ज्येष्ठ पत्रकार एम. व्ही. कामत जेव्हा पत्रकारिता करत होते, तेव्हा आजच्यासारखी इलेक्ट्रॉनिक माध्यमे अस्तित्वात नव्हती, फेसबुक नव्हते की व्हॉट्सअ‍ॅप नव्हते. इंग्रजी पत्रकारांना टाइपरायटरवर मजकूर टाइप करावा लागे आणि भाषक पत्रकारांना कागदावर लिहावा लागे. अशा काळात एम. व्ही. कामत दररोज काही तरी लिहीत होते. समाजातील वास्तव आणि त्यावरील आपली टिप्पणी करण्यासाठी त्यांच्याकडे शब्दांचेच शस्त्र होते.  एखादी बातमी गाजली, म्हणजे आपण मोठे पत्रकार होत नाही, कारण त्यासाठी सतत त्याच दर्जाचे काम करण्याची क्षमता स्वत:मध्ये निर्माण करण्यासाठी कष्ट करत राहणे अधिक आवश्यक आहे, असे त्यांना वाटे. प्रारंभीच्या काळात जेव्हा ‘फ्री प्रेस जर्नल’ या दैनिकात ते काम करू लागले, तेव्हापासून अनेक मोठय़ा दैनिकांमध्ये वरिष्ठ पदांवर काम करत असताना आणि ‘इलस्ट्रेटेड वीकली’सारख्या नियतकालिकाचे संपादक असताना त्यांनी लेखनाबरोबरच चिंतनही केले. पत्रकारिता म्हणजे केवळ माहितीची देवाणघेवाण नसते, तर त्यामागे चिंतनाची एक व्यापक बैठक आवश्यक असते, हे त्यांच्या लेखनातून त्या काळातील वाचकांना सहज समजत असे. चिंतन करण्याच्या या सवयीला निवृत्तीचे बंधन नसतेच. त्यामुळे ‘इंडियन एक्स्प्रेस’सारख्या राष्ट्रीय दैनिकातील त्यांचे स्तंभलेखन सर्वच स्तरांत अतिशय गांभीर्याने वाचले जाई. समाजवास्तवाला सामोरे जात असताना, ते बदलण्याची क्षमता आपल्यामध्ये असते, हा भ्रम पत्रकारांनी दूर करणे अतिशय आवश्यक असते, असे त्यांना वाटत असे. समाजधुरीणांचे काम पत्रकाराने करता कामा नये, हे त्यांचे मत त्यांच्या लेखनातूनही अनेकदा प्रतीत होत असे. स्वत:ला सतत परजत राहण्याची क्षमता सिद्ध केल्यानंतरही कामत यांचे विविध विषयांमधील स्वारस्य कमी झाले नव्हते. भारतीय नावांबद्दलचा त्यांचा अभ्यास जसा त्यांनी पुस्तकरूपाने प्रसिद्ध केला, तसेच ‘द अदर फेस ऑफ इंडिया’, ‘गांधी- ए स्पिरिच्युअल जर्नी’ यांसारखी पुस्तकेही त्यांनी लिहिली. अलीकडे त्यांनी नरेंद्र मोदी यांच्यावर लिहिलेल्या दोन पुस्तकांमुळे ते पुन्हा एकदा चर्चेत आले. पत्रकाराने माहितीच्या पुढे जायला हवे आणि त्यासाठी ज्ञान संपादन करण्याच्या प्रक्रियेत स्वत:ला गुंतवून घ्यायला हवे, हे त्यांच्या आयुष्याचेच ब्रीद होते. कामत यांचे लेखन या सगळ्याची ग्वाही देणारे होते. स्वत:चे विचार ठामपणे मांडताना, त्याला वैचारिक बैठक देण्याचे सामथ्र्य त्यांच्याकडे असल्यानेच हे घडू शकले. फारसे वेतन न मिळणाऱ्या त्या काळातील पत्रकारितेत टिकून राहून, स्वत:ची नाममुद्रा उमटविणाऱ्या ज्येष्ठ पत्रकारांच्या यादीत एम. व्ही. कामत यांचे नाव घेतले जाते, याचे कारण त्यांची पत्रकारितेवरील कमालीची निष्ठा हेच होते. आजची पत्रकारिता पूर्वीसारखी राहिली नाही, असे गळाकाढू वक्तव्य करण्यापेक्षा नव्या काळाची, नवी आव्हाने पेलणारे युवापत्रकार घडवण्यासाठी त्यांनी आपल्या अनुभवाचे गाठोडे उलगडण्याचे ठरवले आणि मणिपाल विद्यापीठातील पत्रकारितेच्या अभ्यासक्रमाचे मानद संचालकपद स्वीकारले. दूरदर्शन आणि आकाशवाणी या सरकारी माध्यमांवरील सरकारी पकड सैल करण्याच्या हेतूने ‘प्रसार भारती’ या स्वायत्त मंडळाचे ते अध्यक्ष होते, तेव्हाही पत्रकारितेच्या मूलभूत प्रक्रियांना तडा जाणार नाही, याची दक्षता त्यांनी घेतली. पत्रकारिता हा केवळ व्यवसाय नाही, कारण त्याचा संबंध मानवी समूहांच्या सुखदु:खांशी थेट जोडलेला असतो. ही दु:खे वेशीवर टांगत असताना आपण त्याचे केवळ वाहक असतो, हे भान सतत ठेवल्यामुळेच त्यांची पत्रकारिता उजळून निघाली. स्वातंत्र्यपूर्व काळापासून ते आजपर्यंतच्या पत्रकारितेचे सिद्ध साक्षीदार झालेल्या कामत यांच्या निधनाने एक मोठा कालखंड विस्मृतीत गेला आहे.