News Flash

‘योद्धा’ पत्रकार

युद्धवार्ता हे बॉब सायमन यांचे महत्त्वाचे अधिकारक्षेत्र. जगभरातल्या युद्धात वा युद्धजन्य ठिकाणी जाऊन त्याचे थेट वार्ताकन करणारे ते कदाचित एकमेवाद्वितीय.

| February 14, 2015 12:49 pm

युद्धवार्ता हे बॉब सायमन यांचे महत्त्वाचे अधिकारक्षेत्र. जगभरातल्या युद्धात वा युद्धजन्य ठिकाणी जाऊन त्याचे थेट वार्ताकन करणारे ते कदाचित एकमेवाद्वितीय. १९५० नंतर झालेल्या सर्व युद्धांचा एकत्रित इतिहास मानवजातीच्या मूलभूत दृष्टिकोनातून बॉब यांनी रेकॉर्ड केला, ज्यातून माध्यमातल्या इतर लोकांना सत्य नेमके काय आहे हे कळले. अलीकडेच त्यांचे अपघाती निधन झाले. त्या निमित्ताने त्यांच्या कर्तृत्वाचा आलेख..

अमेरिकेतल्या टीव्ही क्षेत्रात काम करणाऱ्यांसाठी एमी अॅवॉर्ड नेहमीच आपल्या कष्टांचे चीज होण्याची सर्वात मोठी पावती राहिला आहे. दरवर्षी वृत्तांकनासाठी दिल्या जाणाऱ्या एमी अॅवॉर्डची चर्चा सुरू झाली की बॉब सायमनच्या कुठल्या वृत्तांकनासाठी तो त्यांना दिला जाणार एवढीच चर्चा असायची. लहान बाळाला लॉलीपॉप जितक्या सहजतेने मिळते तितक्या सहजतेने बॉबला हा प्रतिष्ठेचा पुरस्कार मिळतो असे विनोद केले जायचे, पण त्याला कारणही तसेच होते. बॉब सायमन यांना त्यांच्या कारकीर्दीत २७ वेळा एमी अॅवॉर्ड दिला गेला आणि ज्या वृत्ताकनांसाठी तो दिला गेला ते वृत्तांकन आधुनिक जगाचा इतिहास आहे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. जगात निरनिराळे देश आहेत आणि या देशांमध्ये सदोदित वाद आणि कलह होत असतात. हे वाद आणि कलह शक्यतो राजकारण्यांच्या प्रतिष्ठेतून आलेले असतात किंवा मग बहुसंख्यांनी अल्पसंख्याकांची दडपशाही असते. माणसे अशी का भांडतात? कोटय़वधी लोकांची संख्या एकाच रात्रीत युद्धाच्या छायेत येऊन आपल्या जगण्यातली सुरक्षितता का गमावून बसते? आणि सीमारेषा आखून बनविलेले आभासी राजकीय नकाशे प्रत्यक्ष जमिनीवर माणुसकीशी कशी प्रतारणा करतात हे प्रश्न बॉब सायमन यांना आयुष्यभर पडत होते.
वयात आल्यानंतर लगेचच बॉब सायमन जगाची नसíगक मांडणी आणि जगाची राजकीय मांडणी यांत तफावत जाणवली. कुठल्याही मानवाच्या जडणघडण प्रक्रियेतला हा साक्षात्कार काही तरी महत्त्वाचे मूलभूत बदल घडवून आणीत असतो. अर्थात असा साक्षात्कार होणाऱ्यांची संख्या अत्यंत कमी म्हणजे दहा लाखांत एक वगैरे असावी. या दहा लाखांत जन्माला येणारा एखादा माणूस पत्रकारितेत गेला तर नेमके काय होते याचे जिवंत उदाहरण म्हणजे बॉब सायमन. एखाद्या देशासाठी लढणाऱ्या सनिकाला युद्धात एकदा वा दोनदाच भाग घ्यावा लागतो. यात एक तर तो विजयी होतो किंवा मारला जातो, पण लढाई लढताना शेवटपर्यंत आपले हत्यार न सोडण्याचा सन्याचा एक मूलभूत नियम एक चांगला सनिक कधीच तोडत नाही. एखाद्या माध्यमासाठी काम करणाऱ्या युद्धपत्रकाराला लढाईत सहभागी होण्याची संधी मात्र अनेकदा मिळते. युद्धक्षेत्रांतून पत्रकारिता करताना त्याला जय-पराजयाच्या पलीकडे जाऊन माणुसकी कशी हरतेय याचे वृत्तांकन करावे लागते, निरनिराळ्या पातळ्यांवर आपला जीव सनिकांपेक्षाही जास्त धोक्यात घालून काम करावे लागते, आणि ज्याप्रमाणे सनिक आपले हत्यार शेवटपर्यंत खाली ठेवत नाही तसेच एक चांगला युद्ध वृत्तप्रतिनिधी युद्ध संपेपर्यंत आपल्या हातातले पेन आणि माइक खाली ठेवत नाही. अमेरिकेने व्हिएतनाम युद्धात भाग घेतल्यानंतर प्रत्यक्ष युद्धभूमीवर जाऊन वृत्तांकन करणाऱ्या काही निवडक पत्रकारांपकी बॉब सायमन हे एक होते आणि युद्ध संपल्यानंतर व्हिएतनाममधून बाहेर पडणाऱ्या सर्वात शेवटच्या हेलिकॉप्टरमधून येणाऱ्यांमध्येही बॉब सायमन होते.
