सरसंघचालक मोहन भागवत यांच्या ‘इंडिया’ व ‘भारत’ या विधानावर आता खुलासे केले जात आहेत. त्यातून एका मनोवृत्तीचे दर्शन होते आहे.ज्या काळात महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी ज्या विधवा काशीबाईच्या मुलाला दत्तक घेतले, त्या काळात ‘इंडिया’ तर नव्हताच ‘भारत’ सुद्धा नव्हता. तेव्हा होता तो फक्त ‘हिंदुस्थान’ आणि त्या हिंदुस्थानात असलेल्या नीतिमत्तेबद्दल काय लिहावे!
ज्योतीरावांनी १८५३ साली बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना केली तीच मुळी विधवांवर होणाऱ्या बलात्कारातून जन्माला येणाऱ्या मुलांवर आणि विधवांवर मरण्याची वेळ येऊ नये म्हणून. १८५३ साली स्थापन झालेल्या या गृहात १८७३ सालापर्यंत ९६ विधवांची बाळंतपणे झाली.
भागवती मनोवृत्तीचे आणखी एक आवडते समीकरण आहे ते म्हणजे मुलींचे अति तोकडे कपडे हे बलात्काराला कारणीभूत आहेत. इतिहास पाहिला असता प्रश्न निर्माण होतो की,  हिंदुस्थानातल्या विधवा तोकडे कपडे घालत होत्या का? त्या विधवांच्या राहण्यावर असलेली धर्माची कडक बंधने आम्ही भागवतांना सांगण्याची गरज नसावी. तेव्हा त्या विधवांवर मातृत्व लादणारे कोण असायचे, हे आम्ही सांगण्याची गरज नाही. महिलांवर बलात्कार ही काही केवळ आजचीच गोष्ट नाही. मनुस्मृतीतही आठव्या अध्यायात राजाने वेगवेगळ्या गुन्ह्यांसाठी कोणत्या शिक्षा कराव्या, हे सांगताना बलात्काराच्या गुन्ह्याचाही चांगला तपशीलात विचार केलेला आहे. मोहन भागवतांना मनुस्मृतीचा अभ्यास असणारच.फॅशन शो, सौंदर्य स्पर्धा, चित्रपट व दूरदर्शनच्या विविध वाहिन्यांवरील नृत्याच्या कार्यक्रमात नुसते तोकडेच नाही, तर गलिच्छ कपडे घालणाऱ्या स्त्रियांवर कधी बलात्कार झाल्याचे ऐकिवात नाही. मात्र त्याबाबत बोलण्याचे हे ठिकाण नव्हे.

शिवरायांचे दैवत परशुरामाबद्दल वाद अनावश्यक
उन्मत्त अत्याचारी राजसत्ते विरुद्ध परशू धारण करणारे भगवान परशुराम हे छत्रपती शिवरायांचे श्रद्धास्थान होते. कोकणावर स्वारी करून सूर्यराव व जसवंतरावाचा पराभव करून शिवरायांनी दाभोळ, राजापूर व शृंगारपूर जिंकून घेतले. या विजयानंतर शिवराय भगवान परशुरामाच्या दर्शनास गेले. ‘शिवभारत’कार कवींद्र परमानंद या प्रसंगाविषयी लिहितात. ‘विश्वविख्यात, चिरंजीवी, कृपाळू भार्गवरामाचे (परशुरामाचे) महाराजांनी डोळेभरून दर्शन घेतले. मोठय़ा भक्तिभावाने पूजा करून दानधर्म केला तसेच पूजा अर्चा नंदादीप व नैवेद्यासाठी सालीना पाऊणशे होनांची नेमणूक करून दिली.’
शिवरायांचे पुत्र राजाराममहाराजांनी परशुराम क्षेत्राच्या व्यवस्थेसाठी काही भूमी इनाम करून दिली. त्यावेळीजंजिरेकर सिद्दीसात याने परशुराम क्षेत्रावर हल्ला करून विध्वंस केला. या दृष्कृत्याबद्दल संभाजी राजांचे पुत्र थोरले शाहूमहाराज यांनी सिद्दीवर आक्रमणाची मराठी फौजेला आज्ञा केली. सिद्दीवरील विजयानंतर मराठय़ांनी परशुराम क्षेत्राचा जीर्णोद्धार केला.
संभाजी ब्रिगेडने याच भगवान परशुरामांच्या चित्रावरून साहित्य संमेलन उधळवून टाकण्याची धमकी दिली आहे. छत्रपती शिवराय, राजाराममहाराज व शाहू छत्रपती यांचे दैवत असलेल्या भगवान परशुरामांबद्दल अनावश्यक वाद उभा करून ब्रिगेडने एक प्रकारचा सांस्कृतिक दहशतवाद निर्माण केला आहे. शिवभक्त त्यांना कदापीही माफ करणार नाहीत व त्यांचे मनसुबे धुळीस मिळवतील याची मला खात्री आहे.
संदर्भ : १) कवींद्र परमानंदांचे शिवभारत:  अध्याय २९, श्लोक ७२ ते ७८
२) ऐतिहासिक संकीर्ण साहित्य खंड ५.
– पांडुरंग बलकवडे, इतिहास संशोधक

