एका बाजूला गडकरी आणि दुसरीकडे मुंडे असे दोन मध्यम उंचीचे बुरूज आणि आसपास विनोद तावडे, सोमय्या आदींच्या सोयीप्रमाणे वरखाली होणाऱ्या खुंटय़ा यांत देवेंद्र फडणवीस यांना आपल्या नेतृत्वाचा झेंडा उभारण्याची कसरत करावयाची आहे.

स्वत:च्या हाताने स्वत:चा मतदारसंघ दुरावायचा असेल तर एक विशेष कौशल्य लागते. ते आपल्याकडे किती मुबलक आहे ते दाखवण्याची एकही संधी शिवसेना नेतृत्वाने गमावलेली नाही. एक राजकीय पक्ष म्हणून सेना नेतृत्वाने कमावलेल्या या अद्वितीय कौशल्यामुळेच मुंबईतील ३६ पैकी २६ मतदारसंघांत अमराठींचे प्राबल्य वाढले आहे. ढवळ्याशेजारी बांधलेल्या पवळ्याचा वाण नाही पण गुण लागावा तसे हे कौशल्य अलीकडच्या काळात सेनेचा सहकारी पक्ष असलेल्या भाजपनेही महाराष्ट्रात दाखवायला सुरुवात केली होती. सुस्त आणि मस्त झालेले नेतृत्व, कमालीची गटबाजी आणि पक्षाच्या सत्तेपेक्षा आपली मत्ता वाढवण्यातच नेत्यांना असलेला रस यामुळे महाराष्ट्रात भाजप हा असून नसल्यासारखाच झाला होता. त्यामुळे विरोधी पक्ष म्हणून जनतेच्या मनात असलेले स्थान भाजपने गमावले. त्यालाही आता बराच काळ लोटला. भाजपची अशी अवस्था होण्यास जबाबदार होते सत्ताधारी पक्षाचे राखीव खेळाडू म्हणून वागू लागलेले पक्षाचे दोन ज्येष्ठ नेते. गोपीनाथ मुंडे हे काँग्रेसला जवळचे झाले होते तर माजी राष्ट्रीय अध्यक्ष ब्रिजभूषण नितीन गडकरी हे त्यांच्या कंत्राटदारी प्रेमामुळे राष्ट्रवादीला घरचे वाटू लागले होते. मुंडे तर दरम्यानच्या काळात काँग्रेसच्या गाभाऱ्यात डोकावून परत आले. गडकरींनी ती वेळ आणली नाही. पण पक्षाध्यक्ष म्हणून त्यांना कार्यपूर्तीपेक्षा अन्य पूर्तीतच रस वाटू लागला होता, हे लपून राहिलेले नाही. या कुंपणापलीकडच्या प्रेमामुळेच त्यांना राष्ट्रीय अध्यक्षपद घालवावे लागले. त्यामुळे सत्ताधारी अधिकाधिक जनविरोधी वाटू लागलेले असताना विरोधी पक्षही जनतेपासून दूर जात असल्याचा दुर्दैवी योग सध्या आपणास अनुभवावा लागत आहे.
नेमक्या या आव्हानाच्या पाश्र्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांच्याकडे राज्य भाजपची सूत्रे जात आहेत. हे आव्हान सोपे नाही, पण भासते तितके अवघडही नाही. याचे कारण देवेंद्र फडणवीस यांचे राजकीय शील. वय जसे देवेंद्र फडणवीस यांच्या बाजूने आहे तसेच त्यांनी डोळसपणाने जपलेले राजकीय चारित्र्य हे त्यांच्यासमोरील आव्हान पेलण्यास मदतीला येणार आहे. राज्यातील राजकारणाची कुंडली ज्यांना पुरेपूर माहीत आहे त्या शरद पवार यांनी महाराष्ट्रातील विरोधक हे तोडपाणी करण्यात मश्गूल असल्याचा आरोप मध्यंतरी केला होता. पवार सहसा अशी भाषा वापरीत नाहीत. ती जबाबदारी त्यांनी आपला पुतण्या अजित याच्यावर सोडलेली आहे. परंतु तरीही थोरल्या पवारांना विरोधकांच्या राजकारणाविषयी बोलताना असा शब्द वापरावासा वाटला. याचे कारण भाजपच्या आणि सेनेच्या विद्यमान नेतृत्वात आहे. सत्ताधारी पक्षाच्या आखाडय़ात राहून कंत्राटदारांची भर करण्याची कला भाजपच्या नेतृत्वाने साध्य केलेली आहे. विरोधी पक्षात राहून पडद्याआडून सत्ताधाऱ्यांशी संधान बांधून वेगवेगळ्या कंत्राटांचे तूप आपल्या पोळीवर ओढण्यात भाजप आणि सेनेचे नेते मग्न असले तरी तूर्त त्यास एक तरी अपवाद आहे. तो म्हणजे देवेंद्र फडणवीस. उत्तम अभ्यास, संसदीय आयुधांचा वापर करण्याचे चातुर्य आणि आपल्या तत्त्वांशी अव्यभिचारी निष्ठा यामुळे विरोधकांच्या कोंडाळ्यात खरे विरोधी फक्त फडणवीसच वाटतात, हे विधानसभेतील कामकाजावर लक्ष टाकल्यास सहज जाणवावे. फडणवीस यांच्याबाबत अशी सकारात्मक प्रतिमा निर्माण झाली कारण प्रचलित सर्वपक्षीय नेत्यांप्रमाणे ते साखरेच्या वा सरकारी कंत्राटदारांच्या प्रेमात पडलेले नाहीत. कोणत्याही सहकारी संस्था वा बिल्डरांशी त्यांचे नाव जोडले जात नाही, की एखाद्या प्रकल्पाचे काम मिळवण्यासाठी त्यांनी खटपटी केल्याचे दिसत नाही. त्यामुळे राज्य भाजपची सूत्रे त्यांच्या हाती देण्याचा निर्णय हा त्या पक्षाच्या दृष्टीने योग्यच म्हणावयास हवा. वास्तविक अलीकडच्या काळात भाजपचे, दिल्लीतील असो वा राज्यातील, नेतृत्व शहाणपणाचे निर्णय घेण्यासाठी तितके काही ओळखले जात नाही. तरीही त्यांना फडणवीसांकडे राज्य भाजपची धुरा द्यावीशी वाटली, हे कौतुकास्पद म्हणावयास हवे. त्या श्रेयाचा काही वाटा अर्थातच भाजपच्या सामुदायिक शहाणपणापेक्षा परिवाराच्या नागपूरवासी कुलदैवतास जातो.
