राजीव एवढेच त्यांचे नाव. भारतीय पोलीस सेवेत १९७५ सालच्या बॅचमध्ये ते दाखल झाले, तेव्हापासून त्यांच्या आडनावाचा किंवा अगदी आद्याक्षरांचाही उल्लेख त्यांनी आवर्जून टाळला आहे. त्रिसदस्य केंद्रीय दक्षता आयोगामध्ये, भारताचे दक्षता आयुक्त प्रदीप कुमार आणि सदस्य जे. एम. गर्ग यांच्याखेरीज तिसऱ्या पदावर त्यांची नियुक्ती गुरुवारी झाली तीही ‘राजीव’ एवढय़ाच नावाने. राजीव यांची मोठी कारकीर्द आणि विशेषत: पोलीस गुप्तचर दल तसेच निमलष्करी दलांतील त्यांचा दीर्घ अनुभव, यांचे पाठबळ त्यांना नव्या जबाबदारीसाठी उपयोगी पडणार आहे.
भारतीय पोलीस सेवेत उत्तर प्रदेश केडरमधील अधिकारी म्हणून कारकिर्दीची सुरुवात केल्यावर १९८३ साली ते पोलीस अधीक्षक या पदावर आले आणि हमीरपूर, बदायूँ, उन्नौ या जिल्हय़ांत त्यांनी काम केले. सुमारे वर्षभराचा काळ (१९८९- ९०) पोलीस गुप्तचर सेवेतील अधीक्षक पदावर काम केल्यानंतर त्यांची बढती देहरादूनचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक या पदावर झाली, पण तेथूनही वर्षभरात पोलीस उपमहानिरीक्षक या पदावर बढती मिळाल्याने मोरादाबाद, झाशी, वाराणसी अशा संवेदनशील जिल्ह्यांत त्यांनी काम केले. १९९७ पासूनचा काळ त्यांनी पुन्हा पोलीस गुप्तचर सेवेत घालविला; परंतु महानिरीक्षक या पदावर बढती मिळाल्यावर गोरखपूर, बरेली येथे राजीव आले. याही पदावर असताना पोलीस गुप्तचर खात्यात काही महिने ते होतेच. राजीव यांच्या कारकिर्दीला धुमारे फुटले ते गेल्या सात वर्षांत. २००७ साली राष्ट्रपतींचे पोलीस पदक त्यांना मिळाले. भारतीय अन्न महामंडळात प्रमुख दक्षता अधिकारी हे पद त्यांनी प्रतिनियुक्तीवर स्वीकारले होते. ‘सशस्त्र सीमा बल’ या निमलष्करी दलाचे महासंचालक म्हणून २०१०मध्ये त्यांची नियुक्ती झाली, तर त्याच वर्षीच्या मे महिन्यात राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाच्या प्रमुखपदी त्यांची नियुक्ती झाली. नागरी संरक्षण दलाचा कार्यभारही त्यांच्याचकडे आला. याच पदांवरून, २०११ साली त्सुनामीग्रस्त झालेल्या जपानच्या एका जिल्हय़ात भारतीय आपत्तीनिवारण पथक पाठवण्यासाठी त्यांनी जवानांची निवड केली आणि त्या कार्याचे कौतुकही झाले. सेवाकाळातील त्यांची अखेरची नियुक्ती २०१२ मध्ये, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या महासंचालकपदी जानेवारी २०१२ मध्ये झाली आणि याच पदावरून गेल्या ऑक्टोबरात ते निवृत्त झाले.  राजीव यांचा हा अनुभव पुरेसा वैविध्यपूर्ण आहे आणि दक्षता/गुप्तचर स्वरूपाचे कार्य त्यांनी वेळोवेळी केलेले आहे. यामुळेच नव्या कामात ते छाप पाडतील, अशी अपेक्षा आहे.