तीन पातळ्यांवरून माणूस जगाला पाहतो आणि त्या जगात गुंतत असतो. मग याच पातळ्यांच्या आधारे माणूस सद्गुरूंना पाहून सद्गुरूमय होऊ शकतो, असं दादा म्हणाले.. हृदयेंद्र वगळता सर्वाचाच प्रश्न असा होता की ते कसं साधावं?
अचलदादा – ते कशानं साधेल माहीत आहे?
कर्मेद्र – नाही..
अचलदादा – ते केवळ एका गोष्टीच्या जोरावर साधेल, ती गोष्ट म्हणजे अ‍ॅक्सेप्टन्स! स्वीकार!!
कर्मेद्र – कसला स्वीकार?
अचलदादा – माझ्या प्रपंचाची जी परिस्थिती आहे ती प्रारब्धवशात आहे.
कर्मेद्र – म्हणजे प्रपंच आहे तसा स्वीकारायचा? मिळेल त्यात आनंद मानायचा आणि कायमच गरीबच राहायचं?
अचलदादा – नव्हे! कोण असं सांगतं आणि कुणी सांगितलं तरी कोण ते ऐकेल हो? तुम्हाला प्रपंच मनासारखा करायचाय ना? जरूर करा! परिस्थिती सुधाराविशी वाटते ना? जरूर सुधारा! पण त्यासाठी सद्गुरूंना ओलीस ठेवू नका!! प्रपंच सुधारण्यासाठी, परिस्थिती सुधारण्यासाठी भौतिकात जे जे प्रयत्न करावे लागतील ते स्वत: करा.. त्या प्रयत्नांत त्यांना ओढू नका.. त्यांच्या कृपाशक्तीची फूटपट्टी आणू नका.. का करतो आपण असं? मला पगारवाढ मिळावी, मला चांगली नोकरी मिळावी, मला पदोन्नती मिळावी, मला आणखी मोठं घर मिळावं, मला गाडी घेता यावी यासाठी का मी या अध्यात्माच्या वाटेवर आलो? जे काही उरलेलं तीस-चाळीस वर्षांचं आयुष्य आहे त्यातही मी जर हेच रडगाणं गाणार असेन तर खुशाल जगात गात बसावं की! त्यासाठी गोंदवल्याची पायरी कशाला हवी? जो मला जुगाराच्या नादातून सोडवायला आलाय त्याला मी जुगारात यश मिळत राहू दे, म्हणून सदोदित साकडं घालत बसायचं आणि हरलो की त्यांची कृपा माझ्यावरच का नाही, म्हणून त्यांना जाब विचारायचा.. आजवर त्यांच्यासाठी काय काय केलं त्या जपाचे, पारायणाचे, पूजेचे, दानाचे हिशेब मांडायचे.. तेव्हा जर खरंच या मार्गावर पाऊल ठेवायचं असेल तर प्रथम या गोष्टीचा स्वीकार हवा की माझं भौतिक जग आणि आध्यात्मिक जग दोन वेगळं आहे.. भौतिक जगातल्या सुखाचे प्रयत्न भौतिक साधनांनीच करीन, त्यात महाराजांना आणणार नाही.. आध्यात्मिक प्रयत्नांपुरतंच त्यांना साकडं घालीन..
कर्मेद्र – पण किती कठीण आहे दादा हे.. अहो लहानपणापासून हीच तर सवय आहे, अमुक स्तोत्र वाच, मग परीक्षेत पास होशील.. परीक्षेला जाण्याआधी देवाला नमस्कार कर, अमक्या मंदिरात जा..
अचलदादा – पण वय वाढल्यावर तरी समजावं ना? स्तोत्रं जरुर म्हणा, मंदिरात जरुर जा, देवाला नमस्कार जरुर करा.. पण ते सारं आनंदासाठी.. आंतरिक आनंदासाठी.. अभ्यासच केला नाही तर नुसता नमस्कार करून काय उपयोग? अभ्यास न करता  केवळ उत्तीर्ण होण्यापुरता नमस्कार हा खरा नमस्कार तरी आहे का? तेव्हा स्वीकार हवाच.. अहो गोंदवलेकर महाराजांचंच वाक्य आहे की, ‘उणीव हे प्रपंचाचं रूप आहे.’ तेव्हा प्रपंचात उणीव असायचीच. परमार्थात मात्र उणीव राहाता कामा नये. जाणीव हे परमार्थाचं सूत्र आहे. अखंड जाणीव! प्रपंच आपण बेसावधपणे करतो.. मनाची ओढ हाच बेसावधपणा.. म्हणून त्यात घसरण आहे, सल आहे, बोच आहे.. परमार्थ हा सावधपणेच केला पाहिजे.. उलट अखंड दक्षता, अखंड सावधानता हा साधकाचा मुख्य धर्म आहे.. आपली वाटचाल योग्य सुरू आहे ना? मनातली भौतिकाची ओढ शमवण्यासाठी तळमळ किती आहे? साधना करताना ती तळमळ डोकावते का? तिच्या पूर्तीसाठी सद्गुरूंची आळवणी होते का? हे सारं दक्षतेनं जाणलंच पाहिजे.. सदोदित! अहो मागणं म्हणजे हवेपणाच नाही का? मग जे हवं आहे ते स्वप्रयत्नांनी मिळवं की! माझं मागणं थांबवा, हेच खरं तर महाराजांकडे मागितलं पाहिजे! जोवर याबाबतीत मन स्वच्छ होत नाही ना तोवर तिन्ही सोडा कोणत्याच पातळीवर सद्गुरूंचं दर्शन होणार नाही! उघडय़ा डोळ्यांनी त्यांना पाहतानाही भौतिकातल्या मागण्याच नाचत असतील, डोळे मिटल्यावरही भौतिकच लख्ख दिसत असेल आणि त्यांच्यासमोर बसूनही घरच्याच गोष्टी दिसत असतील.. मग काय उपयोग?
चैतन्य प्रेम