बुद्धिबळात पाच वेळा विश्वविजेतेपद मिळविणाऱ्या विश्वनाथन आनंदला आपल्या देशातील बुद्धिबळ युगकर्ता म्हणून ओळखले जाते. त्याच्याकडून स्फूर्ती घेत अनेक ग्रँडमास्टर व आंतरराष्ट्रीय मास्टर आपल्या देशात घडले आहेत. मात्र गतवर्षी मॅग्नस कार्लसन या नॉर्वेच्या खेळाडूने विश्वविजेतेपदाच्या लढतीत आनंदचा पराभव करीत साऱ्या बुद्धिबळ क्षेत्रात खळबळ उडवून दिली होती. आनंदपेक्षा कार्लसन हा वीस वर्षांनी लहान व तरुण खेळाडू आहे. त्याच्याकडून पराभव झाल्यानंतर आनंद हा साऱ्या टीकाकारांचे लक्ष्य बनला. त्यातच ही लढत चेन्नईत म्हणजेच आनंदच्या घरच्या मैदानावर झाल्यामुळे त्याच्या विरोधकांना अधिकच चेव आला. गॅरी कास्पारोव्ह याच्यासह अनेक ज्येष्ठ खेळाडूंनी आनंदवर तोंडसुख घेतले. त्याने या खेळातून निवृत्त व्हावे व प्रशिक्षण अकादमी सुरू करावी असे अनाहूत सल्ले देण्यास या टीकाकारांनी सुरुवात केली. आनंदच्या पराभवामुळे भारतीय बुद्धिबळ क्षेत्रावरही काहीसा अनिष्ट परिणाम झाला. अनेक पुरस्कर्त्यांनी बुद्धिबळाकडे पाठ फिरविण्यास सुरुवात केली. आनंदने या साऱ्या गोष्टी निमूटपणे सहन केल्या. जो खरा खेळाडू असतो तो कधीही पराभवाने खचून जात नाही. तो ज्या रीतीने विजय स्वीकारतो, त्याच रीतीने तो पराभवाचाही हसत हसत स्वीकार करतो. आनंदबाबत असेच घडले. त्याने टीकाकारांच्या टीकेस आपल्या कामगिरीनेच सडेतोड उत्तर द्यायचे हा दृष्टिकोन मनाशी ठेवत आपल्या सरावावर लक्ष केंद्रित केले. गमावलेले स्थान पुन्हा मिळवायचे असेल तर आपण सतत विजयाचाच विचार केला पाहिजे. आपली देहबोलीही फक्त खेळाचीच असली पाहिजे. विश्वविजेतेपदाच्या लढतीनंतर झालेल्या लंडन क्लासिक स्पर्धेतही आनंदची कामगिरी अपेक्षेइतकी झाली नाही. तेव्हादेखील टीकाकारांनी आनंदवर सतत टीका करण्यावरच भर दिला.  मात्र आनंद हा संयमाचा महामेरूच मानला जातो. त्याने या टीकेकडेही दुर्लक्ष करीत पुन्हा आपल्या सरावावर अधिकाधिक लक्ष केंद्रित केले. शून्यातून पुन्हा विश्वविजेतेपदाचा आव्हानवीर होणे ही काही सोपी गोष्ट नाही. त्याकरिता कमालीची जिद्द, खडतर परिश्रम व आत्मविश्वास याची आवश्यकता असते. आनंदकडे हे सर्व गुण आहेत. आव्हानवीर स्पर्धेत आपले संभाव्य प्रतिस्पर्धी कोण आहेत याचा त्याने बारकाईने अभ्यास केला व त्यानुसार त्याने जय्यत तयारी केली. आव्हानवीर स्पर्धेत त्याने व्हेसेलीन टोपालोव्ह, लेव्हॉन आरोनियन व शाख्रीयर मामेद्यारोव्ह या तुल्यबळ खेळाडूंवर मात केली. तसेच त्याने व्लादिमीर क्रामनिक, पीटर स्वेडलर, सर्जी कार्याकीन, दिमित्री आंद्रेकीन यांच्याशी बरोबरी स्वीकारली. हे सारे खेळाडू जागतिक क्रमवारीतील पहिल्या दहा खेळाडूंमध्ये स्थान असलेले खेळाडू आहेत. आनंदने या स्पर्धेची एक फेरी बाकी असतानाच विजेतेपद व आव्हानवीर हे पद निश्चित केले. यावरूनच त्याने किती तयारी केली होती याची पूर्वकल्पना येऊ शकेल. जो खेळाडू आपल्या यापूर्वीच्या चुकांमध्ये सुधारणा करीत या चुका पुन्हा होणार नाहीत याची काळजी घेतो तोच खरा अव्वल दर्जाचा खेळाडू मानला जातो. आव्हानवीर स्पर्धेतील आनंदने वापरलेल्या डावपेचांचा अभ्यास केला तर किती बारकाईने आनंदने तयारी केली होती याची कल्पना येऊ शकते. आनंद हा पुन्हा आव्हानवीर ठरल्यानंतर कार्लसनच्या पायाखालची वाळू सरकली आहे. आव्हानवीर स्पर्धेतील खेळाडू विश्वविजेतेपदाच्या पात्रतेचे नव्हते अशी भाषा त्याने सुरू केली आहे. आनंदरूपी सिंह पुन्हा जागा झाला आहे आणि तो आपल्याला खाऊन टाकेल अशी भीतीच त्याला वाटू लागली आहे. आनंदने पुन्हा फिनिक्स पक्ष्यासारखी भरारी घेतली आहे. ही भरारी पुन्हा विश्वविजेतेपदावर पोहोचावी अशीच त्याच्या चाहत्यांची इच्छा असणार!