अमेरिकेला महासत्ता बनविणाऱ्या अनेक घटकांमध्ये तेथील राजकारण्यांचा व्यवहारवाद हा एक मुख्य घटक आहे. धोरण आखताना कालबाह्य़ समजुतींना कवटाळून न बसता, चोख व्यवहाराच्या कानशीने ते घासून पाहण्याची सवय तेथील राजकारण्यांनी अंगी बाणवली आहे. स्थलांतरितांबाबत ओबामा यांचे नवे धोरण हेही चोख व्यवहाराला धरून आहे. स्थलांतरितांचे स्वागत करणे हे कोणत्याही संस्कृतीत सहजासहजी बसत नाही. परप्रांतीय म्हटला की त्याला हाकलून लावा, हीच भूमिका सर्वत्र घेतली जाते. स्थलांतरितांमुळे स्थानिकांच्या रोजगारावर गदा येते, जागा महाग होतात, गुन्हेगारी वाढते अशा अनेक व्यथा मांडल्या जातात व त्यामध्ये कधी कधी तथ्यही असते. स्थलांतरितांनी हळूच शिरकाव करून स्थानिक व्यवस्था ताब्यात घेतलेल्या आहेत. आसाम हे याचे उत्तम उदाहरण. स्थानिक व्यवस्था मुळात तुटपुंजी असली की परक्यांचा भार सहन होत नाही आणि मग स्थानिक संतापतात. अमेरिका मात्र स्थलांतरितांकडे वेगळ्या नजरेने पाहते. परप्रांतीय म्हटल्यावर आपल्या कपाळावर सहज आठी उमटते, तसे अमेरिकेत होत नाही. मुळात तो देशच स्थलांतरितांनी उभारला आहे. कोणत्याही कुटुंबात तीन-चार पिढय़ा मागे गेले की स्थलांतरित सापडतो. स्थलांतरितांमुळे जशा समस्या निर्माण होतात तसेच अनेक फायदेही होतात. हे फायदे अमेरिकेने अनुभवल्यामुळे स्थलांतरितांबाबत ते वेगळा विचार करू शकतात. या वेगळ्या विचारातील प्रमुख पैलू म्हणजे बुद्धिमान परप्रांतीयांना उदार आश्रय देणे. पैसा फक्त मेहनतीतून मिळत नाही तर ‘बुद्धिमान मेहनती’तून मिळतो. बुद्धिमंतांच्या कर्तृत्वाला वाव दिला तर ते संपत्ती निर्माण करतात आणि त्यातूनच राष्ट्र श्रीमंत होत जाते. सरस्वतीमागे लपलेली ही लक्ष्मी ओबामांना दिसते. म्हणून देशात उच्च शिक्षण घेण्यासाठी आलेल्या तरुणांना इथेच स्थायिक करून घ्या, अमेरिकेतील शिक्षणामुळे तेज झालेली त्यांची बुद्धी अमेरिकेच्याच उपयोगात येऊ द्या, असा त्यांचा आग्रह आहे. सिलिकॉन व्हॅलीमध्ये भरभराटीस आलेल्या उद्योगांपैकी २८ टक्के उद्योग हे परप्रांतीयांनी सुरू केले. स्थलांतरितांसाठी ओबामांनी आखलेल्या नव्या धोरणाला या आकडेवारीचा आधार आहे. हुशार विद्यार्थ्यांनी अमेरिकेतच राहावे, हुशारीचा फायदा अमेरिकेलाच मिळवून द्यावा, स्वदेशाला नव्हे, असा रोकडा हिशेब त्यामागे आहे. शिक्षणासाठी अमेरिकेत जाणाऱ्या हुशार भारतीय विद्यार्थ्यांना याचा फायदा होत असला तरी देशाचा तोटा आहे. अर्थात त्याची खंत ना सरकारला वाटेल ना विरोधी पक्षांना. हुशार तरुणांना वाव देण्यास यापैकी कोणीही उत्सुक नाही. किंबहुना हा विषयच त्यांच्या कार्यक्रम पत्रिकेवर नाही. अमेरिकेतील अनेक स्थानिकांनी सध्या मूलभूत विज्ञानशाखेकडे पाठ फिरविली आहे. स्थानिक समाज कमालीचा सुखलोलुप झाला असून अभ्यासासाठी मेहनत घेण्याची इच्छा त्यांना नाही. स्थानिकांच्या बौद्धिक आळसामुळे होणारा तोटा परप्रांतीयांच्या हुशारीने भरून काढण्याची अमेरिकेची धडपड आहे. या धोरणाला विरोध झाला तरी ते रेटून नेण्याचे सूतोवाच ओबामा यांनी केले. देशाला सामथ्र्यसंपन्न करण्याची बीजे कशात आहेत हे राज्यकर्त्यांना पक्के कळले की ते अशी व्यवहारी पावले टाकतात. स्थलांतरितांना राजरोस प्रवेश देणारे हे धोरण नाही, तर लायक व्यक्तींना सामावून घेणारे आहे. ‘अर्न सिटिझनशिप’ असे त्यात एक कलम आहे. अमेरिकेचे नागरिकत्व तुम्हाला प्राप्त करायचे आहे, ते सुखासुखी दिले जाणार नाही हे या शब्दांतून ध्वनित होते. असा सूक्ष्म धोरणीपणा महासत्ता होण्यासाठी आवश्यक असतो.