तत्त्वज्ञान म्हणजे व्यक्ती आणि त्यांच्या पिढय़ा यांच्यातील २६०० वर्षांचा संभाषणाचा इतिहास.. पण तत्त्वज्ञान समजून घ्यायचे म्हणजे त्या ज्ञानसंवादाचा प्रवास कालानुक्रमे- इतिहासासारखा वाचायचा की आजच्या समस्या, त्यांची चर्चा यामधून कालचे तत्त्वज्ञान जिवंत आणि ‘आजचे’ करूनच जिज्ञासूंपर्यंत पोहोचवायचे?
दर्शन, तत्त्वज्ञान आणि Philosophy या तीनही शब्दांचा उगम, त्यानुसारचा त्यांच्या अर्थातील फरक, त्यांच्या सांस्कृतिक व तात्त्विक पाश्र्वभूमीसह आपण पाहिला आहे. आता, या सदरातील या लेखापासून आपण पाश्चात्त्य-युरोपीय विचारविश्वासाठी मराठीत ‘तत्त्वज्ञान’ हा शब्द Philosophy चे मराठी भाषांतर म्हणून आणि भारतीय विचारविश्वासाठी ‘दर्शन’ हा संस्कृत शब्द मराठीत उपयोगात आणू.
ग्रीक- आंग्ल- युरोपीय ही भौगोलिक विभागणी आहे. ग्रीसमध्ये निर्माण झालेले आणि प्राचीन ग्रीक भाषेत मांडलेले तत्त्वज्ञान म्हणजे ग्रीक तत्त्वज्ञान. पाश्चात्त्य देशात निर्माण झालेले आणि आंग्ल (इंग्लिश) भाषेत मांडलेले (मुख्यत्वे ब्रिटिश) तत्त्वज्ञान म्हणजे पाश्चात्त्य तत्त्वज्ञान. युरोप खंडातील विविध देशांत निर्माण झालेले पण केवळ इंग्लिशमध्ये नव्हे तर त्या त्या देशातील (फ्रेंच, जर्मन इ.) भाषांमध्ये मांडलेले आंग्लेतर (उर्वरित युरोपीय continental’) तत्त्वज्ञान म्हणजे युरोपीय तत्त्वज्ञान. वेगवेगळ्या भाषांमध्ये मांडले गेलेले ग्रीक आणि आंग्लेतर तत्त्वज्ञान ब्रिटिश वसाहतवाद आणि अन्य काही कारणांमुळे इंग्लिशमध्ये भाषांतरित होऊन जगात पसरले. आपल्याकडेही मराठी व इतर प्रादेशिक भाषांत विराजमान झाले. अशा तऱ्हेने ग्रीक-पाश्चात्त्य-युरोपीय तत्त्वज्ञान या सगळ्यांनी मिळून जो तत्त्वविचारांचा साठा बनतो त्या विचारविश्वाला पाश्चात्त्य तत्त्वज्ञान म्हणण्याची पद्धत आहे.
‘पाश्चात्त्य तत्त्वज्ञान’ ही अगदी अलीकडील काळातील, गेल्या शंभर वर्षांतील नवी संज्ञा आहे. या तत्त्वज्ञानाचे प्राचीन, मध्ययुगीन, आधुनिक आणि समकालीन असे चार प्रकार केले जातात. तथापि ‘पाश्चात्त्य तत्त्वज्ञान’ ही संज्ञा बरीचशी संदिग्ध आहे आणि फारशी उपयुक्त नाही. उदाहरणार्थ प्राचीन ग्रीक तत्त्वज्ञानालाच काही वेळेस पाश्चात्त्य तत्त्वज्ञान म्हटले आहे तर काही वेळेस आधुनिक तत्त्वज्ञानाला पाश्चात्त्य तत्त्वज्ञान म्हटले आहे. शिवाय केवळ तत्त्ववेत्तेच नव्हे तर अनेक कवी, वैज्ञानिक, लेखक, साहित्यिक यांनीही तत्त्वज्ञान निर्माण केले आहे. त्यात अनेक संस्कृती, सभ्यता, परंपरा, राजकीय संघटना यांचा सहभाग आहे. मुख्य म्हणजे जगातील विविध पाश्चात्त्य, युरोपीय आणि मध्यपूर्व देशांमधील धर्मानी तत्त्वज्ञान सांगितले आहे. ते त्या त्या धर्माचे स्वतंत्र तत्त्वज्ञान आहे. ते सारे तार्किकदृष्टय़ा चिकित्सक असेलच असे नाही. तर्कशुद्ध युक्तिवाद, समर्थन आणि अनुभव हे निकष ते पूर्ण करीत नाहीत. तरीही ते तत्त्वज्ञानाचा हिस्सा बनले आहेत.
