कोणत्याही राष्ट्राचे पंतप्रधान म्हटले आणि त्यातही ते जर भारतीय उपखंडातील एखाद्या राष्ट्राचे असतील तर त्यांच्या ‘उच्च’ राहणीमानाबद्दल आपल्या मनात एक प्रतिमा असते. पण या प्रतिमेला छेद देणारे व्यक्तिमत्त्व शेजारील नेपाळच्या पंतप्रधानपदी विराजमान होत आहे. सुशील कोईराला, हे त्यांच्या साध्या राहणीमानासाठी आणि राष्ट्रीय दृष्टिकोनासाठी ओळखले जातात. ते अविवाहित असून काठमांडू येथे एका भाडय़ाच्या घरात राहतात. सुशील कोईराला हे, ज्या कोईराला घराण्याने नेपाळला तीन पंतप्रधान दिले त्याच घराण्यातील. १९५४ पासूनच ते ‘नेपाळी काँग्रेस’च्या माध्यमातून राजकारणात सक्रिय होते. त्यामुळे, राजकारणाचा ५० वर्षांचा अनुभवही गाठीशी असलेले आणि संकटकाळी १६ वर्षे भारतात ‘राजकीय आश्रया’द्वारे राहिलेले असे हे व्यक्तिमत्त्व!
१९३९ मध्ये जन्मलेल्या सुशील यांचे मानव्य शाखेतील पदवी शिक्षण वाराणसी येथे झाले. त्यानंतर ते गिरिजा प्रसाद कोईराला यांच्या संपर्कात आले आणि त्यांच्या आयुष्याला कलाटणी मिळाली. समाजवादाचा आणि लोकशाहीचा पगडा, त्यातून तत्कालीन नेपाळ नरेशांच्या एकाधिकारशाहीविरोधात केलेले बंड याची परिणती म्हणून वयाच्या ऐन तिशीतच आपल्या कुटुंबासह राहता देश सोडून भारतात राजाश्रय घेण्याची वेळ त्यांच्यावर आली. पण भारतात आल्यानंतरही ‘नेपाळमध्ये लोकशाही समाजवाद रुजविण्याचे’ त्यांचे स्वप्न अभंगच राहिले. याच दरम्यान गिरिजा प्रसाद कोईराला यांनी नेपाळी बँकेत शेकडो डॉलर घेऊन जाणाऱ्या विमान अपहरणाची योजना आखली. काठमांडूकडे जाणाऱ्या विमानास जबरदस्तीने ईशान्य भारतीय विमानतळावर उतरविण्यात आले आणि तेथे दबा धरून बसलेल्या सुशील कोईराला व त्यांच्या सहकाऱ्यांनी रक्कम पळवली. भारत सरकारने या अपहरण प्रकरणातील सर्वाना अटक केली. त्यात सुशील यांना तीन वर्षे कारावासाची शिक्षा झाली होती.
तर असे हे सुशील बंडखोर व्यक्तिमत्त्वाचे असले तरीही प्रखर राष्ट्रवादी तसेच निष्कलंक प्रतिमेचे म्हणून परिचित आहेत. नेपाळवर आर्थिक संकट उद्भवले असताना आणि रोजगारासाठी देशातून हजारो नेपाळी स्थलांतरित होत असताना ‘राष्ट्रीय ऐक्याचे’ आणि ‘राष्ट्रउभारणी’चे प्रयत्न करण्याचे श्रेय सुशील कोईराला यांच्याकडे जाते. अवघे पाऊणशे वयोमान असलेल्या या पंतप्रधानांनी आपली निवड होताच, ‘येत्या वर्षभरात नेपाळच्या संविधाननिर्मितीचे काम एकमताने पूर्ण करण्यासाठी कटिबद्ध असल्याचे’ जाहीर केले आहे. ऐन उमेदीत ‘तरुण’ या पक्षाच्या मुखपत्राचे संपादक असलेल्या, एका साध्या पक्ष कार्यकर्त्यांपासून ते सरचिटणीस, काळजीवाहू अध्यक्ष आणि अखेर पक्षाध्यक्ष अशी मजल मारणारा हा सरळमार्गी, नि:स्पृह राजकारणी. नेपाळमधील २४ राजकीय पक्षांची मोट बांधण्याचे आणि त्यांचे संविधाननिर्मितीत एकमत घडवून आणण्याचे आव्हान त्यांच्यासमोर आहे.