दरवर्षी मार्च महिना उजाडल्याबरोबर पाणीटंचाईच्या बातम्या झळकतात. लोकांची अगतिकता नेत्यांपर्यंत किती पोहोचते हे माहीत नाही, पण पाणी मागणारी रयत आणि तुम्हाला पाणी देणे आमच्याच हाती अशा देहबोलीतून व्यक्त होणारे नेते यातून राजा-रयत ही मांडणी आणखीच घट्ट होते.
सगळीकडून वाद्यांचा जोरजोरात कानठळ्या बसवणारा आवाज दणदणत असेल तर आजूबाजूला कोण कोणाशी काय बोलतोय हेच समजत नाही. मुख्य म्हणजे कुणाशी काही बोलावे असेही त्या वेळी वाटत नाही. आजूबाजूला गोंधळ-गोंगाटाने बऱ्यापकी बधिरीकरण केलेले असते. सध्या लोकसभा निवडणुकांचा धुरळा उडाला आहे. सर्वच राजकीय पक्षांचे कार्यकत्रे उन्हातान्हाची पर्वा न करता कामाला लागले आहेत(!) जर हा निवडणुकांचा माहोल नसता तर वर्तमानपत्रांची जागा या दिवसात पाणीटंचाईच्या बातम्यांनी व्यापली असती. दरवर्षी मार्च महिना उजाडल्याबरोबर पाणीटंचाईच्या बातम्या वर्तमानपत्रांच्या पानापानावर झळकतात. कोरडय़ा नदीपात्रांची रखरख, डोक्यावर हंडी घेऊन चालणाऱ्या बायाबापडय़ा, हातपंपातून टपकणाऱ्या पाण्याच्या एखाद्या थेंबात चोच रुतवलेला पक्षी, गावातल्या सार्वजनिक ठिकाणी असलेला पाण्याचा टँकर आणि त्यावर तुटून पडलेली झुंबड, खोल खोल विहिरीच्या तळाशी दिसणारे पाणी आणि कोरडय़ा विहिरीत नुसताच जाणवणारा पोहऱ्यांचा खडखडाट. छायाचित्रांनी ही परिस्थिती आणखीच बोलकी होते. दरवर्षी मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच वर्तमानपत्रातून दिसणारी ही परिस्थिती. आता मार्च महिना संपत आला तरीही या परिस्थितीचा साधा मागमूसही नाही. त्याचे कारण टिपेला पोहोचलेल्या सध्याच्या आवाजाने सर्वाचेच झालेले बधिरीकरण. अगदी ज्यांना या टंचाईची झळ बसते तेही या बधिरीकरणात सहभागी.
दरवर्षी उन्हाळ्याची दाहकता वाढली की पाण्यासाठी भटकंती सुरू होते. पिण्याच्या पाण्यासाठी माणसे दाहीदिशा फिरतात. गुरांची तगमग चाललेली असते. कधी कधी हातचे काम सोडून गुरांच्या पाण्याची सोय करावी लागते. कामधंद्यासाठी स्थलांतरित होणाऱ्यांना वाटते जिथे हाताला काम मिळेल आणि जागेवर पाण्याची सोय असेल तिथे कुटुंबकबिल्यासह आपले बस्तान मांडावे. शहरात एक दिवस नळाला पाणी आले नाही तर ओरड होते, ठणठणाट होतो. पाणी जास्तच अनियमित येऊ लागले तर घागर-हंडय़ांचे मोच्रे निघतात. इकडे अनेक गावांमध्ये पाण्याची बोंबाबोंब. पाण्यासाठी मलोन्मल पायपीट. कुठे नळ योजनेची टाकी नुसती सांगाडय़ासारखी उभी, तर कुठे लांबच लांब खोदून ठेवलेल्या, पण कोणत्याच कामाच्या नसलेल्या पाइपलाइन. गावात एखाद्या ठिकाणी हापशाला पाणी असेल तर तिथेच साऱ्या गावाची झुंबड. उन्हाळा जसजसा तापत जातो तसतशी भुईतली ओल आटत जाते. पाण्याचे साठेही तळ गाठायला लागतात. पूर्वी ज्या गावात बारमाही पाण्याची सोय आहे, नदी आहे अशा ठिकाणीच मुली दिल्या जात. ज्या गावात पाण्याचे हाल आहेत अशा ठिकाणी पोरगी कशाला द्यायची? डोक्यावर हंडे आणून आणून तिच्या डोईवर केस तरी राहतील काय? असे बायाबापडय़ा बोलत असत. खडतर उन्हाळ्यात आजही पाण्यासाठी रात्ररात्र जागून काढावी लागते. रात्री हापशावर गर्दी कमी असते म्हणून दिवसभर रानात काम करणारी माणसे उशिरा पाणी भरतात.