युद्धवार्ता हे बॉब सायमन यांचे महत्त्वाचे अधिकारक्षेत्र. जगातल्या एकूणएक युद्धात वा युद्धजन्य ठिकाणी जाऊन त्याचे थेट वार्ताकन करणारे बॉब सायमन कदाचित एकमेवाद्वितीय. १९५० नंतर झालेल्या सर्व युद्धांचा एकत्रित इतिहास मानवजातीच्या मूलभूत दृष्टिकोनातून बॉब यांनी रेकॉर्ड केला, ज्यातून माध्यमातल्या इतर लोकांना सत्य नेमके काय आहे हे कळले. आपल्या कारकीर्दीत बॉब यांनी अमेरिकी सन्याच्या व्हिएतनाममधील योम किप्पुर युद्धातील माघारीबद्दल लिहिले, चीनच्या तियानमेन चौकातल्या विद्यार्थी संघर्षांबद्दल लिहिले. याशिवाय पोर्तुगाल, सायप्रस, युगोस्लाविया, सोमालिया, हैती, भारत, पाकिस्तान या देशांमध्ये उद्भवलेले संघर्षही बॉब यांनी आपल्या ‘सिक्स्टी मिनिट्स’ या कार्यक्रमासाठी कव्हर केले. १९९१ मध्ये आखाती युद्धात सर्वप्रथम युद्धक्षेत्रांतून रिपोर्टिग करण्यात बॉब सायमन आणि त्यांची सीबीएस या वृत्तवाहिनीची टीम होती. या युद्धात ते एक दिवस पकडले गेले आणि त्यांची इराकमधल्या एका तुरुंगात राजकीय युद्धकैदी म्हणून रवानगी झाली. युद्धकैदी म्हणजे नेमके काय हे बॉब यांनी आयुष्यभर जवळून पाहिलेले होते. त्यामुळे आपण आता मारले जाणार हे त्यांना निश्चितच ठाऊक होते. छळछावणीत युद्धकैद्यांना ज्या जीव गुदमरून टाकणाऱ्या भयावह प्रसंगांना सामोरे जावे लागते त्या सर्व प्रसंगांतून बॉब यांना जावे लागत होते. सनिकांकडून अमानुष मार खाऊन ते बेशुद्ध होत आणि शुद्ध आल्यानंतर आपण जिवंत आहोत तर मग आपल्याला ऐकूयेतेय का? आपले डोळे शाबूत आहेत का? आपल्याला समोरचे दिसतेय का? असे मूलभूत प्रश्न स्वतला विचारीत. या प्रश्नांचे उत्तर ‘होय’ येणे त्यांना एक दिवस आणखी जिवंत ठेवी. तुरुंगातल्या या आठवणीबद्दल त्यांनी ‘फोर्टी डेज’ नावाचे पुस्तक लिहिले. ते वाचल्यानंतर एखाद्या माणसाचे शौर्य किती पराकोटीचे असू शकते याबद्दल अंदाज लावता येतो.
इतक्या पराकोटीच्या कठीण परिस्थितीत जिवंत राहिलेल्या बॉब सायमन यांचा मृत्यू नुकताच एका छोटय़ा मोटार अपघातात झाला आणि ज्या पत्रकाराच्या मृत्यूची बातमी सर्वात मोठी ठरू शकली असती ती उपरोधिकपणे इतकी स्वस्त आणि सोपी झाली. एखाद्या विषयावरची सर्वात पहिली बातमी बनविणे किंवा एखाद्या जागतिक प्रश्नाचे उत्तर सर्वप्रथम मांडणे ही पत्रकारितेतल्या शंभर इयत्तांतली शेवटची इयत्ता असते. फार कमी लोकांना या इयत्तेत जाता येते आणि तिथूनही जो उत्तीर्ण होऊन जिवंत बाहेर पडू शकतो तो बिट रिपोर्टर्सचा प्रेषित असतो. वॉल्ट व्हिटमन, मायकल र्हेी, मार्गारेट हिगिन्स यांच्या यादीत इथून पुढे बॉब सायमन यांचेही नाव जोडले जाईल. आयुष्यभर धर्म, जातपात, वंशवाद या वादातून हृदय पिळवटून टाकणारे असंख्य प्रसंग पाहावे लागल्यानंतर आपल्या अलीकडच्या बोलण्यात बॉब सायमन म्हणायचे ‘मला ज्या छळछावणीत ठेवले होते तिथे मला एक दिवसासाठी परत जायचे आहे, त्या खोलीचा दरवाजा बंद करून बसायचे आहे आणि स्वत:शीच म्हणायचे आहे ‘मी धर्म मानीत नाही’!

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 14, 2015 12:49 pm

Web Title: war journalist bob simon
Next Stories
1 राजस्थानी उंट, रायका आणि महिला पशुवैद्य
2 चविष्ट पदार्थातली पौष्टिकता!
3 पक्षी वाचवणारा लेखक
Just Now!
X