मेरुदंडाबाबत बोलत असतानाच योगेंद्रनं आपला मोबाइल सुरू केला. ‘‘काय पाहतोयंस?’’ असं कर्मेद्रनं विचारलं. त्यावर तो म्हणाला, ‘‘विवेकानंदांच्या ‘राजयोग’ पुस्तकातला काही भाग व्हॉटस्अ‍ॅपवरून मागे सेव्ह केलाय. तो वाचतो..’’ तो भाग मिळताच योगेंद्र वाचू लागला..
योगेंद्र – हं सापडला.. ऐका हं, स्वामीजी म्हणतात, ‘‘आपल्या मेरुदंडात म्हणजे पाठीच्या कण्यात इडा व पिंगला हे ज्ञानतंतूंचे दोन प्रवाह असून मेरुदंडातील मज्जेच्या मध्यातून जाणारा सुषुम्नानामक पोकळ मार्ग आहे. या पोकळ मार्गाच्या खालच्या टोकाशी कुंडलिनीशक्तीचे निवासस्थान आहे. हे स्थान त्रिकोणाकृती आहे, असं योगी सांगतात. त्या ठिकाणी कुंडलिनी शक्ती वेटोळं घालून बसली आहे.’’ (मग मोबाइलवरची नजर हटवून योगेंद्र पुढे म्हणाला-) आता प्रत्येक माणसात ही सुषुम्ना आहे, पण त्याचा सर्व व्यवहार हा इडा आणि पिंगला या दोन नाडय़ांद्वारे अव्याहत चालतो. शरीराच्या वेगवेगळ्या भागांत शक्ती आणि संवेदनांचं वहन या इडा आणि पिंगलाद्वारे अखंड सुरू असतं. आता आपली मेरुमज्जा कशी आहे? स्वामीजी सांगतात की इंग्रजी आठ हा आकडा आडवा केला तर कसा दिसेल? (कर्मेद्रनं तो वर्तमानपत्रावर ०० असा काढून दाखवला) हं अगदी बरोबर, आता या आठच्या खाली ओळीनं असेच आठ काढत जा.. बरोबर.. तर असा एकावर एक पण आडवा इंग्रजी आठचा अंक रचत गेल्यावर जसं दिसेल तसा मेरुमज्जेचा आकार असतो. यात डाव्या भागात इडा तर उजव्या भागात पिंगला असते.  मधोमध जो पोकळ मार्ग असतो तो सुषुम्नेचा असतो. कमरेच्या भागातील मणक्यात जिथे मेरुमज्जा संपते तिथून एक अगदी बारीक सुतासारखा पदार्थ थेट खालपर्यंत जाऊन पोहोचतो. सुषुम्नेचा पोकळ मार्ग या बारीक दोऱ्यातूनही जातो. या मार्गाचे खालचे तोंड बंद असते. इथून प्राणशक्तीचा प्रवाह जर निघाला तर तो मार्गातील अडथळे आपल्याच शक्तीने दूर करीत थेट सहस्त्राधारातील निरामय ब्रह्मस्थानात पोहोचून आत्मसाक्षात्कार घडवतो, असं योगी सांगतात. सर्व अडथळे दूर करीत मूलाधारातून निघून सहस्त्राधार चक्रापर्यंत थेट जाणारी ही सुषुम्ना म्हणजे अगदी ‘मुक्तमार्गा’सारखी आहे!  हिलाच पश्चिम मार्ग म्हणतात.. योगशिखोपनिषदात म्हटल्यानुसार हा पश्चिम मार्ग मोकळा झाल्याशिवाय आणि त्यातून प्राण सहस्त्राधारापर्यंत गेल्याशिवाय मोक्षमार्गात प्रगती नाही.. याच मार्गानं मुक्ती मिळते. कर्मू तू ‘सुतावरून स्वर्ग’ म्हणालास ना? ते याच प्रक्रियेला लागू आहे..
कर्मेद्र – म्हणजे मी काहीही बोललो तरी मला शब्दांत पकडून तुम्ही ही चर्चा रेटतच राहाणार आहात! या अगम्य चर्चेतून मला काही मुक्तीची आशा नाही म्हणायची.. अरे वा वा.. पाहा त्या परमशक्तीला माझी दयाच आली म्हणायची.. कुठलं तरी स्टेशन येतंय..
खरंच स्थानक आलं होतं. कर्मेद्रनं संधी साधत पाय मोकळे करायला म्हणून खाली उतरायचा हट्ट धरला. स्थानक मध्यम वर्दळीचं होतं. ‘पियु’वर पिण्याचं पाणी भरायला लोकांची झुंबड उडाली होती. खाद्यपदार्थाच्या टोपल्या घेतलेले फेरीवाले आवाजी विक्रयकौशल्यानं प्रवाशांचं लक्ष वेधत होते. चहा-कॉफीची स्टीलची लहानशी पिंपं आणि खोक्यातल्या शीतपेयांच्या बाटल्याही खुणावत होत्या. ऊन होतं, पण गार वारंही वाहात होतं. त्यामुळे मनाला टवटवी आली होती. तोच गाडी सुटण्याची शिट्टी वाजली. फराळाची पाकिटं आणि डझनभर केळी सावरत चौघांनी डब्यात धाव घेतली. खिडकीजवळच्या लाकडी घडीच्या फळीवर फराळाची पाकिटं, केळी आणि पाण्याच्या बाटल्या ठेवून चौघं विसावले. थोडं खाणं झालं.. तोवर गाडीनं वेग पकडला होता..
कर्मेद्र – किती छान वाटलं नाही इथे उतरल्यावर? वाटलं इथेच राहावं एखाद-दोन दिवस..
हृदयेंद्र – असे थांबत गेलो तर मुक्कामाला पोहोचू का?  
योगेंद्र – अगदी असेच आपणही बाहेरच्या मार्गावर जागोजागी अडकून आहोत. प्राणशक्तीचा अखंड बहिर्मुख प्रवाह सुरू आहे. बहिर्मुख जगण्यातच अवघं आयुष्य निघून जात आहे, पण गुरुकृपेनं एक वेळ येतेच जेव्हा जीव अंतर्मुख होतो. पश्चिम, म्हणजेच पाठीशी असलेल्या.. पलीकडच्या मार्गावर मूलाधाराशी निद्रिस्त कुंडलिनी शक्ती जागी होते.. सुषुम्नेत शिरण्यासाठी ती धडका देऊ लागते..   पैल तो गे काऊ कोकताहे!