धर्मसंस्थांप्रमाणेच ‘विज्ञान’ या क्षेत्राचाही मोठा परिणाम तत्त्वज्ञानावर झाला आहे. आधुनिक समजल्या जाणाऱ्या कालखंडात विज्ञान व तत्त्वज्ञान एकत्र निर्माण झाले; विसाव्या शतकात विज्ञानाचा, संशोधनाचा महास्फोट झाला. त्याचा परिणाम होऊन वैज्ञानिक तत्त्वज्ञान ही नवी गोष्ट आली. त्यामुळेच बटरड्र रसेलच्या मते तत्त्वज्ञान हा शब्द ईश्वरशास्त्र आणि विज्ञान यांच्या‘मध्ये’ कुठे तरी येतो. तो त्याच्या ‘हिस्ट्री ऑफ वेस्टर्न फिलॉसॉफी’ या ग्रंथाच्या प्रस्तावनेत म्हणतो- ‘ईश्वरशास्त्र आणि विज्ञान यांच्या दरम्यान एक ‘निर्जन प्रदेश’ (नो मॅन्स लॅण्ड) आहे ज्यावर दोन्ही बाजूंनी सतत हल्ले होत राहतात; हा प्रदेश म्हणे तत्त्वज्ञान.’ अशा रीतीने अनेक व्यक्ती, त्यांचे विचार, चळवळी, घटना या सगळ्यांनी मिळून ‘पाश्चात्त्य तत्त्वज्ञान’ बनते.     
या तत्त्वज्ञानाचा परिचय करून घेण्याचे आज साधारणत: दोन मार्ग आहेत. पहिला मार्ग आहे तत्त्वज्ञानाच्या समग्र इतिहासाचा आढावा घेणे. यात प्रथम प्राचीन ग्रीक तत्त्वज्ञानाचा आणि त्यानंतर पाश्चात्त्य-युरोपीय तत्त्वज्ञानातील दिग्गजांचा परिचय करून घेणे. दुसरा आधुनिक समजला जाणारा ‘समस्याकेंद्रित मार्ग’.
तत्त्वज्ञानाच्या समग्र इतिहासाचा आढावा घेताना मुख्यत: ज्यांनी पाश्चात्त्य-युरोपीय तत्त्वज्ञानाचा पाया रचला त्या सॉक्रेटिस, प्लेटो, अ‍ॅरिस्टॉटल या तीन तत्त्वज्ञांचा परिचय हा मूलभूत अभ्यास आहे. मग त्यानंतरच्या मध्ययुगीन कालखंडातील ऑगस्टीन, अ‍ॅन्सेल्म इत्यादी तत्त्ववेत्ते, मग आधुनिक कालखंडातील देकार्त, लायब्नीज, स्पिनोझा, पास्कल, लॉक, बर्कले, ह्यूम, रूसो, कांट, हेगेल, मार्क्‍स, नीत्शे, किर्केगार्द आणि अखेरीस विसाव्या शतकातील रसेल, विटगेनस्टाइन, व्हाइटहेड, सात्र्, कामू, पॉपर, फेयराबँड, रॉल्स, चार्ल्स टेलर, कार्ल पॉपर इत्यादींची माहिती मिळविणे.
तत्त्वज्ञान शिकण्याचा हा एक लोकप्रिय राजमार्ग आहे, कारण खऱ्या अर्थाने पाहता तत्त्वज्ञान म्हणजे व्यक्ती आणि त्यांच्या पिढय़ा यांच्यातील २६०० वर्षांचा संभाषणाचा इतिहास आहे. या इतिहासाकडे दोन-तीन दृष्टिकोनांतून पाहता येते. पहिला, इ.स.पूर्वी ६०० वष्रे आधीपासून ते आजपर्यंत आपले पूर्वज नेमके काय सांगू पाहात होते आणि दुसरा, विद्यमान समकालीन वंशज काय सांगू पाहात आहेत, हे जाणून घेणे आणि तिसरा, विद्यमान अंत्यजांपकी एक अंत्यज म्हणून ‘स्वत: मी प्रथमपुरुषी एकवचनी माणूस’ त्यातील नेमके काय ग्रहण करीत आहे, हे स्वत:हून या संभाषणात सहभागी होऊन साक्षात जाणून घेणे. अशा सहभागाचा लाभ होणे हा एक सन्मान आहे.
