महाराष्ट्रातील मोजक्याच विचारवंतांमध्ये अग्रस्थानी नाव घ्यावे असे ज्येष्ठ विचारवंत, संशोधक प्रा. शेषराव मोरे यांनी विश्व मराठी साहित्य संमेलनात मांडलेल्या विचारांमुळे महाराष्ट्रातील उरल्या-सुरल्या वैचारिक विश्वात नक्कीच खळबळ माजली आहे. मोरे हे स्वा. सावरकरांच्या बुद्धिवादी, विज्ञाननिष्ठ आणि सेक्युलर विचारांनी भारलेले असून, लोकप्रियतेचा विचार न करता तर्ककठोरतेने आपले विचार मांडण्यासाठी ते प्रसिद्ध आहेत. म्हणूनच ते जेव्हा ‘िहदूंना प्रतिगामी ठरवणे हा पुरोगामी दहशतवाद आहे’ अशी टीका करतात तेव्हा ती गांभीर्यानेच घेतली पाहिजे. मोरे यांच्या म्हणण्यानुसार, येथील पुरोगाम्यांनी प्रतिगामीपणाची जी कसोटी ठरविली आहे ती चूक आहे. प्रतिगामी वा उजवा तो िहदुत्ववादी आणि िहदुत्ववादी कोण, तर िहदू शब्दाचा चांगल्या वा त्याची ओळख पटेल या अर्थाने उपयोग करणारा. अशा या कसोटीलाच मोरे यांचा आक्षेप आहे. मोरे हे म्हणतात ते बरोबरच आहे कारण येथे बोलणारे मोरे आहेत आणि ते सावरकर विचारांनी भारलेले आहेत. त्यामुळे ते या सर्व पुरोगामी, प्रतिगामी वर्गवारीकडे सावरकर विचारांच्या चष्म्यातूनच पाहात आहेत. मात्र यातून एक भलताच घोळ निर्माण झाला आहे. एकीकडे डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्यासारखे पुरोगामी सावरकरांचेच कार्य पुढे चालवत होते असे ते म्हणतात. हे कार्य करताना दाभोलकर देव-धर्मश्रद्धांवर सावरकरांप्रमाणे बुद्धिवादाचे तीव्र प्रहार करीत नसत अशी किंचित खंतही ते व्यक्त करतात आणि त्याच वेळी ‘िहदूंच्या जेवढे विरोधी बोलू तेवढे आपण पुरोगामी ठरू’ असे मानणाऱ्या पुरोगाम्यांवर आसूड ओढत िहदुत्ववादाची भलामण करतात, तेव्हा हा काय गोंधळ आहे असा प्रश्न निर्माण होतो. या प्रश्नाचे उत्तर मोरे यांच्या मनात असलेल्या िहदुत्वाच्या व्याख्येत दडलेले आहे. ही व्याख्या खासच सावरकरी आहे. परंतु पुरोगाम्यांना झोडपण्याच्या भरात मोरे यांनी सावरकरी आणि गोळवलकरी िहदुत्ववाद्यांना अजाणता एकाच पारडय़ात नेऊन बसवल्याचे दिसते. पुरोगाम्यांवरील अशा टीकेने संघीय िहदुत्ववाद्यांना हर्षवायूच होण्याचे बाकी असेल. पण मुळात पुरोगामी या शब्दाचा कोशातील अर्थ सामाजिक सुधारणांच्या बाजूने असलेला विचार वा व्यक्ती असा आहे हे लक्षात घेतले, तर सावरकर हेही पुरोगामीच ठरतात. ते जेव्हा अंधश्रद्धा उच्छेदनाचे कार्य करत तेव्हा समाजाची देव-धर्मभावना विचारात घेत नसत. आजच्या गोहत्याबंदी काळात ते असते तर तेही ‘पुरोगामी दहशतवादी’ ठरले असते. मोरे यांना खचितच तसे म्हणून तोगडिया वा सुब्रमण्यम स्वामी यांच्यासारख्या िहदुत्ववाद्यांना पाठीशी घालायचे नाही. त्यांच्या भाषणाचा सावरकर विचारांचा ऊहापोह करणारा संपूर्ण उत्तरार्ध पाहता त्यांचा या िहदुत्ववाद्यांकडे पाहण्याचा चष्मा वेगळाच आहे हे दिसते. राहता राहिला प्रश्न िहदूंच्या विरोधात बोलून पुरोगामी ठरण्याचा. िहदू धर्मात सुधारणा व्हावी यासाठी त्यातील श्रद्धा, रूढी, परंपरा यांवर घटना व सेक्युलॅरिझमला साक्षी ठेवून केलेला विरोध खुद्द मोरेच टीकास्पद मानणार नाहीत. जे केवळ िहदूंवर टीका आणि अन्य धर्मीयांचे लांगूलचालन करतात त्यांची गोष्ट वेगळी. ते अंतिमत: प्रतिगामीच असतात. हे सारे मोरे यांनी नेमक्या शब्दांत स्पष्ट केले असते तर बरे झाले असते. ते करण्याऐवजी पुरोगामी दहशतवाद असा शब्दप्रयोग उपयोजून त्यांनी प्रतिगाम्यांच्या हातात नाहकच एक शब्दअस्त्र ठेवले. आता अशा मांडणीतून सेक्युलॅरिझम पुढे जाईल असे मोरे यांना वाटते की काय नकळे. यातून विचारांच्या मारेकऱ्यांना बळ मिळेल हे मात्र नक्की.