News Flash

आशीष लेले

समाजाला मार्गदर्शक ठरू शकेल असे काम ज्यांनी विविध क्षेत्रांत केले आहे, त्यांचा सन्मान करण्याचा इन्फोसिसचा उपक्रम आहे, त्यात पुण्याच्या राष्ट्रीय रसायनशास्त्र प्रयोगशाळेतील वैज्ञानिक डॉ. आशीष

| January 10, 2013 12:03 pm

समाजाला मार्गदर्शक ठरू शकेल असे काम ज्यांनी विविध क्षेत्रांत केले आहे, त्यांचा सन्मान करण्याचा इन्फोसिसचा उपक्रम आहे, त्यात पुण्याच्या राष्ट्रीय रसायनशास्त्र प्रयोगशाळेतील वैज्ञानिक डॉ. आशीष लेले यांना रसायनशास्त्रातील संशोधनासाठी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या हस्ते इन्फोसिस पुरस्काराने गौरवण्यात आले.  डॉ. लेले यांचे संशोधन हे बहुवारिकांवर म्हणजे पॉलिमर्स पदार्थाच्या गुंतागुंतीच्या रेणवीय रचनेविषयी आहे. त्याचाच एक भाग असलेले हायड्रोजेल्स तापमान, विद्युतक्षेत्र अशा विविध घटकांना कसा प्रतिसाद देतात यावर त्यांनी अनेक निरीक्षणे नोंदवली त्यात त्यांना असे दिसून आले की, एका विशिष्ट प्रक्रियेत पॉलिमर्सचे आकारमान बदलते, त्यांचा आकार हा नारळासारखा होतो, त्याला हायड्रोजेल सिलिंडर असे म्हटले जाते, ही प्रक्रिया उलटही करता येते. बहुलकांच्या साखळ्यांमध्ये धातूंचे विशिष्ट गुणधर्म असलेले आयन मिसळले, तर आपल्याला वेगळ्याच प्रकारचे जेल मिळते. त्यात प्राण्यांमध्ये जखमा ज्या पद्धतीने भरतात त्या गुणधर्माची नक्कल करता येते. याचा अर्थ या जेलचा वापर जखमा लवकर भरून येणाऱ्या औषधांसाठी करता येणार आहे. या हायड्रोजेलचा वापर संवेदक म्हणूनही करता येईल. अनेकदा दाबसारणात विशिष्ट कारणास्तव अस्थिरता येऊन त्यामुळे औद्योगिक उत्पादनांना मर्यादा येते, ती दूर करण्यासाठी ‘कन्व्हेक्टिव्ह कन्स्ट्रेन्ड रिलीज’ या प्रक्रियेची काय भूमिका असते याचा उलगडा करण्याचे कामही त्यांनी केले. गोल चकतीसारख्या रिंग पॉलिमर्सच्या गुणधर्माचा अभ्यास करताना त्याच्या गुणधर्माची सांगड त्यांनी अमिबाशी घालून रसायनशास्त्रातही ‘जीव’ ओतण्याचा प्रयत्न केला आहे. एकूणच बहुवारिकांच्या क्षेत्रात डॉ. लेले यांचे संशोधन अतिशय प्रभावी असून त्यामुळे स्मार्ट हायड्रोजेलची निर्मिती शक्य आहे. डॉ. लेले मुंबईच्या रासायनिक अभियांत्रिकी संस्थेचे पदवीधर आहेत. नंतर त्यांनी डेलावेर विद्यापीठातून डॉक्टरेट केली. अनेक मानसन्मान त्यांना मिळाले. भारतीय राष्ट्रीय विज्ञान अकादमीचा तरुण वैज्ञानिक पुरस्कार, शांतिस्वरूप भटनागर पुरस्कार असे अनेक पुरस्कार त्यांना लाभले आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 10, 2013 12:03 pm

Web Title: vyaktivedh ashish lele
Next Stories
1 दक्षिण बजरंगे
2 डॉ. दीपाली पंत-जोशी
3 प्रतिभा राय
Just Now!
X