दीक्षित असे आडनाव असतानाही,  ‘मश्री’ म्हटले की दीक्षितच असणार अशी खात्री वाटावी, असे मश्रींचे व्यक्तिमत्त्व होते. साहित्य आणि इतिहास अशा दोन गोष्टींचा आयुष्यभर ध्यास घेतानाही, त्या क्षेत्रात पुस्तके लिहिल्यानेच भरीव कामगिरी करता येते, या गृहीतकाला मश्रींनी आपल्या कार्याने छेद दिला. पुस्तके तर त्यांनी लिहिलीच. पण त्याच्या जोडीला, या दोन्ही क्षेत्रात संस्थात्मक पातळीवर त्यांनी जे काम केले, त्याची नोंद इतिहासाने घेतलीच पाहिजे. साहित्याची आवड होती, म्हणून ते पुण्याच्या महाराष्ट्र साहित्य परिषदेत कार्यालय अधीक्षक म्हणून चोवीस वर्षे नोकरी करीत होते, की ती त्यांची गरज होती, कुणास ठाऊक. मश्रींनी या नोकरीचाही आपले आयुष्य उजळवण्यासाठी उपयोग करून घेतला. टुकीचा संसार करत साहित्यातून आणि इतिहासाची जुनाट कागदपत्रे वाचून मश्रींना जगण्याचे साधन मिळाले आणि तेच त्यांचे सुखनिधान झाले. पैशापेक्षा त्यापलीकडच्या दुनियेत हरवून जाण्याची अशी क्षमता साध्य करणाऱ्या विरळा व्यक्तींमध्ये म्हणूनच तर मश्रींची गणना करायला हवी. साहित्य परिषदेतली नोकरी संपल्यानंतर त्याच संस्थेत पदाधिकारी होण्याचा मान त्यांना मिळाला, याचे कारण त्यांचे कार्यकुशलत्व होते. कार्यवाह, कोषाध्यक्ष, कार्यकारी विश्वस्त अशी पदे ही त्यांच्यासाठी काम करण्याची यंत्रे होती. आपण एका साहित्यिक संस्थेचे पदाधिकारी आहोत, याचा मान मिरवणाऱ्या आताच्या पिढीतील लोकांना मश्री समजले असते, तर संस्था हेच आपले जीवन असते म्हणजे काय, याचा अर्थही कळला असता.
 कार्यकर्ता असणे हेच मश्रींचे जीवनध्येय राहिले. त्यामुळे पुण्यातील संस्थात्मक जीवनात ते अपरिहार्य होऊ शकले. वसंत व्याख्यानमाला असो की नगरवाचन मंदिर असो. पुण्यातील डझनभर संस्था मश्रींच्या जिवावर त्यांचे कार्य करीत राहिल्या. मश्रींनी मात्र नेहमीच पडद्यामागे राहणे पसंत केले. साहित्य महामंडळ असो की ऐतिसासिक वास्तू स्मृती समिती असो. मश्री तिथे मनापासून रमायचे. थोरल्या बाजीरावांचा पुतळा उभा राहावा, यासाठी ज्या अनेकांनी कष्ट घेतले, त्यात मश्रींचाही वाटा होता. शनिवारवाडय़ाचा इतिहास आणि कोकणस्थांविषयीचा अभ्यासपूर्ण ग्रंथ यासारखी तीसेक पुस्तके त्यांच्या नावावर जमा आहेत. साहित्यिक म्हणून उपाधी लावण्यासाठी अलीकडे एवढी ग्रंथसंपदाही लागत नाही. पण मश्रींनी लेखकाच्या भूमिकेपेक्षा कार्यकर्त्यांच्या भूमिकेलाच अधिक प्राधान्य दिले. अडचणीच्या वेळी निरलसपणे सल्ला देणाऱ्या मश्रींचा राज्यातील सगळ्या साहित्य संस्थांशी जवळचा संबंध आला आणि तो अखेपर्यंत टिकला. मश्री हेच त्यामुळे एक संस्था झाले. पुण्याचा चालताबोलता इतिहास असणाऱ्या म. श्री. दीक्षित यांच्या निधनाने एक मोलाचा माणूस काळाच्या पडद्याआड गेला आहे.