सर्वच संस्कृतिरक्षक चारित्र्यवान असतात?
संस्कृतिरक्षकांच्या कोत्या वृत्तीमुळेच भारत गरीब राहिला आहे. अंधश्रद्धा निर्मूलनवाल्यांनी अनेक बुवांचा बदफैलीपणा दाखविला आहे. अनेक विवाहित संस्कृतिरक्षक स्त्रीलंपट असलेले आम्ही पाहिले आहेत. त्यांना वेळीच आम्ही फटकारले आहे.
दुसरीकडे, स्त्रीद्वेष्टेपणातूनच संन्याशांचे अति कौतुक भारतीय लोक करतात. देशाचे दुर्दैव की बरेच लोक या ढोंगी व उपद्रवी लोकांना चांगले समजतात आणि फुले, आगरकर, आंबेडकर, गाडगेबाबा यांना विसरतात.
प्रतिभा पटवर्धन, सांगली.

‘बेपत्ता’ कामगार कायद्यांची भर
शहरांत बलात्कारासारख्या घटना संध्याकाळी उशिरा वा रात्री घडतात तसेच कॉल-सेंटर, खासगी व सरकारी कार्यालयांमधून घरी येणाऱ्या महिलाच यात बळी जातात, असे वारंवार दिसले आहे. दुसरीकडे, आज कामगार विषयक कायदे पूर्णपणे मोडीत काढले आहेत. यात सरकारच पुढे आहे.
गेल्या वर्षी सचिवालयातील महिला कामगार घरी जायला उशीर होतो म्हणून संपावर गेल्या होत्या. खासगी, सरकारी ठिकाणी महिला कामगारांना बारा-बारा तास राबावे लागते. अस्तित्वात असलेला कायदा म्हणतो कामाचे तास आठ. हा कायदा पायदळी तुडविला जात असताना आपले कामगारमंत्री व मजूर आयुक्त शांत बसून आहेत. महिलांना जर रात्रपाळी आवश्यक असेल तर त्यांच्याबरोबर महिला संरक्षक ठेवणे कायेदेशीर करावे. मोठय़ा पगाराच्या लालचेने कामगार संघटना कामगारांनी मोडीत काढल्या त्याचाही परिणाम जाणवतो.  
मार्कुस डाबरे, पापडी, वसई

