‘व्यवस्थापकांवर विश्वास ठेवण्याचे दिवस कधीच संपले. अनेक व्यवसाय आज व्यवस्थापनशास्त्राचा वापर करतात, पण सामाजिक विश्वासार्हतेची एकंदरीत खालावलेली पातळी सुधारत नाही. अशा वेळी व्यावसायिकांनी हे ओळखले पाहिजे, आपले उत्तरदायित्व केवळ भागधारकांपुरते मर्यादित नसून समाजाला, नागरिक म्हणून आणि व्यक्ती म्हणून आपण जबाबदार आहोत,’अशी स्पष्ट मते ‘हार्वर्ड बिझनेस रिव्ह्यू’च्या अंकांतून मांडणारे किंवा ‘व्यवस्थापनशास्त्राच्या शिक्षणात आज साचलेपण आले आहे, त्याचे प्रमुख कारण म्हणजे हे शिक्षण आपण कशासाठी देत आणि घेत आहोत याचा विचार मागे पडला’ असे भाषणात सांगणारे राकेश खुराणा! त्यांची निवड आता ‘हार्वर्ड कॉलेज’च्या अधिष्ठातापदावर झाली आहे.
 व्यवस्थापनाबद्दल ‘बाहेरून’ टीका करणे सोपेच असल्याचा अनुभव अनेकांना असेल, पण खुराणा केवळ टीका करीत नाहीत.. एखाद्या कुशल डॉक्टरप्रमाणे ते दुखण्याचे निदान करताहेत आणि उपाययोजनांचा विचार त्यांनी केलेला आहे. हार्वर्ड विद्यापीठाच्या ‘फॅकल्टी ऑफ आर्ट्स अ‍ॅण्ड सायन्सेस’मधील समाजशास्त्राचे प्राध्यापक या नात्याने त्यांनी विद्यार्थ्यांसाठी मद्यपानविषयक नियम बनवण्याची जबाबदारी स्वीकारली होती! पुढे, या नियमांची अंमलबजावणी करणाऱ्या समितीतही त्यांचा सहभाग आहे. समाजशास्त्र हा मूळ अभ्यासविषय असला तरी, व्यवस्थापनात त्यांनी आंतरशाखीय डॉक्टरेट १९९८ मध्ये मिळवली. त्यानंतर काही काळ समाजशास्त्र विषयाचे, तर आता माविन बोवर अध्यासनात नेतृत्व विकास या विषयाचे प्राध्यापक म्हणून त्यांना हार्वर्डमध्येच नियुक्ती मिळाली.
‘सर्चिग फॉर अ सेव्हियर : द इर्रॅशनल क्वेस्ट फॉर कॅरिस्मॅटिक सीईओज्’ हे खुराणा यांचे पुस्तक २००२ सालचे. प्रमुख व्यवस्थापकांच्या व्यक्तित्त्वातील ज्या गुणांचा उदो उदो केला जातो, ते कामाचे नाहीत हे ठणकावून सांगण्याचे काम खुराणांनी केले आणि बडय़ा बॉसलोकांच्या ‘मर्दानी प्रतिमे’ला सुरुंग लावण्याची धमकही या पुस्तकाने दाखविली. त्यांचे दुसरे पुस्तक त्याहूनही अधिक मूर्तिभंजक होते.. ‘फ्रॉम हायर एम्स टु हायर्ड हॅण्ड्स’ या पुस्तकातून त्यांनी, मॅनेजमेंट अर्थात व्यवस्थापन हा ‘पेशा’ म्हणून अद्यापही (होय! अमेरिकेत..) कसा पाहिला जात नाही आणि या पेशातली माणसे व्यवसायनिष्ठ का नाहीत, याचे मूल्यमापन केले. असा मूळ ढवळणारा विचार केल्याबद्दल असेल, त्यांना अमेरिकी अध्यापन क्षेत्रात महत्त्वाचा मानला जाणारा चार्ल्स एम. विल्यम्स पुरस्कार दोनदा  मिळाला आहे.  असा माणूस ‘मूळ भारतीय वंशाचा’ आहे, एवढय़ावरच आपला त्यांच्याबद्दलचा अभिमान मर्यादित ठेवणे, हा त्यांचा पराभव ठरेल.