प्रवृत्तींविरुद्ध कडक कारवाई करू शकणारे एकही नाव पाकिस्तानात नाही.
कराचीतील गुन्हय़ांच्या कुठल्याही बातमीसोबत ‘चौधरी अस्लम आता गप्प का’, असा प्रश्न विचारण्याची पद्धतच माध्यमांमध्ये पडून गेली होती. स्फोटकहल्ल्याच्या आधी पाचदा बंदुकीच्या गोळय़ा त्यांच्यावर झाडल्या गेल्या, याचे विस्मरण पाकिस्तानींना अनेकदा होई. त्या हल्ल्यांची उजळणी अखेर, त्यांच्या जाण्याने झाली.