फुटबॉलचा अनभिषिक्त सम्राट म्हणून ब्राझीलचे पेले आणि अर्जेटिनाचे दिएगो मॅराडोना यांनी लोकप्रियता मिळवली. पेले, मॅराडोना यांच्या अस्तानंतर व्यावसायिक फुटबॉल क्षेत्राचा पसारा वाढला आणि त्यानंतर पेले, मॅराडोना यांच्यासारखीच लोकप्रियता लाभलेले खेळाडू म्हणून ख्रिस्तियानो रोनाल्डो आणि लिओनेल मेस्सी यांचे नाव घेतले जाते. २००८मध्ये रोनाल्डोने बलॉन डी’ऑर या जगातील सर्वोत्तम फुटबॉलपटू पुरस्कारावर नाव कोरले. त्यानंतर गेली चार वर्षे या पुरस्कारावर मेस्सीने वर्चस्व गाजवले. पण या मोसमात कठोर मेहनत घेऊन चमकदार कामगिरी करणाऱ्या रोनाल्डोने दुसऱ्यांदा बलॉन डी’ऑर पुरस्कार आपल्या नावावर केला.
२००३ मध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर पदार्पण केल्यानंतर त्याने मागे वळून पाहिलेले नाही. व्यावसायिक फुटबॉलमध्ये महागडय़ा खेळाडूंमधील पहिल्या तीन खेळाडूंमध्ये त्याचे स्थान आहे. त्याने आंतरराष्ट्रीय स्तरावर १०३ सामन्यांमध्ये पोर्तुगालचे प्रतिनिधित्व करताना आतापर्यंत ४७ गोल नोंदविले आहेत.  त्याची आई आचारी तर वडील माळीकाम करायचे. रोनाल्डोचे वडील अ‍ॅण्डोरिन्हा या हौशी क्लबचे कीट सांभाळण्याचेही काम करीत. रोनाल्डोसुद्धा त्यांच्यासोबत जात असे. त्यामुळेच वयाच्या आठव्या वर्षांपासूनच रोनाल्डोला फुटबॉलची आवड निर्माण झाली. शालेय जीवनातही संघर्ष करण्याच्या स्वभावामुळेच रोनाल्डोचे शिक्षण अर्धवटच राहिले. त्याला कारणही तसेच घडले. त्याने आपल्या शिक्षकाच्या दिशेने खुर्ची भिरकावली, त्यामुळे शाळेतून त्याला १४ व्या वर्षीच काढून टाकण्यात आले. त्याच्या आईने त्याला शाळेऐवजी फुटबॉलवर लक्ष केंद्रित करण्याचा सल्ला दिला.  तेथूनच त्याच्या खेळाला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली.  १९९३ ते २०१३ या कालावधीत रोनाल्डोने जागतिक फुटबॉलवर अधिराज्य गाजवले. मात्र पोर्तुगालला फिफा विश्वचषक जिंकून देण्याचे स्वप्न त्याला पूर्ण करता आले नाही.
धडाकेबाज खेळाडू म्हणून ख्याती मिळवणाऱ्या रोनाल्डोने जगातील सर्वात महागडा खेळाडू होण्याचा पराक्रम २००९ मध्ये केला. व्यावसायिक फुटबॉलमध्ये अडीचशेपेक्षा जास्त गोल करणाऱ्या रोनाल्डोला युरोपियन फुटबॉलमधील ऑल स्टार संघातही स्थान मिळाले आहे. मैदानावरील आक्रमक शैलीबरोबरच बिनधास्त विधाने करीत टीकाकारांचे लक्ष्य बनण्यातही तो अग्रेसर मानला जातो. त्यामुळेच की काय, तो अद्यापही लोकप्रियतेच्या शिखरावर आहे.