विधिमंडळाचे नागपूर येथील हिवाळी अधिवेशन, त्यात बंदोबस्तासाठी असलेले ७००-८०० पोलीस आणि त्यांच्यामध्ये केवळ एकटी महिला. हे अधिवेशन महिना-दीड महिना चालले. या सर्व काळात या एकटय़ा बाईला मनोधैर्य दाखवून परिस्थिती हाताळावी लागली.. १९६०च्या दशकातील हा अनुभव आहे, राज्यातील पहिल्या महिला फौजदार कुसुम देव यांचा! अजूनही पुरुषांचेच प्राबल्य असलेल्या पोलीस दलात त्यांनी सेवा केली. पहिलेपणाची अनेक आव्हाने असतात. ती पार करत त्यांनी तब्बल ३३ वर्षे पोलीस सेवेत नोकरी केली. कुसुम देव यांचे वयाच्या ८७ व्या वर्षी नुकतेच पुण्यात निधन झाले. त्या पोलीसदलात आल्या भारताच्या स्वातंत्र्यानंतर लगेच, म्हणजे १९४९ साली. त्या वेळी या सेवेत टिकून राहण्यासाठी संघर्ष करावा लागला. पोलीस सेवा करत असताना बालगुन्हेगारांशी आलेला संपर्क, कारवाईच्या वेळी पाहिलेले वेश्यावस्तीतील वातावरण, सचोटीने वागत असल्याने काही सहकारी व वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून झालेला मानसिक त्रास, त्यांची बदनामी करण्याचे झालेले प्रयत्न.. असे अनुभव घेत त्या पुढे जात राहिल्या. त्यांचे सासरे व पतीसुद्धा पोलीस सेवेत होते. त्यामुळे आधार होता, तरीसुद्धा त्या त्या वेळी कुसुम देव यांनाच वेगवेगळ्या प्रसंगांना तोंड द्यावे लागत होते. संसाराच्या जबाबदाऱ्या पेलत असतानाच दुसरीकडे पोलीस अधिकारी म्हणून कर्तव्य बजावताना त्यांना कसरत करावी लागत होती. ही सेवा करताना विविध लोक भेटले. त्यातून खूप शिकायलाही मिळाले. त्याचबरोबर धडाडी व चिकाटीही दाखवावी लागली. सरळमार्गी असल्याने काही वरिष्ठांच्या नाराजी व त्यामुळे नोकरीची गमावण्याची टांगती तलवार होतीच. देव यांनी आपल्या पहिलेपणाच्या पोलिसी अनुभवांचे कथन करणारे ‘डय़ुटी फर्स्ट’ हे पुस्तकही लिहिले आहे. आताच्या काळात महिला पोलीस, महिला फौजदार किंवा महिला उपअधीक्षक म्हणून सेवेत प्रवेश करताना विशेष काही वाटत नाही, पण स्वातंत्र्यानंतरच्या पहिल्या काही वर्षांत ही स्थिती फारच वेगळी होती. त्या काळी महिलांनी घराबाहेर पडणे रुजलेले नव्हते, तेव्हा त्या पोलीस सेवेत दाखल झाल्या. त्यांनी त्या काळी दाखवलेल्या धाडसामुळेच पुढच्या काळात महिलांना या मार्गावर वाटचाल करणे काहीसे सोपे बनवण्याची प्रक्रिया सुरू झाली! यादृष्टीने त्यांची कारकीर्द महत्त्वाची आहे.