एके काळी जेव्हा संगणक नव्हता, तेव्हा आनंदजी डोसा होते. क्रिकेटची सांख्यिकी आणि गुणलेखनाला आता संगणकाचे पाठबळ मिळाले आहे. परंतु या विकासपर्वात महत्त्वाचा वाटा उचलणारा आधारवड सोमवारी हरपल्याने क्रिकेटचे अपरिमित नुकसान झाले आहे. क्रिकेटपटू, प्रशासक, पंच, गुणलेखक, संख्याशास्त्रज्ञ आणि लेखक असे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे अनेक पैलू होते. आपल्या ९८ वर्षांच्या आयुष्यात त्यांनी क्रिकेटची अनेक मार्गाने सेवा केली. शालेय आणि महाविद्यालयीन पातळीवर क्रिकेट खेळल्यानंतर रणजी क्रिकेटसाठी मुंबई आणि बॉम्बे पेंटॅग्युलर क्रिकेटसाठी हिंदू जिमखान्यासाठी ते राखीव खेळाडू होते. सलामीवीर फलंदाजी, मध्यमगती गोलंदाजी, यष्टिरक्षण ही त्यांच्या खेळातील वैशिष्टय़े.
कालांतराने त्यांनी गुणलेखन व सांख्यिकीकडे आपले लक्ष वळवले आणि या क्षेत्राला अधिष्ठान प्राप्त करून दिले. सुमारे तीन दशके त्यांनी आकाशवाणीकरिता गुणलेखन केले. सर्व महत्त्वाच्या क्रिकेट सामन्यांना विजय र्मचट आणि डोसा यांच्या जोडीचे समालोचन मुग्ध करायचे. १९७३मध्ये भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने सांख्यिकी समितीची स्थापना करून त्याचे अध्यक्षस्थान डोसा यांच्याकडे दिले. मग १९८०मध्ये बीसीसीआयने भारतीय क्रिकेट सांख्यिकी आणि गुणलेखन संघटना स्थापन केली. त्याचेही ते बरीच वष्रे अध्यक्ष होते. भारतीय क्रिकेट गुणलेखन आणि सांख्यिकी क्षेत्र विकसित होत असताना बीसीसीआयनेही डोसा यांच्या कार्याची दखल घेत त्यांच्या नावाने आनंदजी डोसा सर्वोत्तम गुणलेखक पुरस्कार सुरू केला. परंतु काही वष्रे हा उपक्रम राबवल्यानंतर तो बंद पडला. हिंदू जिमखाना, जॉली स्पोर्ट्स क्लब यांसारख्या अनेक क्लबच्या प्रशासनाचा अनुभव असलेल्या डोसा यांनी मुंबई क्रिकेट असोसिएशनचे कार्यकारिणी सदस्यपदही सांभाळले होते. अनेक पुस्तकांचे लेखनसुद्धा त्यांनी केले आहे. ‘दुलीप – द मॅन अ‍ॅन्ड हिज गेम’ (सहलेखक वसंत रायजी), ‘क्रिकेट टाइज : इंडिया-पाकिस्तान अ‍ॅन्ड आर्ट ऑफ स्कोरिंग’ ही त्यांची पुस्तके प्रकाशित झाली. क्रिकेटविषयक अनेक पुस्तकांचा संग्रह त्यांच्याकडे होता. हा सारा संग्रह त्यांनी मुंबईच्या जुन्या क्रिकेट क्लब ऑफ इंडियाला (सीसीआय) समर्पित केला. डोसा यांच्या दोन मुली. एक व्यवसायाने डॉक्टर, तर एक वास्तुरचनाकार. दोघीही विवाहानंतर अमेरिकेत स्थायिक झाल्या होत्या. त्यामुळे वर्षभरापूर्वी डोसा यांनी पत्नीसमवेत अमेरिकेत स्थलांतर केले. आकडय़ांच्या दुनियेच्या या राजाला वयाच्या शतकाची खात्री होती. डोसा यांच्या ९६व्या वाढदिवसाला एका मित्राच्या ‘पुन्हा केव्हा भेटणार?’ या प्रश्नाला ‘चार वर्षांनी’असे उत्तर त्यांनी दिले होते. परंतु तसे घडले नाही. आता त्यांच्या कार्याच्या रूपाने ते  नव्या पिढीतील असंख्य क्रिकेट गुणलेखक आणि सांख्यिकीतज्ज्ञांना प्रेरणा देत राहतील.

A chance for historic success for Indian chess players sport news
भारतीय बुद्धिबळपटूंना ऐतिहासिक यशाची संधी!
Tom Latham believes that Test cricket is the most important sport news
कसोटी क्रिकेटच सर्वांत महत्त्वाचे टॉम लॅथम
9 year old deadlifting 75 kg viral video
भारतातील सर्वांत शक्तिशाली चिमुरडी! पाहा नऊ वर्षीय ‘धाकड’ मुलीचे शक्तिप्रदर्शन; Video पाहून व्हाल थक्क…
Loksatta Lokrang A Journey into Documentary Creation movies dramatist
 आम्ही डॉक्युमेण्ट्रीवाले: ‘मला खूप भूक लागली होती…’