आरोग्यम् ‘धन’ संपदा!
होमिओपथी, आयुर्वेद, युनानी डॉक्टरांची अ‍ॅलोपॅथिक प्रॅक्टिस लांबणीवर ही बातमी (लोकसत्ता, ६ जाने. ) वाचली. खरे तर मुख्यमंत्र्यांच्या या भूमिकेमागील विचार प्रॅक्टिस लांबणीवर टाकणे हा नसून परवानगी नाकारणे असाच होतो (थंडा करके खाव या रणनीतीप्रमाणे). मुळात ज्या विकासाच्या वाटेवरील महाराष्ट्रात साध्या डेंगू-मलेरियाने आजही शेकडो मृत्यू ओढवतात (वेळीच औषधोपचार न झाल्याने) त्यावर उपाय म्हणून एमबीबीएस डॉक्टरना बळजबरीने सरकार ग्रामीण आरोग्य अभियानाअंतर्गत खेडय़ा-पाडय़ांत बाँड करून पाठवते (योजना फसली असल्यामुळे सरकारला नुकतीच माघार घ्यावी लागली आहे), तरीही आरोग्य सेवा अपुरी पडते म्हणून दहावी-बारावी पास ‘आशां’ना खेडय़ा-पाडय़ांत लहान मुलांवर उपचार करण्याची मुभा दिली जाते,  खेडोपाडी किराणा दुकानातही औषधे (अतिशयोक्ती नाही..) मिळतात.  व्यवस्था अपुरी पडते म्हणून बोगस डॉक्टरांकडे सरकारच डोळेझाक करते.
एवढे असूनही, होमिओपथी, आयुर्वेद, युनानी डॉक्टरांची बाजू घेऊन सरकार ठामपणे उभे राहात नाही.. कारण उघडपणे त्यांना अ‍ॅलोपॅथीची परवानगी दिल्यास नवी मेडिकल कॉलेजे उघडून त्यासाठी ह.ऌ.ड.कडून  ‘आरोग्यसेवेच्या सक्षमीकरणासाठी निधी’ मिळवता येणार नाही.. आणि मेडिकल कॉलेजांचे खरे आíथक व्यवहार (डोनेशनचे आकडे) फक्त डॉक्टर मंडळींनाच माहीत असतात.. आरोग्यातील ही ‘धन’संपदाच होमिओपथी, आयुर्वेद, युनानी डॉक्टरांची अ‍ॅलोपॅथिक पॅ्रक्टिसच्या आड येत असावी, असे माझे मत आहे.
-डॉ. परीक्षित वि. देशपांडे (साडेगावकर), जालना</strong>

दुखद प्रसंगांचे गांभीर्य तरी ओळखा
गेल्या महिन्यात दिल्ली येथे अल्पवयीन तरुणीवरील पाशवी अत्याचार व नंतर तिचा झालेला मृत्यू या घटना मन सुन्न करणाऱ्या आहेत. भारतानेच नव्हे, तर जगाने या घटनेची दखल गांभीर्यानेच घेतली. या दुर्दैवी घटनेचा उपयोग स्वत:चे महत्त्व वाढविण्यास करावा, अशी कल्पना पापी व्यक्तीच्यादेखील स्वप्नातही येणार नाही असे सर्वाना वाटले असेल.. परंतु दुर्दैवाने अगदी तेच होत आहे असे इंटरनेटवर उपलब्ध व्हीडिओ चित्रण पाहताना मला जाणवले.
‘माझ्या नावाचा मनातून जप केलात तर तुमच्यावरील बलात्काराचे संकट आपोआप टळेल आणि तसे करू पाहणारा नपुंसक बनेल,’ असे अनिरुद्ध बापू उपस्थित स्त्रियांना खात्री देऊन सांगत आहेत, असे त्या ‘यूटय़ूब’वरील त्या व्हिडीओत दिसले. (हा व्हीडिओ लोकांसाठी खुला आहे).  सर्वसामान्य मनुष्य असा विचारही मनात आणू शकणार नाही.
नंदकिशोर पेडणेकर, अहमदनगर</strong>

‘कलाभान’ या सदरात (सोमवार, ७ जाने.) ‘रापण’ या पुस्तकाचे लेखक ‘म. वा. धोंड’ असा उल्लेख नजरचुकीनेच झाला आहे. ‘रापण’ हे पुस्तक प्रल्हाद अनंत धोंड यांच्या आठवणींचे आहे. ही चूक विठोबा पांचाळ, शांता गोखले आणि मेघना सामंत यांनीही लक्षात आणून दिली.