तरीही फडणवीसांच्या नियुक्तीत बरीच भवती न भवती झाली आणि अखेर देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले. मुंबईतील अधिवेशनात मंगळवारी त्यांनी पक्षाची सूत्रे हाती घेतली. या वेळी केलेल्या भाषणात फडणवीस यांनी पक्षापासून दूर गेलेला भाजपचा पारंपरिक मतदार पुन्हा पक्षाकडे कसा वळवता येईल याबाबत काही विचार मांडले आणि त्या दिशेने प्रयत्न करण्याची इच्छा व्यक्त केली. यावरून निदान त्यांना समस्येची जाण आहे याचा तरी अंदाज आला असे म्हणावयास हवे. याबरोबर त्यांना आणखी एका आव्हानाचीही जाणीव असेलच. हे आव्हान घरचे आहे. फडणवीस नागपूरचे. अशोभनीयपणे पदावरून दूर व्हावे लागलेले भाजपचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष नितीनभौ गडकरी हेही नागपूरचे. या दोघांच्याही मागे संघाचा वरदहस्त आणि संघाचे मुख्यालयही नागपुरातच. यातील काव्यगत न्याय असा की संघास प्रिय असलेल्या गडकरी यांना पदत्याग करावा लागलेला असतानाच त्यांच्याच गावच्या फडणवीस यांच्याकडे राज्य भाजपची सूत्रे देण्याचे संघाने ठरवले. या निर्णयामुळे आनंद झाल्याचा देखावा गडकरी उत्तमपणे पार पाडतील याबाबत शंका नसली तरी वस्तुस्थिती तशी नाही, याचाही अंदाज फडणवीस यांना असेल. फडणवीस यांना वाढू देण्यात गडकरी यांना रस होता असे म्हणता येणार नाही. गडकरी यांनी एकही निवडणूक कधी थेट लोकांमधून लढवलेली नाही तर फडणवीस नागपूरच्या महापौरपदापासून सर्वच निवडणुका लढवत आले आहेत. तेव्हा फडणवीस यांच्यापुढील अनेक आव्हानांपैकी एक आव्हान गावातूनच उभे राहणार आहे, यात शंका नाही. एका बाजूला गडकरी आणि दुसरीकडे मुंडे असे दोन मध्यम उंचीचे बुरूज आणि आसपास विनोद तावडे, किरीट सोमय्या आदींच्या सोयीप्रमाणे वरखाली होणाऱ्या खुंटय़ा यांत फडणवीस यांना आपल्या नेतृत्वाचा झेंडा उभारण्याची कसरत करावयाची आहे.
तो उभा राहणे हे राज्यासाठीही अत्यंत गरजेचे आहे. याचे कारण असे की आज महाराष्ट्र कधी नव्हे इतक्या गंभीर आव्हानांना तोंड देत असताना विश्वसनीय असा चेहरा विरोधकांमध्ये नाही. काँग्रेसमध्ये पृथ्वीराज चव्हाण यांच्यासारखा गंभीर आणि स्वच्छ नेता असताना विरोधक मात्र नेतृत्वाच्या बाबत अनाथच म्हणावयास हवेत. भाजपचे डोके बिघडलेले तर शिवसेनेचे हृदय. मधून मधून उद्धव ठाकरे काहीबाही बोलून आपल्या अस्तित्वाची जाणीव करून देत असतात, पण त्यांना आता त्यांच्याच पक्षातदेखील कोणी गांभीर्याने घेत नाही. राहता राहिले राज ठाकरे. विरोधी पक्षाच्या जागेची वजाबाकी एकहाती भरून काढण्याची त्यांची इच्छा असली तरी तूर्त तरी ती प्रयत्नांच्या पातळीवरच आहे.
तेव्हा अशा वातावरणात भाजपकडे समर्थ चेहरा असणे गरजेचे होते. ती गरज पूर्ण करून आपली निवड सार्थ ठरवण्याची संधी फडणवीस यांच्यासमोर आहे. मिळालेली संधी हातची कशी घालवू नये यासाठीचा धडा त्यांना गावातच समोर आहे. त्यापासून ते काही शिकले असतीलच. तेव्हा त्या नागपुरी इतिहासाची पुनरावृत्ती टाळणे हे देवेंद्रीय आव्हान या फडणवीसांपुढे आहे.