गावागावातली पाण्याची भटकंती कमी व्हावी म्हणून किती कागद काळे केले गेले, किती योजना आखल्या गेल्या, किती आकडेमोड आणि किती अंदाजपत्रके.. पाण्यासाठीचे हाल संपलेले नाहीत. शेताशिवारात पाणी खेळावे म्हणून धरणे बांधली गेली. त्यासाठी शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित केल्या गेल्या. आज शेतकरी हे अशा धरणांचे लाभार्थी नाहीतच. जिथे धरण आहे तिथे त्याचा वापर मोठमोठय़ा शहरांच्या पाणीपुरवठय़ासाठी. तुमची शिवारं हिरवीगार होणार असे सांगत शेतकऱ्यांच्या जमिनी घेतल्या गेल्या. प्रत्यक्षात शेतकरी मात्र अजूनही पाण्यासाठी आसुसलेलाच. शेतकऱ्यांबरोबरच शेतमजूर आणि सगळ्या राबणाऱ्यांच्या जगात उन्हाळ्यात पाण्यासाठीचाच जीवघेणा संघर्ष चाललेला असतो. कोणतेही धरण घ्या ते बांधले शेतकऱ्यांच्या नावावर पण आज त्याचा लाभ मात्र त्यांना नाही. लाभक्षेत्र ज्यांच्या वाटय़ाला यायचे त्यांचे प्राक्तन जणू ‘बुडित’ क्षेत्रासाठीच होते. पाण्याच्या लाभाचे वाटेकरी कुणी तरी दुसरेच. वर्षांनुवष्रे रेंगाळणारे प्रकल्प, त्यांच्या वाढत जाणाऱ्या किमती, डोळे फिरावेत असे आकडे आणि अशा प्रकल्पांच्या पूर्तीसाठी झटणारे, प्रत्येक जिल्ह्य़ात तयार झालेले दहा-पाच ‘पाणीदार’! कुणालाच त्यांचे पाणी जोखता येऊ नये अशी परिस्थिती. मनगटात-गळ्यात सोन्याच्या साखळ्या, पांढरेशुभ्र कडक कपडे आणि बंद काचांच्या वातानुकूलित गाडय़ा. संपूर्ण ग्रामीण महाराष्ट्रात असे भगीरथाचे नवे वंशज सध्या कानाकोपऱ्यात दिसू लागले आहेत. त्याचबरोबर खेडय़ापाडय़ातल्या लोकांची तहान शमविण्यासाठी टँकर लॉबी उन्हाळ्यात कामाला लागते. सरकारचे या टँकर लॉबीशी अतिशय जवळचे नाते. एकीकडे हा संघर्ष तीव्र होत असताना दुसरीकडे गावातल्या फाटय़ापर्यंत बाटलीबंद पाणी जाऊन पोहोचले आहे. गावातल्या प्रत्येक दुकानात आता पाण्याचे ‘पाऊच’ आढळू लागले आहेत. रसवंती-फाटय़ावर-ढाब्यावर जे स्वच्छ पारदर्शक आणि निळेशार बाटलीबंद पाणी दिसत आहे त्याचा दर हा साधारणपणे ज्या दरात शेतकऱ्यांच्या दुधाची खरेदी होते त्याच्याशी मिळताजुळता. गावपातळीवरील पाणीपुरवठय़ाच्या योजनांचे पाणी मिळो न मिळो, पण खेडय़ातल्या माणसांचा खिसा खाली करणारे बाटलीबंद पाणी आता टंचाईग्रस्त गावांमध्ये उपलब्ध होऊ लागले आहे.
पूर्वी छोटय़ा-मोठय़ा गावांना पाणी पुरविणारे काही पारंपरिक स्रोत होते. आड, विहीर, बारव. आता यातले अध्रेअधिक बुजले. त्यांचे पुनरुज्जीवन केले तर लोकांना पाणी मिळेल, पण टंचाई निवारणाचे समाधान आधुनिक भगीरथांना मिळणार नाही. मोठय़ा ग्रामपंचायती असणारी जी गावे आहेत तिथे आता हे पारंपरिक स्रोत बुजवून त्याजागी व्यापारी संकुले, सभागृहे आणखी काही काही उभे राहिलेले दिसते. आता असे स्रोत राहिले नाहीत आणि नद्याही राहिल्या नाहीत. नदीच्या पात्रातला बेफाम वाळू उपसा खरवडून खरवडून अगदी संपला आहे. पाण्याच्या शोधात वणवणणारी जनता आणि पाण्याअभावी उजाड झालेली माळराने तर दुसरीकडे पाण्याच्या बेफाम उपशावर निर्माण झालेली समृद्धीची काही हिरवी बेटे असे आजचे चित्र आहे. काही भागांत होणारी पाण्याची प्रचंड नासाडी आणि काही भागांत वाडी-वस्ती-तांडय़ावर पाण्यासाठी चाललेला, पायातले बळ हरवणारा संघर्ष. पाण्याचा पाऊच त्यांच्यापर्यंत कधी पोहोचणार?
लोकांची तहान कायम राहावी, त्यांचा घसा कोरडा राहावा, त्यांनी आपल्याकडे कायम आशाळभूत नजरेने पाहावे. तुम्हीच मायबाप, पाण्याविना देशोधडीला लागलोय आम्ही, आमची काही तरी व्यवस्था करा, असे डोळ्यात पाणी आणून या जनतेने म्हणावे असेच राजकारण्यांना वाटते. नेते टंचाईच्या काळात पाहणी दौऱ्यानिमित्त फिरतात तेव्हा बायाबापडय़ा त्यांच्यासमोर रिकामी हंडी मांडतात. नेते कंबरेवर हात ठेवून ही अगतिकता पाहतात. टंचाईच्या काळात नेत्यांना पाझर फुटल्याच्या बातम्या येतात, नेते रोजगार हमीच्या कामांना भेटी दिल्याची छायाचित्रे झळकतात. लोकांची अगतिकता नेत्यांपर्यंत किती पोहोचते हे माहीत नाही, पण पाणी मागणारी रयत आणि तुम्हाला पाणी देणे आमच्याच हाती अशा देहबोलीतून व्यक्त होणारे नेते यातून राजा-रयत ही मांडणी आणखीच घट्ट होते. लोकांची तहान कायम राहावी आणि त्यांचा घसा कायम कोरडा असावा यामागचा रखरखीत इतिहास हा असा आहे.