ऐतिहासिक दृष्टिकोनाचा फायदा असा की एक तर तात्त्विक शोधात सातत्य राहून जिज्ञासूला एक समग्र व्यापक आकलन होते. दुसरे म्हणजे असा ज्ञानाचा एक मोठा साठा हाती लागला की, त्यातील कोणत्याही विचारप्रणालीचा उपयोग त्या जिज्ञासूला त्याच्या अभिरुची असलेल्या विषयाच्या पुढील सखोल आकलनासाठी आणि अधिक विश्लेषणासाठी करता येतो. तत्त्वज्ञानाचा असा अभ्यास करणे सुलभ जाते, कारण तत्त्वज्ञान तसे घडत गेले आहे आणि त्यावर आधारित समाजव्यवस्था येत-जात राहिल्या आहेत. विद्यमान समाजव्यवस्थासुद्धा या अनुक्रमाने येत गेलेल्या तात्त्विक विचारांचाच परिपाक आहेत. अर्थात हा मार्ग कितीही नसíगक वाटला तरीही ऐतिहासिक दृष्टिकोन अंगीकारण्यात काही पेच असू शकतात.
अर्थात हा मार्गही काही जणांना पसंत पडत नाही, कारण त्यांना ‘तत्त्वज्ञानाने जे करावे’ असे त्यांना वाटते, ते यात होत नाही. या काही जणांना ‘तत्त्वज्ञानाने काय करावे’ असे वाटते? तर त्यांच्या मते, तत्त्वज्ञानाने (म्हणजे तत्त्ववेत्त्यांनी) आजच्या विद्यमान तत्त्वज्ञानात्मक समस्यांचा विचार करावा, त्यांची चर्चा करावी, त्यांची उत्तरे द्यावीत. या लोकांना (वैचारिक कार्यकर्त्यांना) अशा समस्या सोडवून परिस्थितीत तातडीने बदल व्हावा, अशी घाई झालेली असते. उदाहरणार्थ न्याय, समता, नतिकता, स्वातंत्र्य किंवा ईश्वर. हा तत्त्वज्ञानाचा परिचय करून घेण्याचा दुसऱ्या मार्गाला ‘समस्याकेंद्रित मार्ग’ मानता येईल.   
तत्त्वज्ञानाचा परिचय करून देणारी पुस्तके बहुधा दोन प्रकारच्या चुकीच्या गृहीतकावर आधारलेली असतात. ती एक तर खूपच सोपी असतात किंवा मग खूपच अवघड असतात. काही नावालाच परिचयात्मक असतात. अवघड पुस्तकांशी वाचकाला झुंजावे लागते. मग त्याचा समज असा होतो की तत्त्वज्ञान हा विषय फक्त काही निवडक दीडशहाण्यांनीच अभ्यासावा असा विषय आहे आणि त्याचा प्रत्यक्ष जगण्याशी काही संबंध नाही! दुसरीकडे काही बाळबोध लेखन नावालाच तत्त्वज्ञानाचे असते. कारण त्यात जीवनविषयक भरमसाट मोहक मुक्ताफळे असतात, पण तत्त्वज्ञानाची परिभाषा नसते. असे लेखन वाचणाऱ्या वाचकाला तत्त्वज्ञान हा उथळ विषय वाटतो आणि यात वेळ घालविण्यात काहीच शहाणपण नाही, या निष्कर्षांला तो येतो. या दोन्हीतून मार्ग काढणे आवश्यक असते.
लेखक संगमनेर महाविद्यालय, संगमनेर येथे तत्त्वज्ञान विभागप्रमुख आणि सहयोगी प्राध्यापक आहेत.

Husband Appreciation Day
Husband Appreciation Day : महिलांनो, नवऱ्याला गृहीत धरता का? त्यांच्या पाठीवर कधी देणार कौतुकाची थाप?
Sadguru, Sadguru news, Sadguru latest news,
‘सद्गुरुंकडे’ यापेक्षाही वेगळ्या दृष्टिकोनातून पाहता येऊ शकते; ते असे…
kanyadan, valid marriage,
वैध लग्नाकरता कन्यादान नाही, तर सप्तपदी महत्त्वाची !
lokmanas
लोकमानस: दांभिक नवनैतिकवाद्यांकडून अपेक्षा निरर्थक