चंद्रकांत खोत हे कवी-कादंबरीकार-संपादक तर होतेच, पण त्यांची खरी ओळख ‘आशिक मस्त फकीर’ अशीच आहे. त्याचे कारण त्यांची जगण्यावरची आशिकी. ती शेवटपर्यंत कमी झाली नाही, त्यापायी त्यांनी फकिरीचीही फिकीर केली नाही. लघुअनियतकालिकांच्या चळवळीतले एक शिलेदार, ‘अबकडई’ या प्रयोगशील दिवाळी अंकाचे संपादक आणि आध्यात्मिक चरित्र कादंबऱ्या लिहिणारे लेखक असे त्यांच्या आयुष्याचे तीन टप्पे दाखवता येतीलही, पण या तिन्हींचा कोलाज त्यांच्यामध्ये कायमच वस्ती करून होता. इतके त्यांचे व्यक्तिमत्त्व गुंतागुंतीचे होते. त्यांच्या ‘उभयान्वयी अव्यय’, ‘बिनधास्त’, ‘विषयांतर’ या बोल्ड कादंबऱ्यांनी सत्तरच्या दशकात खळबळ उडवून दिली. त्यातील लैंगिकतेच्या उल्लेखांमुळे त्यांवर टीकाही झाली. लैंगिकतेचे उघडेनागडे दर्शन घडवण्याच्या बाबतीत त्यांचे भाऊ पाध्ये यांच्याशी नाते जुळते. समाजमान्य संकेत धाब्यावर बसवत त्यांनी तथाकथित संस्कृतिरक्षकांना अंगावर घेत आव्हान दिले होते. ‘अबकडई’ या दिवाळी अंकाचे संपादकही खोतांची ओळख अधिक सघन आणि समृद्ध म्हणावी अशी आहे. दिवाळी अंकांच्या रूढ चौकटींना फाटा देत त्यांनी १९७३ ते ९४ या काळात डायरी, आत्मकथा, मुलाखती या विशेषांकांसह तर्कातीत अनुभव, चमत्कार, पुनर्जन्म, श्रद्धा-अंधश्रद्धा, देव-धर्म अशा वेगवेगळ्या विषयांवर २१ दिवाळी अंक काढले. दुर्गा भागवत, विश्वास पाटील (‘नवी क्षितिजे’कार), डॉ. श्रीराम लागू अशा अनेक मान्यवरांना या अंकांतून लिहिते केले, तर श्री. ना. पेंडसे यांच्यासारख्या काही मान्यवरांचे खास लिहून घेतलेले लेख आवडले नाहीत म्हणून त्यांना मानधन देऊन ते न छापण्याचे मराठीला अनोळखी असलेले धाडसही दाखवले. या अंकासाठी खोत वर्षभर मेहनत घेत. त्यामुळे हे अंक दिवाळी अंकांच्या भाऊगर्दीत आपल्या लखलखीत वेगळेपणाने उठून दिसत. यानंतरच्या टप्प्यावर खोत आध्यात्मिक लेखनाकडे वळले. ‘दोन डोळे शेजारी’, ‘अनाथांचा नाथ’, ‘गण गण गणात बोते’, ‘संन्याशाची सावली’ यांसारख्या चरित्र कादंबऱ्या त्यांनी लिहिल्या. त्याआधी त्यांच्याच म्हणण्यानुसार पद्मा चव्हाण नावाचे कांड घडले. ते त्यांच्या आयुष्यातील एक जीवघेणे वळणच. नंतर ते अज्ञातवासातच गेले. काही दिवसांनी ते भगव्या वेशात आर्थर रोडशेजारच्या एका मंदिरात सापडले. त्या अवस्थेतून त्यांना अलीकडच्या काळात लौकिकावस्थेत आणण्याचे प्रयत्नही झाले. नुकतेच त्यांच्या तिन्ही कादंबऱ्यांचे पुनर्मुद्रण झाले. त्यांना एक-दोन पुरस्कार मिळाले. त्यांची पंचाहत्तरीसुद्धा साजरी झाली. त्यांच्यावरच्या पीएच.डी.चे पुस्तकही प्रकाशित झाले. थोडक्यात, खोतांचे लेखन आणि आयुष्य दोन्हीही वादळी राहिले. एका टोकाकडून दुसऱ्या टोकाकडे- म्हणजे डाव्या विचारसरणीकडून उजव्या विचारसरणीकडे- झालेला प्रवास, लैंगिकतेविषयाच्या भावनांचे उघडउघड समर्थन करणारा कवी-कादंबरीकार आणि सत्तरच्या दशकातील मुंबईतल्या चाळजीवनाचे प्रत्ययकारी दर्शन घडवणारा लेखक व्हाया आध्यात्मिक कादंबऱ्या, संन्यासी वृत्ती ते पुन्हा लेखक म्हणून उभे राहू पाहण्याची धडपड, ही खोतांच्या आयुष्याची उलथापालथ बुचकळ्यात टाकणारी आहे. सात्त्विक प्रवृत्तीच्या माणसांविषयी जसे भारतीय- विशेषत: महाराष्ट्रीय लोकांना आकर्षण असते तसेच काहीसे तामसी प्रवृत्तीच्या लोकांबद्दलही असते. खोतांचा प्रवास तर सात्त्विक- तामसी- सात्त्विक असा झाला. त्यामुळे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाभोवती बरेच गूढ आणि अनाकलनीय प्रश्नांचे जाळे आहे. माणूस आणि लेखक म्हणून खोत आव्हानात्मक आहेत. अशा व्यक्तिमत्त्वांचा धांडोळा घेत त्यांची उकल करून दाखवण्याचे धाडस कुणी तरी दाखवायला हवे. तसे झाले तर खोत यांचा थांग लागू शकेल.