हिंदी चित्रपटांतील विनोदनिर्मितीची जबाबदारी नायकावर येऊन पडण्याच्या आधीच्या काळातील एक मातब्बर नाव म्हणजे देवेन वर्मा. त्यांचे घराणे मध्यमवर्गीय. अचकटविचकटपणा, अंगविक्षेप अशा कॉमेडी सर्कसपासून खूपच दूर असलेले. स्वातंत्र्योत्तर कालखंडात सत्तरच्या दशकापर्यंत मातीमोल झालेल्या सामाजिक भाबडेपणाचे मूर्तरूप असा त्यांचा विनोद होता. त्यामुळेच बहुधा त्यांच्या विनोदाचा वारसदार म्हणून कोणीही पुढे येऊ शकले नाही. हा माणूस तसा मुळचा रंगभूमीवरचा. पुढे १९६१ साली प्रसिद्ध निर्माता-दिग्दर्शक बी. आर. चोप्रा यांनी देवेन वर्मा यांना पहिला चित्रपट दिला होता. तो म्हणजे ‘धर्मपुत्र’. त्यातील त्यांची भूमिका गंभीरपणाकडे झुकणारी होती. भारत-पाकिस्तान फाळणीची पाळंमुळं तोवर ‘माणूस’कीनेच वावरणाऱ्या नातेसंबंधांमध्ये कशी विषासारखी पसरत गेली याचे चित्रण असलेल्या गंभीर चित्रपटात देवेन वर्मा यांनी पहिली भूमिका केली. मात्र, त्यानंतर अगदी शेवटच्या चित्रपटांपर्यंत ते कधीच गंभीर भूमिकांसाठी ओळखले गेले नाहीत. ह्रषिकेश मुखर्जी, बासू चॅटर्जी आणि गुलजार यांच्या नर्मविनोदी, कौटुंबिक आणि हलके फुलके विषय असलेल्या चित्रपटात अगदी साध्या साध्या भूमिकांमध्ये ते रमले आणि त्या भूमिका हेच त्यांचे बलस्थान बनले. दिग्गज अभिनेते अशोक कुमार यांचा ‘गुमराह’ हा त्यांचा पहिला विनोदी चित्रपट. त्यानंतर चार दशके  हिंदी चित्रपटांमधून त्यांनी सहज विनोदी अभिनयाने आपला एक स्वतंत्र ठसा निर्माण केला होता. ‘चोरी मेरा काम’, ‘चोर के घर चोर’ आणि ‘अंगूर’ या तीन चित्रपटांसाठी त्यांना सवरेत्कृष्ट विनोदी अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला होता. देवेन वर्मा यांनी कधीच तत्त्वांमध्ये तडजोड केली नाही. विनोदी भूमिकेसाठी का होईना कधीही शारिरीक आणि मानसिकरित्या येणाऱ्या अपंगत्वाची टर उडवणार नाही, असा ठाम निर्णय त्यांनी घेतला होता व त्याबद्दल इंडस्ट्रीत आदर होता. त्यांच्या सहजअभिनयाला आणि विनोदाला जशी तोड नव्हती तशी त्यांच्या या निखालस साध्या स्वभावालाही तोड नव्हती. स्वभावातला साधेपणा त्यांच्या भूमिकांमध्येही उतरत असे.
 उपहासात्मक किंवा परस्परविरोधी परिस्थितीतून निर्माण झालेला विनोद रंगविणे ही त्यांची खासीयत होती. हा विरोधाभास त्यांच्या आयुष्यातही पाहायला मिळाला. विनोदी भूमिकांत गाजलेला हा अभिनेता चक्क राज्यशास्त्र (२२९ आणि समाजशास्त्र(२२९ या दोन विषयांचा पदवीधारक होता. बहुधा त्या अभ्यासातूनच त्यांच्या विनोदाला धार आली असावी. मंगळवारी त्यांचे निधन झाल्यानंतर त्यांच्यासारखा विनोदवीर आणि विनोदही किती दुर्मीळ आहे याची जाणीव चित्रपटरसिकांना नक्कीच झाली असावी.